सहोदर कुङ्कुमकेसराणां भवन्ति नूनं कविता विलासाः।
न शारदा देशमपास्य दृष्टस्तेषां यदन्यत्र मया प्ररोहः।।
कवितेला फुटलेली पालवी आणि सुकुमार केशर हे निश्चितपणे सहोदर आहेत. त्यांचे जन्मस्थान एकच आहे. कारण मी शारदाभूमी – कश्मीर वगळता अन्यत्र त्यांचा असा उत्फुल्ल बहर पाहिलेला नाही.
काव्य आणि केशर फुलते ते कश्मीरातच! हे गौरवोद्गार आहेत कश्मीरमधे जन्मलेल्या महाकवी बिल्हणाचे. अर्थातच या वचनात अतिशयोक्ती आहे आणि ती कश्मीर प्रदेशावरच्या प्रेमापोटी आहे. पण कश्मीरचे साहित्यक्षेत्रातील योगदान पाहता अशी प्रौढी मिरविणे सार्थ म्हणावे लागेल. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे बिल्हणही कश्मीरला शारदादेश म्हणतो आहे.
संस्कृत साहित्यात कवी वा ग्रंथकार सहसा आपली माहिती देत नाहीत. याला जे अपवाद ठरतात अशा कवींमध्ये बाणभट्ट हा एक महत्त्वाचा कवी आहे. सुदैवाने कश्मीरमधील अनेक कवी आणि काव्यशास्त्रज्ञ स्वतःविषयीचा परिचयात्मक मजकूर त्यांच्या ग्रंथातून देतात. त्यातून त्या प्रतिभावंताची माहिती तर मिळतेच पण कश्मीरमधील ज्ञानपरंपरेचेही चित्र डोळ्यासमोर उभे राहते. बिल्हण हा त्याच परंपरेतला महत्त्वाचा महाकवि! तो राजतरंगिणीकार कल्हणाचा समकालीन आहे.
बिल्हणाचा जन्म कश्मीरमधल्या वेदाभ्यासाची परंपरा असणा-या प्रतिष्ठित कुळात झाला. कश्मीरचे राजे हे नेहमीच विद्वानांचे आश्रयदाते म्हणून विख्यात राहिले आहेत. कश्मीर प्रांतातील राजे विद्वानांचा ‘राजानक’ ही पदवी देऊन गौरव करीत. आनंदवर्धन, मम्मट, महिमभट्ट, रुय्यक, क्षेमेंद्र, मंखक हे सगळे ‘राजानक’ होते. स्वतः बिल्हण हा कौशिक गोत्रीय ब्राह्मण होता. त्याच्या पूर्वजांना राजा गोपादित्याने कान्यकुब्जाहून बोलावून घेऊन कश्मीरात वसविले होते. राजतरंगिणीदेखील या घटनेला दुजोरा देते. बिल्हणाचा जन्म होईस्तोवर त्याच्या कित्येक पिढ्या कश्मीरातच राहिलेल्या आहेत. त्याच्या पित्याचे नाव ज्येष्ठकलश आणि आईचे नाव नागादेवी. ज्येष्ठकलश शिक्षक होते. त्यांच्या घराचे अंगण, नेहमी विद्यार्थ्यांनी फुललेले असायचे, असे बिल्हण सांगतो. बिल्हणाचे पणजोबा मुक्तिकलश यांच्यापासून घरात विद्येचा वारसा चालत आल्याचे तो सांगतो. मुक्तिकलश कवीही असावेत. आज त्यांचे काव्य उपलब्ध नसले तरी कविकण्ठाभरणात पुढील श्लोक त्यांच्या नावावर आढळतो –
द्वन्द्वो द्विगुरपि चाहं मद्गेहे नित्यमव्ययीभावः।
तत्पुरुष कर्मधारय येनाहं स्यां बहुव्रीहिः॥
माझ्या घरी द्वंद्व आहे म्हणजेच मी व बायको आहोत, दोन बैल (द्विगु)आहेत, माझ्या घरी सतत पैसे खर्च करण्यासारखी परिस्थिती नसते (अ–व्ययीभाव), तेव्हा हे पुरुषा, (तत्पुरुषा) असे काम कर (कर्म धारय) ज्यायोगे मला पुष्कळ धान्य मिळेल. (व्रीही – धान्य) या मुक्तिकलशाचा मुलगा राजकलश म्हणजे बिल्हणाचे आजोबा. हे संग्रामराजाचे मंत्री असावेत. त्यांच्या काळात कुटुंबाची आर्थिक सुबत्ता कळसाला असावी कारण त्यांनी विहिरी बांधल्या, उद्याने विकसित केली. विशेष म्हणजे त्यांनी व्याख्या–भवने निर्माण केली. व्याख्या–भवन म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी टाऊन हॉलसारखी जागा. बिल्हणाचे गाव आहे खोनमुख. ते राजधानीच्या गावापासून, प्रवरपुरापासून जवळ असले तरी मोठे शहर नव्हे पण तेथे व्याख्या–भवनासारख्या सोयी कश्मीरच्या सुबत्तेचे द्योतकच म्हणाव्या लागतील. या राजकलशाचा मुलगा ज्येष्ठकलश, जो बिल्हणाचा पिता आहे, त्याने पातञ्जल महाभाष्यावर टीका लिहीली होती. ही टीका ‘अखिलजनवंदनीय‘ ठरली. यावरुन ज्येष्ठकलशाचा व्याकरणशास्त्रामधला अधिकार लक्षात यावा. त्याला तीन मुले– इष्टराम, बिल्हण आणि आनंद. तिघेही विद्वान. इष्टरामाचा अनेक राजांकडून गौरव झाला होता तर आनंद कवी होता. तो पुढे राजा हर्ष कश्मीरचा राजा झाला तेव्हा त्याचा मंत्री झाला असावा. अशा घरात मोठा झालेला बिल्हण व्यासंगी होताच पण त्याला प्रतिभेचे देणे लाभले होते. कश्मीरमध्ये असं कोणतंही नगर वा गाव नव्हतं जिथे स्त्रीपुरुषांच्या ओठी त्याची कविता नव्हती. असा हा कवी वयाच्या तिशी–पस्तीशीच्या टप्प्यावर ‘कश्मीरेभ्यः सकलमलं शास्त्रतत्त्वं गृहीत्वा‘, कश्मीरची ज्ञानपरंपरा उरी कवटाळून; तिचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी कश्मीर सोडून बाहेर पडला.
लक्षात घेण्यासारखी बाब ही की ‘स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते‘ हा भारतात केवळ सुविचार नाही तर नित्य आचार होता. बिल्हणाची ही यात्रा अभ्यासण्यासारखी आहे. तो पांचालमार्गे मथुरेला गेला मग वृंदावनला गेला. तिथे तो काही काळ राहीला. तिथे त्याचा शिष्य परिवार तयार झाला. मग तो कनोजला गेला. मग प्रयागला जाऊन तो वाराणसीत पोहचला. तिथे गंगाधर नावाच्या विद्वानाला त्याने पराभूत केले. त्याची कीर्ती अधिक वाढली. मग तो अयोध्येला गेला. तिथे त्याने रामावर काव्य लिहिले, जे आज उपलब्ध नाही. मग तो राजा भोजाकडे गेला पण त्याची आणि राजा भोजाची भेट होऊ शकली नाही. तिथून त्याने गुजरात गाठले. सोमनाथाचे दर्शन घेतले. अनहिलपट्टनला (आजच्या पाटण्याला) त्याच्या ‘कर्णसुंदरी’ या नाटकाचा प्रयोगही झाल्याचे कळते. हे नाटक गुजरातच्या राजा कर्णाच्या प्रेमकथेवर बेतलेले होते. पण इथेही तो रमला नाही. त्याने थेट कर्नाटक गाठले. तो चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा, याच्या दरबारी पोहोचला. तिथे त्याला निळ्या छत्रीचा आणि हत्तीचा मान मिळाला आणि विद्यापती या उपाधीने त्याला गौरविण्यात आले. इथेच बिल्हणाने ‘विक्रमाङ्कदेवचरितम्’ हे महाकाव्य लिहिले. तत्कालीन भारताचे ऐतिहासिक आणि सामाजिक चित्र मांडणारे काव्य म्हणून ते अतिशय मोलाचे ठरते. अठरा सर्गांच्या या काव्यात त्याने शेवटच्या सर्गात स्वतःविषयी व कश्मीरविषयी माहिती दिली आहे. एक कवी कश्मीरपासून रामेश्वरपर्यंत प्रवास करुन आपला ठसा उमटवतो; ही घटना भारताचे अखंडत्वच दाखवते. आपली ज्ञानाची परंपरा समृद्ध होती. त्यात प्रादेशिकता नव्हती. उलट कश्मीर ख–या अर्थाने यासाठी भारताला शिरोधार्य होते. कश्मीरच्या राजानिक महिमभट्टाचा ‘व्यक्तिविवेक’ हा ग्रंथ उपलब्ध नव्हता. तो १९०७ साली प्रकाशात आला. कुठे? तर त्रिवेंद्रममधे. टी. गणपतीशास्त्री यांनी तो जगासमोर आणला.
