Itihāsa | इतिहास

Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.

भीष्मनिर्वाण

by | May 16, 2020 | 18 comments

महाभारतकार व्यासांनी ‘जय नाम इतिहासोsयम्’ म्हंटले आहेत. हा इतिहास आहे. आपल्या राष्ट्राची वाङ्मयीन, आध्यात्मिक, तत्वचिन्तनात्मक,  मार्गदर्शक, ऐतिहासिक महाधरोहर. महाभारताचे  कालातीत मार्गदर्शक सामर्थ्य वादातीत आहे. वैयक्तिक आयुष्यात कसं वागावं हे तर महाभारत शिकवतंच, कसं वागू नये हे देखील निक्षून बजावतं. समाज आणि राज्य पातळीवर देखील राजा कसा असावा, प्रजा कशी असावी, मंत्री कसे असावेत , हेर कसे असावेत ह्याबद्दल महाभारत ग्रंथ मोठ्या विस्ताराने बोलतो. विदुरनीती, कृष्णनीती ह्या अतिशय उत्तम संदर्भसंहिता आहेत. आध्यात्मिक पातळीवर एवढे एक लक्ष श्लोकांचे मंथन करून जे नवनीत वर आले ते म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून जन्माला आलेली श्रीमद्भगवद्गीता.

भगवद्गीतेच्या सामर्थ्याचे अतिशय प्रभावशाली असे विवेचन करताना प्रसिद्ध लेखक आणि वक्ते कै. राम शेवाळकर म्हणतात:

“कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही माणसाला अर्जुनावस्था प्राप्त झाली, मोह झाला, काय करावं आणि काय करु नये ह्याचा पेच पडला – तर आयुष्यामध्ये त्याला कर्तव्यप्रवृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य गीतामाऊली अद्याप अक्षुण्ण राखून आहे. गीतेच्या १८ अध्यायांचा क्रम न बदलता, अध्यायांमधील श्लोकांचा क्रम न बदलता, श्लोकांमधल्या चरणांचा क्रम न बदलता, चरणांमधल्या शब्दांचा क्रम न बदलता, शब्दांमधल्या अक्षरांचा क्रम न बदलता, अक्षरांमधल्या मात्रांचा क्रम न बदलता, कुठेही अर्थाची ओढाताण न करावी लागता, पाठभेदाचा स्वीकार करावा न लागता आणि गीतेच्या मूळ प्रकृतीला कुठेही दुखापत न होऊ देता – त्या त्या काळाला आवश्यक असणारा युगसंदेश प्रसवण्याची क्षमता गीतामाऊलीच्या गर्भात अद्याप सुरक्षित आहे!”

म्हणूनच महाभारताला भारतीय जनमानसात एक विशेष स्थान आहे. ह्याबद्दल लहानपणापासूनच भरपूर वाचन केलंय. कादंबऱ्या तर ठीक पण व्यासांच्या महाभारतावर आधारित पुस्तकं पण वाचलीत, ज्यात सगळ्या व्यक्तिरेखा थेट व्यासांच्या महाभारतातले श्लोक उलगडून चित्तारल्या आहेत. हे सगळं सगळं वाचताना मन सर्वात जास्त खिन्न करणारा प्रसंग नेहमी भीष्मनिर्वाणाचाच!

भीष्मांना विशेषण द्यावयाचे झाले तर शब्द कमी पडतील. कुरुकुलाने ह्यांचे नाव लावावे असे हे कुरुकुलश्रेष्ठ भीष्म. परशुरामांनी ह्यांच्या शौर्याचे गोडवे गावे असे हे परशुराम शिष्य भीष्म. सर्वदृष्ट्या योग्य असूनही पित्याच्या आनंदाकरिता राज्याच्या त्याग केलेले पितृभक्त राजर्षी भीष्म. पांडव कौरवांना, आपल्या नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवणारे वात्सल्यमूर्ती भीष्म. आपल्या  गुरु परशुरामांना देखील रणात मात देणारे रणकर्कश भीष्म. आपला शब्द आणि नीती यांचे कधीही पतन होऊ न देणारे नीतीमान भीष्म.

मला भीष्मांशी कुठेच तक्रार नाही, एक द्रौपदीला सभेत आणल्याचं दुर्दैवी प्रकरणी त्यांची भूमिका वगळता! अक्षम्य होता तो एकमात्र प्रसंग संपूर्ण कुरुवंशाला, जो तत्कालीन भरतसमाजाचा प्रतिनिधित्व करीत होता. तिथे आपल्या शौर्यापेक्षा आपल्या मर्यादांमध्ये गुरफटलेले भीष्म मला थोडे खुपले. ज्या समाजात राजकीय सत्पुरुषांना एका स्त्रीच्या अब्रूपेक्षा आपली राजकीय कर्तव्य आणि वैय्यक्तिक प्रतिज्ञा जास्त महत्वाच्या वाटल्या तो समाज म्हणूनच शिक्षापात्र झाला. त्या समाजाचा सर्वनाश करून नवीन समाजनिर्मिती करण्यास इतका मोठा नरसंहार श्रीकृष्णाने पत्करला. महाभारत युद्ध कृष्णाची समाजक्रांतीच होती. भीष्म-द्रोण यांसारख्यांची समिधा त्या क्रांतीयज्ञात कृष्णाने हा हा म्हणता स्वाहा केलीच.

भीष्मांनी पण त्याच दुर्घटनेची जवाबदारी म्हणून शरशय्येचं प्रायश्चित्त घेतलं असावं. ते प्रायश्चित्त पूर्णत्वाला येतानाचा निर्वाणाचा तो क्षण मानवी हृदय पिळवटून काढणाराच. त्याची सल आपल्यालाच इतकी जाणवते, पांडवांचं कायच झालं असेल!  भीष्म म्हणजे करुकुलाचे प्राणच. शंतनू ते परीक्षित अशा तब्बल सहा कुरुपिढ्या जगलेला हा महामानव म्हणजे पांडवांचेसुद्धा छत्र होते. त्यांचे जाणे म्हणजे आभाळ फाटणे होते. दैवदुर्विलास पहा, अशा भीष्मांचा वध कसा करावा ह्यासाठी विचारणा करण्यास स्वयं ज्येष्ठ पांडुपुत्र युधिष्ठिराला त्यांच्याचकडे जावे लागले होते. ज्या अर्जुनाचे त्यांनी बालपणापासून सगळे लाड पुरवले, निर्व्याज प्रेम केले, इतकं की भीष्मांनी उद्योगपर्वात असे म्हंटले आहे की धनुर्विद्येत पारंगत अर्जुनामध्ये मी माझे स्वतःचे रूप बघतो, अशा भीष्मांना वेदनामय शरशय्येवर झोपवणाऱ्या अर्जुनाच्या काळजात किती बाण रुतले असतील! अशा पोरकेपणाच्या भयाण जाणीवेनं छिन्न विच्छिन्न झालेल्या पांडवांच्या पाठीवर सांत्वनाचा हात ठेवायला सुदैवाने योगेश्वर श्रीकृष्ण त्यांच्या सोबतीला होते.

ही अशी पार्श्वभूमी चिंतिता कुठलेही संवेदनशील मन हेलावून निघेल ह्यात शंका नाही. आपल्या सारख्यांचे काय ते कौतुक! ह्या प्रसंगी तर स्वयं श्रीकृष्णनां गहिवरून आलंय. महाभारतकारांनी तसा आवर्जून उल्लेख केला आहे. पांडवांचा निरोप घेऊन झाल्यावर भीष्म आपला देह ठेवण्याआधी श्रीकृष्णाला म्हणाले,

” हे पुरुषोत्तमा, या पुढे माझ्या पांडवांचं रक्षण तुझ्या हाती आहे. दुर्बुद्धी दुर्योधनाला मी कैकवार सांगितले होते ‘यतः कृष्णस्ततो धर्मः यतो धर्मस्ततो जयः’ (जिथे कृष्ण आहे तिथेच धर्म आहे आणि जिथे धर्म आहे तिथेच विजय). पण माझं त्याने ऐकलं नाही आणि स्वतःची दुर्गती करवून घेतलीच. संपूर्ण कुलक्षयदेखील घडवून आणला.”

इथे भीष्म कुरुकुलश्रेष्ठ आपल्या दोषी नातवाच्यावतीने साक्षात भगवंताची क्षमा मागत आहेत. पुढे भीष्मांनी श्रीकृष्णाकडे अनुज्ञा प्रार्थिली:

स मां त्वमनुजानीहि कृष्ण मोक्ष्ये कलेवरम् |

त्वयाsहं समनुज्ञातो गच्छेयं परमां गतिम्  || 45 ||

                                                      – महाभारत, अनुशासनपर्व अध्याय  167

‘हे श्रीकृष्णा आता मला आज्ञा दे, की मी माझा देह ठेवतो.  तुझ्याच अनुज्ञेने मला परमगती म्हणजेच मोक्ष प्राप्ती होईल’. हे त्या गंगापुत्र शांतनव देवदत्त भीष्माचे शेवटचे उद्गार होते. पुढे श्रीकृष्ण देखील गहिवरले. ते भीष्मांना संबोधून म्हणाले :

अनुजानामि भीष्म त्वां वसून्प्राप्नुहि पार्थिव |

न तेsस्मि वृजिनं किञ्चिद् इहलोके महाद्युते || 46 ||

पितृभक्तोsसि राजर्षे मार्कण्डेय इवापरः |

तेन मृत्युस्तव वशे स्थितो भृत्य इवानतः || 47 ||

                                                    – महाभारत, अनुशासनपर्व  अध्याय 167

‘हे महातेजस्वी भीष्म, मी आपणास अनुमती देतो आपण आपले वसुस्वरूप प्राप्त करते व्हा (देवदत्त भीष्म हे वसूचे अवतार). आपल्या ह्या इहलोकी आयुष्याला यदकिंचितही डाग नाही. (श्रीकृष्णाने भीष्मांचे प्रायश्चित्त पूर्णत्वाला गेल्याची ग्वाही  इथे दिली आहे. त्याचबरोबर भीष्मांनी जी दुर्योधनादी खलकुरुंच्या वतीने क्षमा मागितली ती पण स्वीकारल्याचा बोध आपणास ह्या वचनाद्वारे होतो.) आपली पितृभक्ती जिची तुलना केवळ राजर्षी मार्कंडेयांशी केली जाऊ शकते, जिच्या प्रभावामुळे मृत्यू आपला दास होऊन आपली वाट बघत तिष्ठत, नतस्थित आहे’

ऐकोनि वचन हृषीकेशाचे ।

चैतन्य भीष्म श्वेतकेशाचे ।

स्वर्गारोहणी मार्गक्रमण ।

कुरु सकल करिती वंदन ।।

पांडवांनी भीष्माचार्यांच्या देहाच्या अंत्य विधीकरिता चिता रचिली. युयुत्सुने त्यास साहाय्य केले. युधिष्ठिराने मुखाग्नी दिला. तिलांजली तर्पण करते झाले होतेच की तिथे माता गंगा मानवरूपात प्रकटल्या. माता गंगेचा शोक इतका अनावर होता की तिचे सांत्वन करण्यास श्रीकृष्ण आणि स्वयं व्यासांना महत्प्रयत्न करावे लागले.

Author : अमेय रानडे 

श्री अमेय रानडे हे भारतीय इतिहास, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.

 

18 Comments

  1. Shweta Muley

    वाह क्या बात है अमेय खूप समर्पक शब्दात पूर्ण अभ्यास करून तू हा लेख लिहिला खूप छान माहिती मिळाली असाच लिहित रहा शुभेच्छा

    Reply
    • Ameya Ranade

      धन्यवाद 🙏🏼

      Reply
    • Anita Joshi

      Wa Amey Chan lihila ahes lekh

      Reply
  2. Anjali Ranade

    छान अभ्यासपूर्ण लेख आहे 😀

    असाच असल्यास नित्य सुरु ठेवून लेख वाचायला मिळाले ही इच्छा आहे 😀

    Reply
    • Ameya Ranade

      धन्यवाद आई

      Reply
  3. Amol

    Nice article

    Reply
    • Ameya Ranade

      धन्यवाद

      Reply
    • Prasad Pendharkar

      Khup chaan Ameya

      Reply
  4. Prasad Godbole

    Chan abyaspurna Lekh! & Best luck for your new venture..

    Reply
    • Dr. Vivek Narayan Bhave

      पितामह भीष्म यांच्या वर मोजक्या शब्दांत सांगायचं तर त्या साठी भरपूर वाचन केल्या शिवाय लिहिणे शक्य नाही. भीष्माचार्य यांच्या व्यक्तिमत्वा वर एक सुंदर आलेख. खूप खूप अभिनंदन अमेय.

      Reply
      • Ameya Ranade

        नमस्कार, आपल्या प्रोत्साहनाकरता मनःपूर्वक धन्यवाद

        Reply
  5. Chetan Raut

    Informative compilation of the story of Bhishmacharya..

    Reply
  6. प्रतीक्षा ठाकूर

    अमेय,छान.अभ्यासपूर्ण लेखन. भाषाही छान,

    Reply
  7. Beena

    Superb Amey Kharach chhan

    Reply
  8. Brijesh Patil

    खूप सुंदर लिहिलेस अमेय!!!
    अजून लिखाण करत रहा!!!

    Reply
  9. मंगेश

    खूप छान माहीती आहे, असाच एक लेख अश्वत्थामा वर पण वाचायला आवडेल.

    Reply
    • Ameya Ranade

      आपल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहना करिता सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

      @मंगेश जी: अश्वत्थामा हा विषय खरच चांगला सुचवला आहे. नक्की त्यावर देखील लिहीन मी

      Reply
  10. Smita kudtarkar

    Chaan!!! Ajun kahi lihil asel tar vachayala avadel.

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *