Itihāsa | इतिहास

Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.

कश्मीरे संस्कृतम् – ४

by | Jun 2, 2020 | 15 comments

विक्रमादित्य नव्हे विनयादित्य!

 

राजतरंगिणी हा ग्रंथ विविध दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. कश्मीरचा इतिहास सांगणारा ग्रंथ म्हणून तो महत्त्वाचा आहेच; पण त्याचे शीर्षक सुचवते त्याप्रमाणे या काळनदीच्या प्रवाहात कितीही मोठा राजा वा सम्राट असला तरी तो केवळ एक तरंग मात्र आहे हे मनावर ठसवणे हे त्या ग्रंथाचे उद्दिष्ट आहे.  सहसा आपण पोवाडे ऐकतो वा शिलालेख, दानपत्रे वाचतो, त्यामध्ये राजाच्या स्तुतीवर भर असतो आणि ते संयुक्तिकही आहे. कारण आजच्या भाषेत राजा त्या गोष्टींचा नायक आणि प्रायोजक असतो. पण कल्हणाचा राजतरंगिणी हा ग्रंथ या बाबतीत विलक्षण वेगळा आहे. कारण कल्हणाने हा ग्रंथ कोण्या एका राजाला खूश करण्यासाठी लिहिला नसून सगळ्याच भावी राजांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिला आहे. त्यामुळे कल्हणाचा उद्देश स्तुती नसून चिकित्सा आहे. तो खुलेपणाने राजांच्या गुणदोषांविषयी बोलतो. तरीही काही राजे असे आहेत की ज्यांच्याविषयी लिहिताना त्याची लेखणी अद्भुताकडे झुकते आणि तो त्यांच्या यशाचे पोवाडे गाऊ लागतो. याचे कारण अर्थातच त्या राजांचे प्रभावी कर्तृत्व होय. अशाच एका राजाविषयी आज जाणून घेऊ या.

अनेकदा एखाद्या राजाचे वा सम्राटाचे व्यक्तिमत्त्व हे ऐतिहासिक दस्तावेजातून काळाचे पट ओलांडून आपल्यापर्यंत पोहचते. राजा जयापीडाविषयी हेच म्हणता येईल. अतिशय पराक्रमी, धाडसी आणि विद्याप्रेमी असा हा राजा. ‘विक्रमादित्य’ अशी उपाधी घेतलेले अनेक राजे इतिहासात आढळतील; पण हा राजा मात्र स्वतःला ‘विनयादित्य’ म्हणवून घेतो. नम्रता या अर्थी येथे ‘विनय’ शब्द अपेक्षित नसून ‘विद्यावंत असणे’ या अर्थी अपेक्षित आहे. राजाचे शिक्षण या अर्थी विनय हा शब्द कौटिल्यदेखील वापरतो. पराक्रमी राजा स्वतःचा उल्लेख विनयादित्य असा करुन घेतो यातूनच त्याचे व्यक्तिमत्त्व कळते. विद्वत्ता – ज्ञान हे त्याच्यासाठी सर्वोच्च मूल्य होते.

साधारणपणे आठवे शतक हा राजा जयापीडाचा काळ मानला जातो. सम्राट ललितादित्य मुक्तापीडाचा हा नातू. लहानपणापासून एकच गोष्ट त्याच्या मनावर ठसविली गेली, आजोबांसारखा हो. ललितादित्य हा दिग्विजयी सम्राट होता. संपूर्ण उत्तर भारतावर त्याने आपले वर्चस्व स्थापन केले. कश्मीरच्या सीमा दक्षिणेला भिडवल्या. शांती आणि समृद्धियुक्त त्याचे राजपर्व म्हणजे कश्मीरचे सुवर्णयुग होते. तुर्कस्थानवर चाल करुन जाणारा केवळ कश्मीरातील नव्हे तर भारतातील एकमेव राजा. त्यामुळे जयापीडाने त्याला आदर्श मानणे संयुक्तिकच होते.  ललितादित्यानंतर गादीला समंजस वारसा  लाभला नव्हता.  जयापीडाचा एक काका तर इतक्या संवेदनशील मनाचा होता म्हणे की कुठल्याशा मंत्र्याने त्याचे म्हणणे ऐकले नाही तर  त्याला रात्रभर झोप लागली नाही! जयापीडाच्या आधी गादीवर आलेल्या विविध राजांनी प्रत्येकी ४ ते ७ वर्षेच राज्य केले. थोडक्यात आजोबांच्या सुवर्णयुगाच्या आठवणी मनात ताज्या असताना मधला १५-२० वर्षांचा काळ हा अस्थिरतेचा, अंदाधुंदीचा गेला होता.  मंत्री उन्मत्त झाले होते आणि जनता हैराण. अशा परिस्थितीत धाकटा राजपुत्र असलेल्या जयापीडाने अत्यंत आत्मविश्वासाने राजकीय पटलावर पदार्पण केले. आजोबांसारखा दिग्विजय करण्याची दुर्दम्य इच्छा त्याच्या मनात होती. त्याने राज्यविस्ताराचे प्रयत्न तर केलेच पण सगळ्यात जास्त महत्त्व दिले ते ज्ञानपरंपरांच्या पुनरुज्जीवनाला!

राजतरंगिणीतील उल्लेखावरुन असे दिसते की त्याकाळात लोकांना पाणिनीच्या सूत्रांचा, पतंजलीच्या महाभाष्याचा काहीसा विसर पडला होता. त्याने देशभरातून विद्वानांना कश्मीरमधे बोलावून घेतले. कश्मीर खो-यात संस्कृत व्याकरणाचा पुनःप्रचार होईल. यासाठी प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर तो स्वतः क्षीरस्वामी नावाच्या आपल्या गुरुकडून संस्कृत व्याकरणाचे पाठ घेऊ लागला.

 त्याच्या कालखंडात राजापेक्षाही अधिक वजन प्राप्त झाले ते पंडित या पदवीला. कल्हण लिहितो की राजाकडून काम करुन हवे असेल तर मांडलिक राजे आता विद्वानांच्या घरी गर्दी करु लागले. यावरुन विद्वानांचा भाव कसा वधारला होता हे ध्यानी यावे.

उद्भट हा सुप्रसिद्ध काव्यशास्त्रज्ञ. जयापीडाने त्याची सभापती म्हणून नियुक्ती केली. त्याला दिवसागणिक ‌वेतन दिले जाई. किती असेल हे वेतन याचा अंदाज बांधणेसुद्धा अवघड आहे. त्याला दरदिवशी १ लाख दिनार वेतन दिले जाई. (दिनार हे तेव्हाचे कश्मीरी चलन होते.)  जयापीडाच्या पदरी दामोदरगुप्त, चटक, मनोरथ असे इतरही अनेक कवी होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘रीतिरात्मा काव्यस्य’ या सिद्धातांसाठी विख्यात असणारा काव्यशास्त्रज्ञ वामन त्याच्या पदरी होता. तो त्याचा मंत्री होता. आणखी एका वामनाविषयी आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे काशिकाकार वामन. वैयाकरणांनी जिला मोलाचे स्थान दिले ती पाणिनीच्या अष्टाध्यायीवरील प्रसिद्ध वृत्ती काशिका ही जयादित्य आणि वामन यांनी लिहीली हे ज्ञात आहे. काही अभ्यासकांच्या मते, रीतिसंप्रदायाचा प्रवर्तक वामन आणि काशिकाकार वामन एकच असून जयादित्य म्हणजे जयापीड होय. हे जर खरे मानले तर जयापीडाला त्याची विनयादित्य ही उपाधी अधिकच शोभून दिसते.

राजा जयापीडाला स्वप्नेही पडत ती विद्वज्जनांचे स्वागत करण्याची. अशा राजाची स्तुती करताना एरवी तोलून मापून स्तुती करणारा कल्हणही इथे मात्र हात आखडता घेत नाही. तो म्हणतो, “केवळ स्वतःचे पोट भरून संतुष्ट होणा-या इतर राजांशी या राजाची कशी तुलना करणार? ज्याप्रमाणे रोगाने तोंडाची चव गेलेल्याला उसाच्या रसाची काय चव? त्याचप्रमाणे राजसत्तेच्या संवेदनशून्यतेत अनेकदा राजेलोक ज्ञानाची महत्ता विसरतात.”

ज्ञानाइतकाच राजा जयापीड कलांचाही भोक्ता होता. कश्मीरमध्ये द्वारकेसारखे स्थळ असावे असे त्याला वाटले. त्याने त्यासाठी थेट श्रीलंकेहून स्थापत्यविशारद आणले आणि पाण्याने वेढलेला किल्ला बांधला.  त्या नगरीला त्याने जयपूर हे नाव दिले. बुल्हरने हे ठिकाण शोधले होते असे नमूद केले आहे.

विद्वत्तेइतकीच त्याला साहसाची आवड असावी असं मानता येईल. तो अनेकदा वेषांतर करुन शत्रूंच्याही राज्यात गेलेला दिसतो, बहुतेकदा एकटा. पण त्याला सुखरुप परत आणण्यासाठी जीवाची बाजी लावणारे सहकारीही लाभले आहेत त्याला! हे प्रसंग वाचताना सहजच शिवछत्रपतींचे रक्षण करणा-या मावळ्यांची आणि आग्र्याहून सुटका यांसारख्या प्रसंगांची आठवण होते. विस्तारभयास्तव सगळे सांगत नाही. पण एक आठवण आहे ती थेट साथीच्या रोगाची आहे. कोविड १९ शी आपण लढत असताना हा किस्सा रोचक वाटेल.

एकदा वेषांतर करुन शत्रूराज्यात फिरत असताना राजा जयापीड पकडला गेला. योगायोगाने त्याचवेळी त्या राज्यात एका रोगाची साथ पसरली. कोळ्यापासून (किटक-कोळी) ही साथ सुरू झाली म्हणे. (लगेच वटवाघूळ आठवले ना?) या रोगात अंगाला खाज सुटे आणि तो अत्यंत संसर्गजन्य होता. या गोष्टीचा फायदा घेऊन राजा जयापीडाने आपल्या शरीरावर रोगाची लक्षणे निर्माण केली. शत्रूराजानेही घाबरुन संसर्गाच्या भीतीने राजा जयापीडाला सोडून दिले.