आपण जिथे जन्मलो त्या प्रदेशावर प्रेम असणे स्वभाविक आहे. बिल्हणाच्या शब्दांतून कश्मीरचे प्रेम ओसंडून वाहते. इथल्या द्राक्षांचे कौतुक करताना तो त्यांचे मोगरीच्या कळ्यांच्या कांतीची सतेज फळे असे वर्णन करतो. कश्मीरातल्या स्त्रिया कश्मीरी भाषेइतक्या सहजतेने संस्कृत आणि प्राकृत बोलतात हे तो अभिमानाने सांगतो. कश्मीरातील नाट्यपरंपरेचे वैभव वाखाणतो. प्रत्येकाला घराची ओढ कशी असते तर याबद्दल राजतरंगिणी सांगते, राजा कलशाच्या काळात बाहेर गेलेल्या बिल्हणाला, कलश राजाचा मुलगा हर्ष हा राजा झाल्याचे कळताच, कधी मी कश्मीरला जाईन; असे झाले होते. कदाचित राजा कलशाकडून दुखावला गेल्यानेच तो बाहेर पडला असावा. महाकवी बिल्हण साधारण २२ वर्षे कश्मीर बाहेरच होता. तो कश्मीरला गेला की नाही हे मात्र आपल्याला आज माहित नाही.
या महाकवी बिल्हणानेच ‘चौरपञ्चाशिका’ नावाचे काव्य लिहिले आहे असे म्हणतात. त्या काव्याविषयी कथा सांगतात की बिल्हण दक्षिणेत आल्यावर कोणा राजकन्येच्या प्रेमात पडला. जेव्हा राजाला हे कळले तेव्हा त्याने चिडून बिल्हणाला तुरुंगात टाकले आणि त्यास वधाची शिक्षा सुनावली. अशावेळी बिल्हणाने आपल्या प्रियेचे वर्णन करणारे ५० श्लोक गायला सुरवात केली. ही वार्ता राजाच्या कानी गेली. त्याने ते श्लोक ऐकले व खूश होऊन बिल्हणाची शिक्षा तर माफ केलीच पण त्याचा राजकन्येशी विवाहही लावून दिला. ही कदाचित दंतकथाच असेल पण गंमत अशी की मेवाड चित्रशैलीत गीतगोविंदाबरोबर याही काव्यावर आधारीत चित्रे काढली गेली आहेत. ‘चौरपञ्चाशिका’ जितकी कश्मीरमधे प्रसिद्ध आहे तितकीच दक्षिण भारतातसुद्धा प्रसिद्ध आहे. कश्मीरचे भारताची ओळख घडविण्यात असलेले योगदान अपूर्व आहे. बिल्हण, कल्हण, क्षेमेंद्र, सोमदेव जिथे एकाच वेळी वावरत असतात, आणि राजकीय घडामोडी अखंड सुरू असल्या तरी जिथे ज्ञानसाधनेत जराही खंड पडत नाही अशा या अलौकिक भूमीच्या वैभवाचा अधिक परिचय करून घेऊ, पुढील लेखात.
ह्या लेखमालेतील दुसरा लेख इथे वाचा.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry.
Author : डॉ. समीरा गुजर -जोशी
समीरा ह्या संस्कृत साहित्याच्या अभ्यासक असून भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे.
Very well researched article ! Lot of good information ! So much of work you have put in Sameera! 👌👍👍