कथकली नृत्यशैली
सप्त शास्त्रीय नृत्यप्रकारांपैकी महत्त्वाची असणारी कथकली ही नृत्यशैली. वेगळ्या पद्धतीने सादर केली जाणारी ही नृत्यशैली लोकसंस्कृतीचा विशेष वारसा लाभलेल्या केरळ ह्या प्रांताची आहे. संगीत, नृत्य आणि नाट्य यामार्फत विविध पद्धतीने सादरीकरण या प्रांतात केले जाते. हयामध्ये कुडीअट्टम् हा नृत्य-नाट्य प्रकार आजही तितकाच प्रसिद्ध आहे. ह्याचबरोबर तैय्यम्, भगवती, काली हे सादरीकरणाचे प्रकारसुद्धा प्रसिद्ध आहेत. केरळमधील या विविध लोकनृत्यांपासून कथकली नृत्यशैलीची निर्मिती झाली असे म्हणता येईल आणि ह्यामुळेच साधारण इ. स. वी. सनाच्या १७ व्या शतकामध्ये कथकली शैली पूर्ण विकसित झाली. तरीसुद्धा साधारण १८३० च्या दरम्यान ही नृत्यशैली संपुष्टात येत असतानाच तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक कलाकारांनी हातभार लावला आणि कथकली नृत्यशैलीचे अस्तित्व अबाधित ठेवले. या नृत्यप्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे नृत्य आणि नाट्य ह्या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ ह्या नृत्यप्रकारामध्ये पहायला मिळतो.
कथकली ह्या नृत्यप्रकारामध्ये नृत्याबरोबर नाट्याचा सुद्धा समावेश असल्याने ह्या नृत्यशैलीचे वर्णन करताना ‘नृत्यनाटिका’ असेही संबोधले जाते. ह्या शास्त्रीय नृत्यशैलीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चतुर्विध अभिनयांपैकी (आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक) आहार्य आणि आंगिक अभिनयाचा वैशिष्ट्यपूर्ण केला जाणारा वापर! ह्या नाट्यात्मक नृत्यामध्ये सादरीकरणाच्या वेळी ज्या पात्रांची भूमिका केली जाते, त्या पात्रांची वेषभूषा ही विशेष असते. वेषभूषेसाठी आणि रंगभूषेसाठी प्रखर रंगांचा वापर करतात. तसेच ह्यामध्ये अलंकारदेखील तेवढेच प्रखर असतात. आहार्य अभिनयाचा अत्यंत सूचक वापर ह्या नृत्यप्रकारात केला जातो. कलाकारांना त्यांच्या मूळ व्यक्तिरेखेच्या सत्त्व-रज-तम ह्या गुणांनुसार रंग निवडून रंगभूषा, मुखवटा, मुकुट ह्यांचा वापर केला जातो. ह्यातील रंगभूषेला वैशिष्ट्यपूर्ण नावेदेखील दिली जातात. म्हणजे, थोडक्यात उच्च दर्जाच्या म्हणजे सात्त्विक पात्रांना ‘पच्चा’ म्हणजे हिरवा रंग वापरून त्याभोवती पांढऱ्या रंगाची धनुष्याकृती पट्टी हनुवटीपासून दोन्ही कानापर्यंत लावली जाते. डोळ्यांभोवती जाड काळ्या रेघा ओढल्या जातात. तसेच भुवयांच्या