Itihāsa | इतिहास

Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.

वारी आणि दिंडी यांचे ऐतिहासिक महत्त्व

by | Jun 30, 2020 | 5 comments

पंढरपूर विठ्ठलभक्तांचा परिवार व शिष्य भक्तांचा वर्ग वारकरी संप्रदाय नावाने सर्वत्र सुपरिचित असला तरी या संप्रदायाची पाळेमुळे फार खोलवर आहेत व इतिहासही प्राचीन आहे. देवगिरीच्या यादवांच्या व कर्नाटकातील होयसळांच्या शिलालेखात व ताम्रपटात पंढरपूर व श्रीविठ्ठल यांविषयक अनेक उल्लेख येतात. त्यावर ओझरती नजर टाकली असता असे दिसून येते की राजकीय सत्तासंघर्षात यादव व होयसळ हे एकमेकांचे वैरी आहेत; पण दोनही राजवंश स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज समजतात व दोघेही श्री विठ्ठलाचे परमभक्त आहेत. नव्याने उपलब्ध झालेल्या उत्कीर्ण लेखामध्ये श्री विठ्ठलाची पूजा-अर्चा करणारा भक्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात व मध्य प्रदेशातही इ.स. चौथ्या व पाचव्या शतकापासून आढळतो व हे भक्त भीमातीरस्थ श्रीविठ्ठलाच्या दर्शनास येत. भीमातीरस्थ विठ्ठल व पुंडलिक यांच्या उल्लेखावरून पंढरपूर येथील श्रीविठ्ठलाच्या दर्शनास आपापल्या स्थानावरुन येत असत. कारण भीमा तीरावरील विठ्ठलाचे स्थान पुंडलिकापासूनच नावलौकिकास आले. तसे पाहिले तर श्रीविठ्ठलाची मंदिरे अन्यत्र ठिकाणी प्राचीन काळापासून आहेत; पण  पंढरपूरचे विठ्ठलाचे स्थान भीमा नदी व पुंडलिक यांमुळे प्रख्यात आहे. पुंडलिकाने पंढरपूरी आणलेला विठ्ठलच सर्वांना अभिप्रेत असतो. ‘पुंडलिक हरी वरद’ असे त्याचे बिरुद आहे. त्याच्या दर्शनासाठी ठिकठिकाणचे भक्त हरी दिनी पंढरपूरला येत आणि अद्यापही येतात. हरी दिन म्हणजे प्रत्येक महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशी! या तिथीला पंढरपूरी भक्त येतात. पुढे विष्णू हा विठ्ठल रूपात विराजमान असल्याने विष्णू शयन व विष्णू प्रबोधनाची जोड देऊन आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी अशा यात्रा सुरू झाल्या व काही दिवसांनी माघ शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध एकादशीपर्यंत विस्तार झाला. पण मूळ रूप तसेच कायम राखले गेले. ते रूप असे की भक्तांनी आपापल्या स्थानाहून शुद्ध पक्षातील एकादशीला म्हणजे हरी दिनी विठ्ठल दर्शनास यावे. अशाप्रकारे स्वस्थानाहून पंढरपुरी हरी दिनी येण्याच्या प्रथेला ‘वारी’ नाव मिळाले व हे नाव लोकप्रिय होऊन वारी व वारकरी नावाने विठ्ठल भक्तांचा वर्ग सर्वत्र नावारूपाला आला आहे.

वारी या नावाने पंढरपूरला येण्याची प्रथा नेमकी केव्हा व कोणी सुरू केली हे पुराव्याच्या अभावी निश्चितपणे सांगता येत नसले तरी होयसळ व यादव यांच्या उत्कीर्ण लेखामध्ये वारीचे स्पष्ट निर्देश आले आहेत. ते असे

१) शके ११५९ वीर सोवेश्वर होयसळ राजा.

२) शके ११७० श्रीकृष्ण देव यादव.

३)शके ११८६ रामचंद्र देव यादव.

तसेच ज्ञानदेव आणि नामदेव यांपूर्वी १०० वर्ष वारीचे उल्लेख येतात.

आता या वारीचे वैशिष्ट्य असणार्‍या दिंडी या संकल्पनेविषयी अधिक जाणून घेऊया.

पंढरपूरातील विठ्ठलाच्या भक्तसंप्रदायाची दोन अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत.१)वारी २)दिंडी. विठ्ठल दर्शनास हरी दिनी एकादशीला येणारे भक्त जसे एकटे-दुकटे येत; तसेच गटागटाने येत. हे भक्तांचे गावो-गांवाहून येणारे लहान-लहान जथ्येच ‘दिंडी’ नावाने प्रसिद्ध आहेत. तसेच दिंडी हे नाव ऐतिहासिक असून अन्वर्थक आहे व एकापरीने संपूर्ण वारकरी संप्रदायाचे सारसर्वस्व आहे. दिंडी या एका शब्दातून देव आणि भक्त यांचे नाते व परस्परांचे अनुबंध दिसून येतात. दिंडी म्हणजे दिंडार वनातील देव! पंढरपूर हे दिंडार वनात होते व भगवान गोपाल श्रीकृष्ण द्वारकेहून दिंडार वनात भीमातीरावर आले असे माहात्म्य प्राचीन ग्रंथातही सांगितले आहे. ‘पंढरीमाहात्म्य’ नावाचा १० प्रकरणांचा ग्रंथ स्कंदपुराणात आहे. पंढरपूरचा पौराणिक इतिहास सांगता सांगता कृष्ण द्वारकेहून पंढरपूरला आले असे सांगितले जाते. अर्थात आजचे पंढरपूर म्हणजे मूळचा दिंडारवनाचा परिसर. या वनात शिवाचे स्थान होते. या शिवस्थानाला ‘दिंडीश’ – दिंडीवनातील ईश असेसुद्धा म्हटले जात. या शिवाच्या दर्शनास द्वारकेहून श्रीकृष्ण आला आणि कालांतराने दिंडीश शिव दर्शनास आलेला कृष्ण ‘मस्तकावर शिवलिंग धारण करणारा शिवभक्त कृष्ण’ म्हणून प्रसिद्धीस आला. अशा मस्तकावर धारण करणाऱ्या कृष्णास विठ्ठल नावाने सर्व ओळखू लागले. त्याच्या दर्शनास गटागटाने जथ्येरूपात येणारे भक्त व त्यांचे गट दिंडी नावाने प्रसिद्ध झाले.

पण हे केवळ गट नव्हते; तर त्यांची काही वैशिष्ट्येही होती. आपापल्या स्थानावरून दिंडारवनांतील मस्तकावर शिवलिंग धारण करणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनास येणारे हे वारकरी विठ्ठलाची गुणवर्णने करणाऱ्या पदांचे गायन-कीर्तन करीत; गीत गात व पंढरपूरला येत. याच वारकरी भक्तांच्या दिंडीचे मोठे मनोहर शब्दचित्र ज्ञानदेवांनी पुढील ओवीत रेखाटले आहे. (भगवद्गीता अ.९ श्लोक १४ वरील टीका )

“कृष्ण विष्णु हरि गोविंद। या नामाचे निरवील प्रबंध।माझी आत्मचर्चा विशद। उदंड गाती॥”

विठ्ठल नामघोष करणारे विठ्ठलावरील प्रबंधाचे गायन करणारे हे भक्तांचे समूह दिंडीरूपाने वारीला येत व पंढरपूरला आल्यानंतर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” हा नामघोष करीत. या घोषात वारकरी संप्रदायाचे पूर्णबीज आहे. ‘पुंडलिक वरद हरि विठ्ठल’ म्हणजेच “पुंडलिकाला वर देणारा हरी विठ्ठल’ हाच दिंडीतील वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. सुदैवाने शके ८१८ मधील कर्नाटकातील लेखांमध्हे ‘डिंडेशवरद ओंकार शिव भट्टारक’ असा उल्लेख येतो. हा उल्लेख व ‘पुंडलिक वरद हरी विठ्ठल’ याच्याशी मिळता-जुळता असून डिंडेश- दिंडी यांचे नाते सांगणारा आहे. त्याचा सरळ अर्थ असा की दिंडीतील भक्तसाधकाचे नेतृत्व शिव करणारा आहे. तेव्हा दिंडार वनातील मस्तकावर शिवलिंग धारण करणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकादशीला जाणाऱ्या भक्तांचा थवा म्हणजेच दिंडी असे दिंडीचे रूप आहे.

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry.

Author : डॉ. म. रा जोशी

डॉ. म. रा जोशी हे जेष्ठ साहित्य संशोधक आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. डॉ. जोशी यांना संत साहित्य आणि मानवतावादी कार्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे “ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार” याने सन्मानित केले आहे. 

5 Comments

  1. विद्या गोरे

    छान माहिती. अजून सविस्तर वाचायला आवडेल. धन्यवाद !!

    Reply
  2. सच्चिदानंद शेवडे

    छान व उपयुक्त माहिती, सविस्तर असायला हवी होती

    Reply
  3. मंजूषा गोखले

    मला वाटते ‘दिंडीरवन’ असे असावे, दिंडारवन नव्हे.

    Reply
  4. अविनाश काशिनाथ जोशी

    त्रोटक माहीतीमुळे समाधान झाले नाही. थोडे अधिक सविस्तर असतेतर सर्वांचेच समाधान झाले असते

    Reply
  5. Padmakar Nafde.

    छान, उपयुक्त माहिती.

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *