Itihāsa | इतिहास

Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.

प्राचीन भारत समजून घेताना

by | May 1, 2020 | 3 comments

कोणत्याही देशाच्या व्यक्तिमत्वावर त्या देशाच्या वर्तमानाचा जितका प्रभाव असतो, तितकाच भूतकाळाचादेखील असतो. प्राचीन संस्कृती लाभलेले चीन, ग्रीस, इटली यांच्यावर असलेल्या त्यांच्या भूतकाळाचा प्रभाव तेथील नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातूनही दिसून येतो; पण या बाबतीत सर्वांत लक्षणीय उदाहरण म्हणजे भारत!

भारतात खाण्यापासून राहण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला विशिष्ट कारण आणि इतिहास आहे, असे मानले जाते. भारतात कोणतीही गोष्ट काल-आजकडे जन्माला आलेली नाही, तर ती दीर्घ काळापासून येथे अस्तित्वात असावी, असा आग्रह सर्वत्र दिसून येतो. भारताला आपल्या भूतकाळाविषयी केवळ आदर नसून त्याविषयी फार मोठे कुतूहलदेखील आहे. रोजच्या जगण्यात आपण ‘प्राचीन भारत’ हा शब्द अगदी सहज वापरतो. ‘अमूक गोष्ट प्राचीन काळापासून भारतात आहे’ किंवा ‘तुम्ही नवीन काय सांगताय, हे तर आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे,’ अशी वाक्ये सर्वत्र ऐकू येत असतात.

‘प्राचीन भारत’ म्हणजे काय, ‘प्राचीन भारतीय संस्कृती म्हणजे काय, प्राचीन भारतीय संस्कृती कोणत्या कालगणनेनुसार मानायची, तिची वैशिष्ट्ये काय, या प्रश्नांची उत्तरे शोधलीत, तर ती तुम्हाला भारतातील सामान्य नागरिकांमध्ये दिसून येतील.

अनेकदा ‘प्राचीन भारता’चा अभिमान बाळगणाऱ्यांना तो कालखंडदेखील नीट माहीत नसतो. अनेकदा मध्ययुगीन पुरावे प्राचीन कालखंडाचे म्हणून सादर केले जातात आणि अत्यंत चुकीच्या व प्रमाणहीन संकल्पनांनी प्राचीन भारत उलगडून दाखवला जातो. या प्रश्नांच्या, शंकांच्या पार्श्वभूमीवर प्राचीन भारत अजूनच धूसर आणि रहस्यमय होतो. अशा फसव्या संकल्पनांची पडताळणी करण्याऐवजी त्यांना मोठं करणे, असा सोपा मार्ग सहजपणे स्वीकारला जातो.

खरे म्हणजे, याच गूढतेमुळे, प्राचीन भारताच्या कुतूहलाने मला या विषयावर अभ्यास करण्यास प्रवृत्त केले आणि ‘भारतीय विद्याशास्त्र’ नावाचे नवे दालन माझ्यासाठी खुले झाले. हा लेखनप्रपंच आपला इतिहास आणि संस्कृती समजून घेण्यासाठी आहे. प्राचीन भारत समजून घेण्यासाठी आपण आधी त्याचा इतिहास समजावून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची ओळख करून घेऊ. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती यांची उपलब्ध साधने जगातील इतर देशांच्या इतिहासाच्या उपलब्ध साधनांपेक्षा कमी आहेत. काही ऐतिहासिक ग्रंथ, लिखाण आणि पुराव्यांचा यांचे अपवाद वगळता, ठोस साधने किंवा अस्सल पुरावे नाहीतच असे म्हणावे लागेल.

प्राचीन भारतीय साहित्य पाहता, त्या काळी ऐतिहासिक लिखाण होत असावे; पण काळाच्या प्रभावात ते नष्ट झाले असावे, असे मानणारा एक मतप्रवाह आहे. या सर्वांत ऐतिहासिक घटना अथवा एखाद्या घटनाक्रमाचा उल्लेख इतर साहित्यात येत नाही. यावरून भारतात असे लिखाण करायची परंपरांची नसावी, असेही मानले जाते. काही जणांच्या मते, अत्यंत प्रभावी अशी मौखिक परंपरा असल्याने, या लिखाणाची गरज भासली नसावी. मात्र, सर्वसाधारणपणे याकडे पहिले, तर एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे, प्राचीन भारतीयांना इतिहासाची जाण होती.

प्राचीन ऋषी, धर्मगुरू, महात्मे, राजे आणि राजवंश यांचे उल्लेख वैदिक, बौद्ध आणि जैन ग्रंथात अनेकदा येतात. प्राचीन राजघराणी, राजे आणि त्यांची राज्ये यांचे वर्णन करणाऱ्या गाथा, काव्ये सापडतात. हे सारे असले तरीही, प्राचीन भारतात घडलेल्या प्रत्यक्ष घडामोडींचा आढावा घेऊन, इतर साधनांचा वापर करून सुसंगत असा इतिहास, भावी पिढीसाठी लिहून ठेवावा, असे तत्कालीन भारतीयांना वाटले नाही, हेही सत्यच आहे. त्यामुळे इतकी प्रचंड साहित्यनिर्मिती होऊनही, भारतात हिरोटोडस, थ्यूसिडायडस, टॉलिसस यांच्यासारखे इतिहासकार होऊ शकले नाहीत.

प्राचीन भारत समजून घेताना वैदिक संस्कृत, अभिजात संस्कृत, पाली आणि प्राकृत या भाषांमधील साहित्य हा मोलाचा आधार ठरतो. विविध कालखंडातील लोकांचे जीवन, समाजव्यवस्था, राजकारण, धर्म, तत्त्वज्ञान, कला व शास्त्रे अशा विविध विषयांचे प्रतिबिंब त्यात दिसून येते.

वेद हे प्राचीनतम साहित्य जसे त्या काळात होते, तसेच आजही आहे. तो भारतीय धर्माचा आणि ज्ञानाचा मूलस्रोत आहे. रामायण व महाभारत या महाकाव्यांची लोकप्रियता आजही तसूभरसुद्धा कमी झालेली नाही. पुराणे आजही भारतीय जीवनाचा मुख्य आधारस्तंभ, मूलस्रोत आहे. जैन आणि बौद्ध परंपरांचे दर्शन प्राकृत आणि पाली साहित्यातून होते. वैदिक परंपरेसोबतच वाटचाल करणाऱ्या या अवैदिक परंपरांचे महत्त्व खूप मोठे आहे.

प्रागैतिहासिक काळापासून भारतात कला, स्थापत्य आणि मूर्तिकलेचे पुरावे सापडतात. विविध कालखंडात विविध धर्म आणि पंथांशी निगडित मंदिरे व लेण्यांतील देवतांच्या मूर्ती सापडतात. भारतीय मंदिरशिल्पे आणि वास्तूशिल्पे यांची ख्याती जगन्मान्य आहे. प्राचीन राजघराणी जसे की, मौर्य, शुंग, सातवाहन, कुशाण, गुप्त आणि चालुक्य यांनी या कलांना प्रोत्साहन दिले. या काळात विकसित झालेल्या या कलांचा अभ्यासही प्राचीन भारत समजून घेताना होतो.

भारतीय संस्कृतीचा प्रसार मध्य आशियापासून अतिपूर्वेकडील देशांपर्यत झाला. बौद्ध व हिंदू धर्माच्या प्रसारामुळे येथील संस्कृती तिथे गेली. मध्य आशिया, अफगाणिस्थान, तिबेट, नेपाळ, चीन, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, जपान अशा विविध देशांमधील संस्कृतीवर, भाषांवर किंबहुना राहणीमान, विचारपद्धती यावरील भारतीय प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या सोबतच प्राचीन भारतीय इतिहास हा उत्खननातील पुरावे, प्राचीन नाणी, ऐतिहासिक वास्तू, शिलालेख, ताम्रपट आणि परकीय इतिवृत्ते यांच्या आधारे शोधता अथवा मांडता येतो.