ठिकाणीसुद्धा काळ्या रेघा केसांपर्यंत ओढल्या जातात. याशिवाय, चेहऱ्याच्या उंचीच्या दीडपट उंच असा मुकुट परिधान केला जातो. ‘कट्टी’ नावाच्या रंगभूषेमध्ये तमोगुणी पात्रांचा समावेश असतो. हयामध्ये हिरवा, लाल आणि पांढरा ह्या रंगाचा वापर केलेला असतो. ‘थडी’ ह्या रंगभूषेच्या प्रकारामध्ये निषाद, किरात, गुहेत राहणारे ह्यांचा समावेश होतो. ह्या पात्रांची त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांना अनुसरून रंगभूषा केली जाते. ह्या रंगभूषेमध्ये पात्राच्या वयानुसार काळी किंवा पांढरी दाढी लावली जाते. ह्यानंतरच्या ‘करी’ ह्या प्रकारामध्ये राक्षस, राक्षसिणी ह्यांचा समावेश होतो. ह्या पात्रांच्या रंगभूषेसाठी काळ्या रंगाचा अधिक वापर केला जातो. ह्यानंतर उच्चभ्रू म्हणजेच ब्राह्मण, ऋषी, घरंदाज स्त्रिया ह्या सारख्या पात्रांचा समावेश होतो. ह्या पात्रांसाठी रंगामध्ये अभ्रक मिसळून रंगभूषा केली जाते, हयामध्ये डोळ्यांना आणि ओठांना लाल रंग देतात. तसेच डोळे आणि ओठ प्रत्यक्षापेक्षा मोठे रेखाटले जातात. ह्या रंगभूषेला ‘मिनिक्कु’ अशी संज्ञा आहे. अशाप्रकारे विविध पद्धतीने कथकली मध्ये आहार्य अभिनयाचा विचार केलेला दिसून येतो, आणि ह्या आहार्याला साजेसा असाच अभिनय कथकली मध्ये सादर केला जातो. यामुळे इतर नृत्यशैलींच्या तुलनेत कथकली हा नृत्यप्रकार वैशिष्ट्यपूर्ण वाटतो.
कथकली ही एक सांघिक नृत्यकला आहे. पूर्वी केवळ पुरुष ही कला सादर करत असत. त्यावेळी स्त्रीभूमिकासुद्धा पुरुष साकारायचे. परंतु, सध्याच्या काळामध्ये स्त्रियाही कथकली सादर करताना दिसतात. ह्या नृत्यप्रकाराचे सादरीकरणसुद्धा विशिष्ट पद्धतीने केले जाते. सादरीकरणाच्या वेळी काही वेळा जमिनीवर देवतेचे चित्र रेखाटले जाते, आणि त्या देवतेला उद्देशून नृत्य सादर केले जाते. कथकलीच्या रंग आणि वेषभूषेमुळे कथकलीचे सादरीकरण अत्यंत प्रभावी ठरते.
कथकलीच्या सादरीकरणामध्ये अंग-उपांग ह्यांच्या अत्यंत सूक्ष्म हालचालींचा समावेश असतो. हयामध्ये नाट्यशास्त्रामध्ये उल्लेख केलेल्या करण आणि अंगहारांचा वापर कथकलीमध्ये प्रकर्षाने वापर केला जातो. हयामध्ये एका पायाच्या हालचाली म्हणजेच रेचक, उत्प्लवन म्हणजे उडयांचे विविध प्रकार तसेच युद्धसदृश हालचालींचा समावेश ह्या नृत्यप्रकारामध्ये केला जातो. ह्या शुद्ध नर्तनाला कथकली मध्ये ‘कालसम’ असे म्हटले जाते. अशा कालसमांचे विविध तुकडे कथकलीत सादर केले जातात.
कथकलीच्या रचनाक्रमामध्येदेखील वैशिष्ट्य दिसून येते. कथकलीच्या प्रयोगसादरीकरणापूर्वी चर्मवाद्यांचा नाद केला जातो. त्यानंतर दोन कलाकार लाल पडदा ज्याला जवनिका असे म्हटले जाते तो रंगमंचावर घेऊन येतात. अशा पडदयाचा उपयोग पात्रांच्या आगमन आणि निर्गमन यांसाठी संस्कृत नाटकातदेखील केला जात असे. कथकलीमध्ये ह्याच कारणास्तव पडदयाचा उपयोग केला जातो. हा पडदा रंगमंचावर आणल्यानंतर त्या पडद्याच्या मागूनच केवल पादाघाताने रंगमंच वंदना सादर केली जाते. ह्यानंतर मुख्य नर्तक प्रवेश करुन ‘पुडापुड्डा’ नावाची रचना सादर केली जाते. अभिनयावर आधारित ह्या रचनेमध्ये डोळ्याच्या हालचालीतून तालाचे आघात दाखवले जातात. ह्यानंतर सूत्रधार नायक-नायिकेचा परिचय करुन देतो. नायक-नायिका हस्ताभिनय आणि मुखाभिनय यांच्या साहाय्याने प्रणयप्रसंगांचे सादरीकरण करतात. ह्यानंतर ‘तिरानोक्कु’ ही रचना सादर केली जाते. ह्या रचनेत सज्जनांविरुद्ध दुर्जन असे द्वंद्व सादर केले जाते. अशा पद्धतीने कथकलीच्या प्रयोगाचे सादरीकरण केले जाते. कथकली प्रयोगासाठी कोणत्याही विशेष प्रकारचे नेपथ्य वापरले जात नाही. रंगमंचावर बसण्यासाठी एक लाकडी ठोकळा ठेवला जातो, आणि रंगमंचावर मोठ्या आकाराच्या समया ठेवल्या जातात. अर्थात ही पूर्वीच्या काळात वापरली जाणारी पद्धत होती. सध्याच्या काळात प्रकाशयोजना करुन प्रयोग सादर केले जातात.
कथकली ह्या शास्त्रीय नृत्यशैलीतील साहित्यसुद्धा विशेष असते. कथकली नृत्याच्या सादरीकरणासाठी अनेक नृत्यनाटिकांची रचना केली गेली. या विशेषतः गीतगोविंदम् ह्या जयदेवरचित संस्कृत काव्यावर आधारित आहेत. तसेच रामायण, महाभारत ह्या प्रसिद्ध काव्यांवरसुद्धा अनेक नृत्यनाटिकांची रचना झाली. नृत्यनाटिकांपैकी गीतगोविंदम् वर आधारित कृष्णाट्टम् आणि तसेच रामायणावर आधारित रामनाट्टम् ह्या रचना प्रसिद्ध आहेत. ह्यानंतर कार्तिक तिरुनाल, अश्विनी तिरुनाल ह्यांसारख्या कलाकारांनी कथकलीसाठी रचना निर्माण केल्या.
कथकली ही नृत्यशैली केवळ केरळ प्रांतात नाही तर भारतभर आजही सादर केली जाते. आधी उद्धृत केल्याप्रमाणे १८३० नंतर हा नृत्यप्रकार मृतप्राय झाल्यानंतर १९३२ साली केरळ कलामंडलम् ह्या नावाच्या संस्थेने ह्या नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देऊन ह्या नृत्यप्रकारात बदल घडवून ह्या शैलीला पुनरुज्जीवित केले. ह्या नृत्यप्रकाराला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी श्री गोपीनाथ, रागिणीदेवी, माधवन् कृष्णन्, शिवरामन् ह्या कलाकारांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. आजही चेन्नईच्या कलाक्षेत्र ह्या विद्यापीठा कथकली ह्या नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते. आजही अनेक कलाकार विशेषत्त्वाने ह्या शैलीचे प्रशिक्षण घेऊन भारतात आणि भारताबाहेरसुद्धा ही शैली सादर करतात. ह्या सर्व वैशिष्ट्यांमुळे कथकली ह्या नृत्यप्रकाराचा सप्त प्रमुख भारतीय शास्त्रीय शैलींमध्ये समावेश केला जातो.
ह्या लेखमालेतील तिसरा लेख इथे वाचा.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry.
Author : अक्षता चंद्रकांत जेस्ते.
अक्षता ह्या १८ वर्षांपासून भरतनाट्यम् शिकत आणि शिकवीत आहेत. तसेच डेक्कन महाविद्यालय येथे संस्कृत साहित्यातील छंद आणि ताल याविषयावर त्यांचे पी. एच. डी. प्रबंधाचे लिखाण सुरु आहे.
छान झालाय लेख. बरीच नवी माहिती मिळाली
धन्यवाद केदार🙂
नेहमीप्रमाणे उत्तम.. अभ्यासपूर्ण…👌
धन्यवाद