राजा जयापीडाच्या पहिल्या दिग्विजयाची कथाही अशीच रोमांचकारी आहे. तो प्रयागपर्यंत पोहचला. कल्हण लिहितो की त्याने गंगेच्या किना-यावर आपला विजयस्तंभ उभारला होता. त्यावर स्वतःचे नाव कोरुन लिहिले होते, जो एक लाखाचे सैन्य घेऊन येईल त्या राजाने हे नाव खोडावे. पण अचानक त्याच्या सैन्याने असहकार पुकारला. कश्मीरला परत जायचा तगादा लावला. नाईलाजाने त्याने सैन्याला परत पाठवले. तो मात्र जयंत नावाच्या राजाच्या राज्यात गेला. तिथे कमला नावाच्या गणिकेकडे तो गेला. खरेतर त्याने वेषांतर केले होते. पण बुद्धिमान कमलाने हा कोणी राजा असावा हे ताडले. तिचे त्याच्यावर प्रेम बसले. तिने त्याचा उच्चार करतामात्र त्याने तिला गोड शब्दात नकार दिला. मी काही ध्येय मनी बाळगून आहे. ते पूर्ण होईपर्यंत मी प्रेमाचा विचार करु शकत नाही हे त्याने तिला समजावले. असा अनुभव कमलेला नवीन होता. त्याच्या दाक्षिण्यपूर्ण वागण्याने तिचा प्रेमादर वाढला असणार यात शंका नाही. दोघांमधे छान मैत्री झाली. एक दिवस बोलता बोलता तिने गावात सिंह फिरत असल्याचे सांगितले. तेव्हा जयापीडाने एकट्याने त्या सिंहाला ठार केले आणि त्याचे नाव कोरलेले केयूर सिंहाच्या शवाजवळ ठेवले. साहजिकच बातमी तिथल्या राजापर्यंत गेली. केयूरामुळे हा पराक्रम जयापीडाचाच आहे हे ही राजाने ओळखले. त्याला शोधून काढले व आपल्या बहिणीचा, कल्याणीचा हात देऊ केला. राजा जयापीड राणीला घेऊनच कश्मीरला गेला. बाहुबलीसारख्या सिनेमात शोभावी अशी ही कथा. पण आणखी एक गम्मत आहे. राजा जयापीड कमलालाही कश्मीरला घेऊन गेला. कश्मीरमधे तिच्या नावाने एक नगरही त्याने वसवले. वसंतसेना किंवा कादंबरीतील पत्रलेखेची आठवण करून देणारी ही कमला आणि गणिकेला असा सन्मान देणारा राजा यांची ही कथा विलक्षण आहे हे खरे. राजतरंगिणीतला हा तरंग जयापीडाच्या विद्याप्रेमापोटी, माणसांना जीव लावण्याच्या त्याच्या स्वभावपायी, धाडस, चातुर्य या सा-यांसाठी आपल्या मनातही अनेक तरंग निर्माण करतो. पण हाच राजा पुढे जनतेला अप्रिय झालेला दिसतो तेव्हा ‘वारांगनेव नृपनीतिरनेकरुपा’ या उक्तीचा प्रत्यय येतो. या विषयी जाणून घेऊया पुढील लेखात.

ह्या लेखमालेतील तिसरा लेख इथे वाचा.

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry

Author : डॉ. समीरा गुजर -जोशी

समीरा ह्या संस्कृत साहित्याच्या अभ्यासक असून भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे

15 Comments

  1. Anjali Ranade

    कश्मिर लेखमाला छान चालू आहे 😊
    आम्हाला इतिहास कळतो आहे😊🙏
    पुढच्या लेखाची वाट पाहत आहे 😀

    Reply
    • Dr. Samira Gujar- Joshi

      आभारी आहे. आपले प्रोत्साहन खूप मोलाचे आहे.

      Reply
      • Kalika Gandhi

        Chaan Ekhadi kadambari kiva katha vachtiye asa bhas zala. Ajun pudhe kkaay 😉

        Reply
        • Dr. Samira Gujar- Joshi

          धन्यवाद. भविष्यात या विषयावर कादंबरी लिहायला नक्की आवडेल.

          Reply
  2. प्राची कुलकर्णी

    लेख हा उत्तम आहे आणि पुढील लेखामध्ये काय आहे याची उत्सुकता वाढवणारा आहे.

    Reply
    • Dr. Samira Gujar- Joshi

      धन्यवाद. तुमची दाद फार मोलाची आहे.

      Reply
        • Dr. Samira Gujar- Joshi

          धन्यवाद. तुमची दाद फार मोलाची आहे.

          Reply
    • Pooja sali lunge

      खुप सुंदर लेख आहे… प्रत्येक लेखात छान माहिती मिळते..👌👌👌

      Reply
      • Dr. Samira Gujar -Joshi

        धन्यवाद.

        Reply
  3. Maithilee Potnis

    समीरा, खूप छान माहिती मिळते आहे. तू लिहिले पण छान आहेस

    Reply
    • Dr. Samira Gujar-Joshi

      धन्यवाद

      Reply
    • Dr. Samira Gujar-Joshi

      धन्यवाद.

      Reply
  4. Bhanudas Mehta

    अतिशय अप्रतिम छान लेख. खरेच फारच सुरेख लिहिलेला आहे.

    Reply
    • Dr. Samira Gujar-Joshi

      धन्यवाद

      Reply

Trackbacks/Pingbacks

  1. कश्मीरे संस्कृतम् - ५ - Mimamsa - […] ह्या लेखमालेतील चौथा लेख इथे वाचा. […]

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *