‘भरतनाट्यम्’ नृत्यशैली
नृत्यकलेचे प्राचीनत्त्व आणि परंपरा ह्याबद्दल पुरावा म्हणून मंदीरे, त्यावरील शिल्पे ह्यांचाच केवळ विचार न करता साहित्यात, मुख्यतः संस्कृत साहित्यात उपलब्ध ग्रंथांचा, त्यातील संदर्भाचा देखील विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ह्यासाठी अर्थातच भरतमुनींनी रचलेला नाट्यशास्त्र हा आद्य ग्रंथ म्हणून अभ्यासकांच्या मते मानला गेलेला आहे. ह्या नाट्यशास्त्राला पुढे पाचवा नाट्यवेद म्हणून देखील मान्यता देण्यात आली. ह्यासाठी भरतमुनींनी ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदाततून अभिनय, सामवेदातून संगीत आणि अथर्ववेदातून रस ग्रहण केले. ह्याकारणास्तव नाट्यशास्त्राला पूर्णत्त्वाचे स्वरूप प्राप्त झाले असे म्हणता येईल. ह्या ग्रंथानुसार शंकराचे ‘तांडव नृत्य’ आणि पार्वतीचे ‘लास्य’ ह्यातून नृत्यकलेची निर्मिती झाली. पुढे भरतशिष्य ‘तंडु’ ह्यांनी ही कला शिकून त्याचा भूतलावर प्रचार आणि प्रसार केला. अशापद्धतीने नृत्यकला पुढे विकसित होत गेली. ह्या विकसित स्वरूपाच्या नृत्यकलेमध्ये सात शास्त्रीय नृत्यशैलींचा समावेश होतो, ह्यापैकी भरतनाट्यम् ह्या नृत्यप्रकाराचा विचार सदर लेखात केला आहे. प्रसिद्ध सप्त शास्त्रीय नृत्यशैलींपैकी भरतनाट्यम् हा नृत्यप्रकार प्राचीन असावा, असे लक्षात येते. याशिवाय तांडव आणि लास्य ह्यातील बऱ्याच हालचाली ह्या प्रचलित भरतनाट्यम् ह्या नृत्यप्रकारात समाविष्ट केल्या आहेत.
भरतनाट्यम् ह्या नृत्यशैलीत भाव-राग-ताल ह्यांचा उत्तम समन्वय साधला जातो. मूळात ‘दासीअट्टम्’ ह्या नृत्याच्या प्रकारातून भरतनाट्यम् ही नृत्यशैली उदयास आली. दासीअट्टम् म्हणजे पूर्वीच्या काळी अशी परंपरा रूढ होती की, काही घरातील मुली देवाला अर्पण केल्या जात. त्यांना देवदासी अशी संज्ञा होती. ह्या देवदासी नृत्यामध्ये निपुण असून त्या मंदिरात आपली नृत्यकला सादर करत असत. ह्या त्यांच्या नृत्यालाच दासीअट्टम् असे नाव आहे. ह्यातूनच पुढे दक्षिण भारतात तामिळनाडुमध्ये एक शास्त्रीय नृत्यशैली विकसित झाली. तीच पुढे भरतनाट्यम् ह्या नावाने प्रसिद्ध झाली. ही शैली केवळ मंदिरापुरतीच मर्यादित न राहता पुढे तिचा दक्षिण प्रांतात बराच विकास झाला. देवदासींचे नृत्य हे ईश्वरपूजेचाच एक भाग होता. त्यावेळी ह्या प्रांतांमध्ये चोल, पल्लव ह्या वंशातील राज्यकर्ते राज्य करत होते. ह्या वंशातील राजे हे कला, वास्तु, शिल्प यांचे प्रेमी असल्याने त्यांनी ह्या कलेला आश्रय मिळवून दिला. केवळ ह्या राजाश्रयावरच ह्या देवदासींचा उदरनिर्वाह चालू होता. चोल आणि पल्लव वगैरे ह्यांचा काळ साधारण इ. स. वी. चे १४ वे शतक असा आहे. ह्यानंतर अगदी १९ व्या शतकापर्यंत म्हणजे भोसले राजे, सर्फोजी, शहाजी ह्यांच्या काळापर्यंत ह्या कलांना सुखाचे दिवस होते. किंबहुना, भोसले राजांच्या काळात सर्फोजी, तुळाजी ह्यांसारखे राजे स्वतः रचनाकार होते. परंतु इ. स. वी. १९ व्या शतकानंतर ह्या नृत्यकलेला उतरती कळा लागली. ब्रिटीश राजवटीच्या काळात देवालयांचे उत्पन्न कमी झाल्याने पर्यायाने ह्या कलेच्या विकासावर देखील त्याचा परिणाम झाला आणि ह्या नृत्यकलेचे समृद्धतेचे दिवस नष्ट होऊ लागले.
२० व्या शतकात नृत्यकलेची झालेली ही अवस्था बघून काही थोर कलाकारांनी स्वातंत्र्यसंग्रामाचा भाग म्हणून ह्या नृत्यशैलीला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. ह्यासाठी इ. कृष्ण अय्यर, रुक्मिणीदेवी अरुंडेल, कलानिधी ह्यांसारख्या लोकांनी अथक प्रयत्नांनी कलेसाठी योगदान दिले. भरतनाट्यम् साठी रुक्मिणीदेवी अरुंडेल, कलानिधी ह्यांनी देवदासींकडून नृत्यकला शिकून त्यात काही प्रमाणात फेरबदल करुन नव्याने हा नृत्यप्रकार प्रसिद्धीस आणला. ह्यांसारख्या कलाकारांकडून प्रेरणा घेऊन पुढे अनेक चांगल्या कुटुंबातील मुली देखील नृत्य शिकण्यास पुढे येऊ लागल्या आणि नृत्याचे प्रयोग देखील सादर करण्यात सहभाग घेऊ लागल्या. ह्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भरतनाट्यम् ह्या नृत्यप्रकाराला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस प्राप्त होण्यास सुरुवात झाली.
नव्याने बदलेल्या ह्या शैलीचा केवळ दक्षिण भारतात नाही तर संपूर्ण भारतभर प्रसार झाला. ह्या नृत्यकलेसाठी अनेक कलाकारांचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्यापैकी तंजावूर बंधुंच्या योगदानाचा विशेषत्त्वाने उल्लेख करणे गरजेचे आहे. तंजावूर बंधु म्हणजे चिन्नया, पोमाया, शिवनंदन आणि वदीवेळू ह्या चार बंधुंनी भरतनाट्यम् नृत्याला एका विशिष्ट पद्धतीने रचनाबद्ध केले. त्यांनी ह्या नृत्याच्या सादरीकरणाकरिता विशेष क्रम ठरवला. आजही ह्याच क्रमाने भरतनाट्यम् ह्या नृत्यशैलीचे सादरीकरण केले जाते, ज्याला ‘मार्गम्’ असे म्हटले जाते. ह्या तंजावूर बंधुंनी अनेक रचना निर्माण करुन त्या संगीतबद्ध पण केल्या. ह्या बंधुंच्या विशेष योगदानाने भरतनाट्यमला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.
भरतनाट्यम् ह्या शास्त्रीय नृत्यप्रकाराला एक विशिष्ट स्वरूप आहे,. ह्यामध्ये नृत्त म्हणजे शुद्ध नर्तन आणि नृत्य म्हणजे अभिनययुक्त नृत्त ह्या दोन्हीचा मिलाफ़ भरतनाट्यम् ह्या नृत्यप्रकारात दिसून येतो. ज्या मार्गम् ह्या संकल्पनेचा उल्लेख आधी केला त्या मार्गम् च्या रचनेत देखील तंजावूर बंधुंनी नृत्त आणि नृत्य हयांचा पद्धतशीर विचार केला आहे. मार्गम् मध्ये नृत्यातील रचनांचा क्रम दिसून येतो. मार्गम् नुसार पुष्पांजली-अलारिपु-जतिस्वरम्-शब्दम्-वर्णम्-कीर्तनम्-पदम्-तिल्लाना आणि मंगलम् अशाप्रकारे रचना सादर केल्या जातात. ह्या रचनांबद्दल थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास मार्गम् मधील पहिली रचना ‘पुष्पांजली’ हयामध्ये सर्व देवता, कलेचे आराध्य दैवत नटराज, भूमीमाता, वादक-गायक कलाकार आणि प्रेक्षक हयांना वंदन करून सादरीकरणाची परवानगी घेतली जाते. त्यानंतर ‘अलारिपु’ ह्या रचनेमध्ये एखाद्या उमलणाऱ्या कमळाप्रमाणे शारीरिक हालचाली असतात. ह्यानंतरच्या ‘जतिस्वरम्’ ही स्वरांवर आधारित नृत्तरचना आहे. ह्यापुढील ‘शब्दम्’ ह्या रचनेत अलगदपणे अभिनयाला सुरूवात होते. ह्यानंतरच्या रचनेत, वर्णम् मध्ये नृत्त आणि नृत्य ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश समावेश असतो. सादरीकरणाच्या दृष्टीने पण ह्याचा काळ इतर रचनांच्या तुलनेत अधिक असतो. ह्यानंतर ‘कीर्तनम्’ ह्या रचनेमधून भक्तिभावाचे सादरीकरण होते. हयामध्ये मुख्यतः एखाद्या देवतेला उद्देशून तिची स्तुती केली जाते. हयामध्ये नृत्तापेक्षा अभिनयाकडे अधिक कल असतो. ह्यानंतर ‘पदम्’ सादर केले जाते. केवळ अभिनयावर आधारित ह्या रचनेत साहित्यात स्पष्ट केलेल्या अष्टनायिकांपैकी एखाद्या नायिकेची भूमिका कलाकार रंगमंचावर सादर करत असतात. मार्गम् मधील शेवटची रचना म्हणजे ‘तिल्लाना’. हयामध्ये नृत्त प्रधान असते. ही रचना विलंबित लयीमध्ये सुरु होऊन द्रुत लयीमध्ये संपते. थोडक्यात तीनही लयींचा हयात समावेश होतो. हयानंतरची रचना ‘मंगलम्’. हयामध्ये प्रेक्षक, वादक, गुरु, परमेश्वर ह्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अशाक्रमाने मार्गम् चे सादरीकरण आजही केले जाते. अर्थात् काळानुसार मार्गम् च्या सादरीकरणाच्या पद्धतीत काही प्रमाणात बदल घडून आले आहेत. पण तरीही त्याच्या मूळ तंत्रशुद्ध स्वरूपाला धक्का लागलेला नाही.
भरतनाट्यम् ह्या शास्त्रीय नृत्यशैलीची ४ घराणी प्रचलित आहेत. ती म्हणजे कलाक्षेत्र, तंजावूर, वलवूर आणि पंडनल्लूर. ह्यापैकी महाराष्ट्रात कलाक्षेत्र आणि तंजावूर ह्या घराण्यांचे सादरीकरण उर्वरित दोन घराण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात केले जाते. बाकी दोन घराण्यांचे सादरीकरण दक्षिण भारतात केले जात असावे. ह्या चारही घराण्यांमधील असणारा फरक, साम्य किंवा प्रत्येक घराण्याची असलेली विशेषता ह्याबाबत ह्या लेखात फार विचार केला नाही कारण ह्या सर्व घराण्यांचा विचार हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय आहे.
भरतनाट्यम् ह्या नृत्यशैलीचा विकास करण्यासाठी आणि ती जगभरात प्रसिद्ध करण्यासाठी अनेक कलाकारांनी काळानुसार योग्य बदल करुन पण मूळ स्वरूप कायम ठेवून देवदासींकडून आलेल्या ह्या परंपरेचा प्रसार केला. याकारणास्तव आजच्या काळातही भरतनाट्यम् ह्या नृत्यप्रकाराला जगात मानाचे स्थान आहे.
ह्या लेखमालेतील पहिला लेख इथे वाचा.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry.
Author : अक्षता चंद्रकांत जेस्ते.
अक्षता ह्या १८ वर्षांपासून भरतनाट्यम् शिकत आणि शिकवीत आहेत. तसेच डेक्कन महाविद्यालय येथे संस्कृत साहित्यातील छंद आणि ताल याविषयावर त्यांचे पी. एच. डी. प्रबंधाचे लिखाण सुरु आहे.
.
लेखनशैली आणि मांडणी उत्तम.. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत आहोत.. शुभेच्छा.. 😊👍🏻
धन्यवाद सौरभ 🙏🙂