अशाप्रकारे वनामध्ये वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करीत, समाजाला शहाणे करीत राम आणि लक्ष्मण यांचे दिवस एकामागून एक जात होते. दंडकारण्यामध्ये राम सलग १० वर्षे राहिले होते. येथे ऋषींची प्रचंड संख्या होती. हे ऋषी यज्ञयाग करणारे असल्याने ते अहिंसावादी होते. ऋषी अगस्ती आणि विश्वामित्र यांशिवाय कोणत्याच ऋषीने राक्षसांना मारले नव्हते. देवांचे साम्राज्य राक्षसांनी संपवले तेव्हापासून सगळे देव राक्षसांच्या नजरकैदेमध्ये होते. पण देव आपले स्वतःचे साम्राज्य परत मिळवतील याचीही शंका राक्षसांना होती. म्हणून देवांना साहाय्य करणाऱ्या ऋषींना मारण्यासाठी दंडकारण्यामध्ये अनेक राक्षस येत. याच कारणासाठी राम-लक्ष्मण दंडकारण्यामध्ये १० वर्षे राहिले होते. सज्जनांचे रक्षण हे त्यांचे ध्येय होते. दुर्जनांचा नाश ही याच ध्येयाची दुसरी बाजू होती. सुतीष्णांच्या आश्रमातील अनेक ऋषीमुनींचे दुःख रामांना बघवले नाही. आजवर मृत्युमुखी पडलेल्या ऋषी-मुनींच्या हाडांचा ढीग रामांना दाखवण्यात आल्यावर राम अत्यंत विमनस्क झाले. त्या ढिगासमोर त्यांनी शपथ घेतली, “यापुढे मी एकाही ऋषीचा मृत्यू होऊ देणार नाही आणि राक्षसांचा पुरता नाश केल्याशिवाय मी नगरप्रवेश करणार नाही.” वनामध्ये असताना ही शपथ ते घेतात. त्यामागचे कारण पाहिले तर ते त्यांचे समाज प्रेम! वनवास संपायला १७-१८ महिने राहिले असताना “मी नगरप्रवेश करणार नाही” ह्या त्यांच्या उद्गारातून माझा वनवास संपला तरी मी माझे ठरविलेले ध्येय पूर्ण करीनच असाच अर्थ त्यांना अभिप्रेत असणार.
श्रीरामांच्या मनातील ह्या विचारावरून ते समाजाविषयीचे स्वतःचे कर्तव्य पाळण्यात किती सजग होते ते कळते. कर्तव्याची जाणीव असणे वेगळे आणि त्या जाणिवेतून कृतिशीलता येणे वेगळे! समाजाबद्दलचा रामांचा दृष्टिकोन हा नेहमीच दयार्द्र राहिला आहे. समाज हतबल आहे, गरीब आहे, निःशस्त्र आहे म्हणून ही दया नव्हती. तर त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, हा विचार त्यांच्या जाणिवेमध्ये होता.
दंडकारण्यामध्ये वास्तव्यास असलेल्या अगस्ती मुनींकडून रामांना पंचवटीमध्ये जाण्याची आज्ञा मिळाली. (रामांना वनामध्ये पाठवण्यामागचा हेतू देवांना आणि ऋषींना माहीत असल्यानेच अगस्तींनी रामांना पंचवटीमध्ये पाठवले. कारण वनवासाची १३ वर्षे संपत आली, तरी कैकयीच्या योजनेप्रमाणे अजून बरेच काही घडणे बाकी होते. राम पंचवटीमध्ये गेले तरच ते होण्याची शक्यता होती.) म्हणून आधीच सर्व ऋषींनी संगनमताने ‘आता रामांनी पंचवटीकडे जावे’ असे ठरवले. अगस्तींनी तसाच सल्ला दिला. कैकेयीच्या योजनेमध्ये वसिष्ठांपासून सर्व ऋषिगण सामील असल्यानेच रावणवधाचा संकल्प मनामध्ये योजून बनलेले ते धनुष्य-बाण रामांना अगस्तींकडून मिळाले.
अगस्तींच्या धाकाने, त्यांच्या पराक्रमाचा डंका सर्वश्रुत असल्याने राक्षस अगस्तींच्या आश्रमाकडे फिरकत नव्हते. त्या वातावरणामध्ये रामांचेही ध्येय पूर्ण होणार नव्हते की कैकेयीची योजनाही पूर्ण होणार नव्हती. त्यामुळे रामांनी अगस्तींकडे न राहता पंचवटीमध्ये जावे असा सल्ला अगस्तींनी दिला. त्याप्रमाणे श्रीराम, लक्ष्मण, सीता तिघेही पंचवटीमध्ये येऊन राहू लागले.
तिथल्या वास्तव्यामध्ये शूर्पणखेने जखमी होणे, रावणाला राम पंचवटीमध्ये आल्याचे समजणे, चौदा सहस्र राक्षसांशी झालेले युद्ध, रामांचा विजय, मारिचाच्या साहाय्याने सुवर्णमृगाचे आमिष दाखवून जानकीचे केलेले अपहरण आणि रामांची सुग्रीवाशी मैत्री या घटना घडल्या. सुग्रीवाशी मैत्री करावी असा सल्ला कबंध या राक्षसाने (तो यक्ष होता) दिल्याने राम त्याला शोधतात. वाटेत शबरीमातेला दर्शन, तिचा उद्धार ह्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक साधारण वाटणारी मतंग ऋषींची (स्त्री)शिष्या आपल्या दर्शनासाठी वाट पाहते आहे, हेदेखील कबंध राक्षसाने सांगितले होते. पण प्रत्यक्ष दर्शनाचा योग शबरीला मिळाला, त्यावेळी श्रीरामांनाही शबरीमातेचा आशीर्वाद मिळाला. त्या आशीर्वादाचे महत्त्व रामांना समजले होते. समाजातील एका सामान्य स्त्रीचा आशीर्वाद “प्रसाद” या भावनेने रामांनी स्वीकारला. लक्ष्मणाला पसंत नसताना तिच्या हातची बोरे राम आवडीने खातात. यावरून रयतेतल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलच काय, परप्रातांमधील प्रत्येकाबद्दल रामांना आदर होता. त्यांच्या स्वभावातील हा गुण त्यांना समाजकार्याला साहाय्यार्थच ठरला.
‘अयोध्या ही माझीच मातृभूमी आहे. तेव्हा केवळ त्याच प्रजेबद्दल आपले कर्तव्य बांधले आहे’ असा विचार रामांनी कधीच केला नाही. संपूर्ण भरतवर्षातील प्रत्येक जण ही माझी प्रजा आहे या जाणिवेतूनच वनामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी लोकांना जागरूक केले हे आपण मागच्या लेखामध्ये पहिलेच. सुग्रीवाच्या मैत्रीमागचे कारणही आपल्या विषयाशी पूरक आहे.
अनेक ऋषींनी पूर्वी होऊन गेलेल्या अनेक घटना रामांना सांगितल्या. त्यात रावण-वाली यांच्यातील युद्ध व तह हेदेखील रामांना सांगण्यात आले होते आणि त्याचाच विचार करून रामांनी सुग्रीवाशी मैत्री केली होती. सुग्रीवाच्या भेटीनंतर तो आपल्यासारखाच (स्वपत्नीच्या अपहरणामुळे) दुःखी आहे हे समजले. वाली हा सुग्रीवापेक्षा पराक्रमी होता. रावणाला बगलेत दाबून त्याने त्याला किष्किंधेला आणले होते. वास्तविक सुग्रीव आपल्याला मदत करेल ही रामांना अपेक्षा होती.
पण त्यापेक्षा वाली तर रावणाकडे असलेली जानकी सहजपणे घेऊन येईल हे माहीत असूनही त्यांनी वालीशी मैत्री केली नाही. कारण रावण-वाली यांच्या तहानुसार वाली आपल्याला मदत करणार नाही ही गोष्ट राम विसरले नाहीत. इथे आणखी एक गोष्ट वाचकांनी समजून घेतली पाहिजे की रावणाने जानकीचे अपहरण केले, म्हणून राम रावणाला मारू इच्छितात असे नाही. तर वनातील वास्तव्यापासूनच राक्षसांच्या ह्या भयंकर कृत्यांना कोण खत-पाणी घालत आहे, कुणाचा पाठिंबा या राक्षसांना आहे हे राम शोधणार होते आणि त्याला ठार मारण्याचा विडा रामांनी उचलला होता. पण जानकीचे रावणाने अपहरण केल्याने रामांच्या वैर भावनेला एक वेगळी धार प्राप्त झाली होती. राक्षसांचा पूर्ण निःपात ह्या ध्येयासाठी रावणवध आवश्यक होता आणि त्याचसाठी सुग्रीवाशी मैत्री आवश्यक होती. म्हणजे समाजकार्यासाठीच रामांनी हा मार्ग अवलंबिला होता. वाली आणि रावण एकमेकांना युद्धाप्रसंगी मदत करणार हे तहात ठरले असल्याने रामांनी विचार केला की रावणाच्या मदतीला वाली गेला तर दोन परमपराक्रमी वीरांना आपण एकाच भूमीवर एकाच वेळी मारू शकणार नाही आणि किष्किंधेमध्ये वालीला मारायचे ठरवले तर रावण इथे वालीच्या मदतीला येईल. म्हणजे परत ते दोघे एकदम समोर येणार हा विचार करून समाजाच्या कल्याणाचा पायाभूत बळकट विचार हा प्रत्यक्षात आणण्यासाठी वालीला युद्ध न करता संपवणे आवश्यक वाटल्याने रामांना समाजकारण करण्यासाठी राजकारण करावे लागले. रामांच्या आयुष्यातील हा एकमेव प्रसंग! वालीने रामांचे काहीही बिघडवेलेले नसतांना रामांनी त्याला मारले आणि तेसुद्धा समोरासमोर लढाई करताना नाही. याला एकमेव महत्त्वाचे कारण त्या दोघांचा तह !
वालीवध हा रावणाबरोबर युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक होता. “शत्रूचा मित्र तोदेखील शत्रूच” हा युद्धनीतीचा नियम रामांनी योग्य वेळी अवलंबिला आणि वाली व सुग्रीव यांच्यामधील शत्रुत्वामुळे “मित्राचा शत्रू तोदेखील शत्रू” हा नियमही रामांनी पाळला. राजकारणामागे समाजहिताचा विचार हाच श्रेष्ठ मानला गेला. रामांनी या निर्णयाने काय साधले? वालीच्या मृत्युमुळे रामांना वालीचे सर्व सैन्य मिळाले, सुग्रीवाची मैत्री व सहकार्य मिळाले आणि रावणाचा अर्धा शक्तिपात झाला.
प्रथम रावण+वाली विरुद्ध श्रीराम अशी स्थिती होती. पण वालीवधानंतर रावण विरुद्ध राम+सुग्रीव अशी स्थिती झाली. म्हणजे रामांनी एका दगडात दोन नाही तर तीन पक्षी मारले. त्यामुळे सुग्रीवाशी मैत्री केवळ जानकी शोधण्यासाठी मदत मिळेल या विचारांनी झाली नव्हती, तर राक्षसांचा पूर्ण नि:पात करण्यासाठी रावणवध आवश्यक होता आणि त्यासाठी भावा-भावांना लढायला लावून वालीचा काटा काढून सुग्रीवाशी रामांनी मैत्री केली होती. ही घटना ही त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी प्रचंड महत्त्वाची होती. तशीच ती आवश्यकही होती.
वाचकांना हे माहीत आहे की सुग्रीव व त्याच्या सैन्याच्या मदतीने, बिभीषण व हनुमान यांच्या बहुमोल सहकार्यामुळे श्रीरामांनी धर्मयुद्ध जिंकले. लंकाधिपतीस त्याच्या पापाची शिक्षा श्रीरामांनी अखेरीस दिलीच.
प्रस्तुत लेखमाला प्रामुख्याने वाल्मिकी रामायणावर आधारित आहे.
या लेखमालेतील तिसरा लेख इथे वाचा.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry.
Author : सौ. नीलाताई रानडे, धुळे
सौ. नीलाताई रानडे ह्या वाल्मिकी रामायणाच्या अभ्यासक आहेत.
0 Comments