भारतात विविध कालखंडात विविध वंशाचे लोक स्थलांतरित झाले आहेत. त्यांचे आगमन नव्या संस्कृतीला घेऊन आले व इथल्या संस्कृतीशी त्यांच्या संस्कृतीचा संगम होऊन एक नवीन संस्कृती उदयास आली. सध्याचा भारतीय समाज आणि संस्कृती यातील विविधतेचे मूळ या विभिन्न प्रवाहांच्या एकत्रीकरणात आहे.

‘कल्चर’ या इंग्रजी शब्दाला ‘संस्कृती’ हा प्रतिशब्द रूढार्थाने वापरला जातो; पण संस्कृती या शब्दाची मूळ व्याख्या आणि व्याप्ती मोठी आहे. धर्म, तत्त्वज्ञान, कला, राजकीय-सामाजिक स्थिती, साहित्य, शास्त्रे, नीती-कायदे या सर्वांचाच समावेश संस्कृतीत होतो. यामुळे संस्कृतीची सुरचित व्याख्या करणे अवघड आहे.

प्रकृती, विकृती आणि संस्कृती यांचा सामुदायिक विचार या संदर्भात उपयोगी ठरू शकतो. प्रकृती म्हणजे मूळ भावना अथवा निसर्ग. विकृती म्हणजे त्यातील अनिष्ट बदल आणि संस्कृती म्हणजे या दोघांच्या अनुषंगाने होणारा अथवा केलेला इष्ट प्रयत्न. त्यामुळे साहजिकच संस्कृती ही एक प्रकारे कृत्रिम, प्रयत्नसाध्य गोष्ट आहे. मानवी समाजाने आपल्या सुखासाठी, समृद्धी व विकासासाठी प्राचीन काळापासून जे प्रयत्न केले, त्याचे दृश्य फलित म्हणजे संस्कृती होय.

भारतासारख्या खंडप्राय देशात किमान ५ हजार वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या मानवी समूहांनी ही संस्कृती जन्माला घातली, जगवली, वाढवली. त्यामुळे विविधतेची एक वेगळीच झालर या संस्कृतीवर आहे. तरीही या विविधतेत काही एकात्म मूल्ये आहेत. या संस्कृतीला एक अखंड परंपरा आहे. एखाद्या विशिष्ट धार्मिक अथवा राजकीय सत्तेमध्ये ती केंद्रित नाही, ही संस्कृती संघर्षापेक्षा संगमाची वाट धरणारी आहे, म्हणूनच एकरूपता हा या संस्कृतीचा कणा आहे.

संदर्भ :

१. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती- डॉ. गो. म. देगलूरकर, डॉ. म. के. ढवळीकर, प्रा. रा. हा. गायकवाड (पॉप्युलर प्रकाशन)

२. प्राचीन भारतीय इतिहासाची साधने – शोभना गोखले (केसरी मुद्रणालय)

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry

Author : शरयू मयूर

शरयू या MIT School of Government मध्ये सहयोगी संशोधक म्हणून कार्यरत असून प्राच्यविद्या त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.

3 Comments

  1. Nikhil puranik

    अप्रतिम लेख.. माहितीपूर्ण….

    Reply
  2. Chandrashekhar Jogdeo

    खूप छान माहिती, प्राचीन भारताची तोंडओळख होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण लेख.

    Reply
  3. Dashrath Lode

    सर खालील पुस्तक कुठे उपलब्ध होईल?

    १. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती- डॉ. गो. म. देगलूरकर, डॉ. म. के. ढवळीकर, प्रा. रा. हा. गायकवाड (पॉप्युलर प्रकाशन)

    Reply

Trackbacks/Pingbacks

  1. प्राचीन भारत समजून घेताना : उत्तरार्ध - Mimamsa - […] लेखमालेतील पहिला लेख इथे […]

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *