संस्कृत साहित्यातील अजरामर कृती असलेल्या रामायणाची लोकप्रियता ही जगविख्यात आहे. संपूर्ण विश्वामध्ये या ग्रंथाला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आदिकवी वाल्मीकिंनी लिहिलेल्या रामायणाचा म्हणजेच वाल्मीकि रामायणाचा प्रचार आणि प्रसार हा अतिशय वेगाने झालेला दिसतो. त्याचप्रमाणे या ग्रंथाचे उपजीव्यत्व सर्वज्ञात आहे. पुढे अनेक ग्रंथांसाठी वाल्मीकि रामायण हे प्रेरणास्रोत ठरलेले दिसते.
रामायणाच्या विकासक्रमात अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांची चर्चा झालेली आहे. त्यातील काही विषयांवर विद्वानांचे मतैक्य आहे. त्याचप्रमाणे काही विषयांवर विद्वानांची मते भिन्न आहेत. अशाच रामायणातील प्रमुख प्रसंगांपैकी ‘लक्ष्मणरेषेचा’ हा एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे.
वाल्मीकि रामायणातील अरण्यकांडामध्ये सीतेच्या अपहरणाचा प्रसंग वर्णिलेला आहे. त्या प्रसंगातील लक्ष्मणरेषा ही समाजमनावर इतका मोठा परिणाम करून गेलेली आहे की प्रत्येकाला हा प्रसंग अगदी खरा असल्याचेच वाटते. परंतु वाल्मीकि रामायणात कुठेही लक्ष्मणरेषेचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख आलेला दिसत नाही. मग नेमका हा प्रसंग रामायणात कुठून आला असावा? त्यात खरेच काही तथ्य आहे का? लक्ष्मणरेषेचा उल्लेख कोणत्या ठिकाणी आलेला दिसतो? इतर कोणत्या स्वरुपात हा प्रसंग लिहिला गेला आहे? अशा सर्व बाबींचा सांगोपांग विचार प्रस्तुत लेखात केला आहे.
प्रचलित रूपात असलेली कथा
प्रचलित कथेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. मारीच राक्षसाला रामाने बाण मारल्यावर तो रामाचा आवाज काढून राम संकटात असल्याचे लक्ष्मण आणि सीता यांना भासवतो. त्यामुळे सीता लक्ष्मणाला रामाच्या रक्षणासाठी जाण्यास विवश करते. शेवटी नाईलाजाने सीतेच्या संरक्षणासाठी लक्ष्मण आपल्याकडील बाणाने कुटीच्या सर्व बाजूंनी एक रेष आखतो. (हीच रेषा लक्ष्मणारेषा म्हणून ओळखली जाते.) तसेच कोणत्याही स्थितीत सीतेने त्या रेषेच्या बाहेर येवू नये असे तो सीतेला बजावून सांगतो आणि रामाकडे निघून जातो. तेवढ्यात संधी साधून रावण तिथे येऊन सीतेला पळवण्याचा प्रयत्न करतो. पण त्या रेषेच्या प्रभावामुळे तो आत जाऊ शकत नाही. मग तो कपटाने सीतेला रेषेबाहेर बोलावतो आणि तिला घेऊन जातो.
अशाच प्रकारची कथा लहानपणापासून ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेली आहे. लक्ष्मणरेषेची ही गोष्ट रामायणाचे एक अविभाज्य अंग आणि प्रमुख घटक बनलेली आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ दूरचित्रवाणीवरील मालिकेचा बत्तीसावा भाग बघितल्यावर तर सर्वसामान्यांना लक्ष्मणरेषेची कथा अगदी तंतोतंत खरी असल्याचा विश्वास वाटतो. पण असे वर्णन खरोखर आढळते का याचे उत्तर प्रस्तुत लेख शोधू पाहतो.
रामकथेवर आधारित ग्रंथरचना
विद्वान लोक वाल्मीकि रामायणाला ‘आदिकाव्य’, ‘आर्षकाव्य’ अशी नावे देतात. त्याचबरोबर ‘उपजीव्यकाव्य’ असेही एक विशेषण त्यासाठी वापरले जाते. या विशेषणानुसार आजवर शेकडो ग्रंथांचे उपजीव्यत्व या ग्रंथाला प्राप्त झाले आहे. देशातील प्रत्येक राज्याच्या भाषेत रामायणावर आधारित ग्रंथांची रचना झालेली आहे. एवढेच नव्हे तर जनजातीय किंवा वनवासी भाषांमध्येही रामकथेवर आधारित रचना झालेल्या दिसतात. भारताबाहेरही अनेक देशांमध्ये विविध भाषांमध्ये रचना झालेल्या दिसतात. उदाहरणार्थ – तिबेटी रामायण, पूर्वी तुर्किस्तानचे खोतानीरामायण, इंडोनेशियाचे ककबिनरामायण, जावाचे सेरतराम, सैरीराम, रामकेलिंग, पातानीरामकथा, इण्डोचायनाचे रामकेर्ति (रामकीर्ति), ख्मैररामायण, बर्मा (म्यानमार) चे यूतोकी रामयागन, थाईलैंडचे रामकियेन इत्यादी.
प्रस्तुत अभ्यासासाठी त्यातील काही ग्रंथांचा आढावा घेण्यात आलेला आहे.
काही प्रमुख रामायाणांचे अवलोकन
वाल्मीकि रामायण – (वाल्मीकि रामायण – अरण्यकांड, अध्याय ४५-४९) यानुसार लक्ष्मणाने सीतेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण नाईलाजाने तिला एकटीला पर्णकुटीत सोडून रामाकडे जाणे लक्ष्मणाला भाग पडले. योग्य संधी पाहून रावण सीतेजवळ आला आणि दोघांमध्ये परस्परांच्या परिचयासोबत सविस्तर चर्चा झाली. शेवटी रावणासोबत जाण्यास सीतेने नकार दिला असता क्रोधीत होऊन तो तिला बळजबरी उचलून घेऊन जातो. या कथेमध्ये कुठेच लक्ष्मणरेषेचा उल्लेख आलेला नाही.
या ठिकाणी जर लक्ष्मणाने एक रेष मारूनच सीता सुरक्षित होणार होती, तर ती रेष आधीच मारून लक्ष्मण रामासोबत का नाही गेला असा एक प्रश्न उपस्थित होतो.
प्रदक्षिणेन अतिबलेन पक्षिणा
जटायुषा बुद्धिमता च लक्ष्मण |
भव अप्रमत्तः प्रतिगृह्य मैथिलीम्
प्रति क्षणम् सर्वत एव शन्कितः ||
(अरण्यकाण्ड, अध्याय – ४३, श्लोक – ५१)
याचा अर्थ असा -“हे लक्ष्मणा! गृद्धाराज जटायू खूपच शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहेत. त्यांच्यासोबत इथे सारखा सावध राहा. सीतेला आपल्या संरक्षणात घेऊन सर्व दिशांमध्ये राहणाऱ्या राक्षसांपासून प्रत्येक क्षण सावध राहा.” इथेसुद्धा एक तर राम लक्ष्मणाला असा आदेश देत नाही, की कोणत्याही परिस्थितीत जर सीतेच्या रक्षणास असमर्थ ठरलास, तर तिथे रेषा मारून रक्षणाची व्यवस्था कर. दुसरा मुद्दा म्हणजे जर रेषा मारून लक्ष्मण तिचे रक्षण करू शकत होता, तर सीता मार्मिक वचने बोलेपर्यंत त्याने वाट पहिली नसती एवढेच नव्हे, तर त्याने तिला कठोर वचने बोलण्यास विवश केले नसते. रामावर आलेले संकट पाहून तो स्वतःहूनच शीघ्रगतीने तिकडे गेला असता. त्यामुळे वाल्मीकि रामायाणात लक्ष्मणरेषेचे काही एक औचित्य नाही.
वेदव्यासरचित महाभारत – (महाभारत, वनपर्व, अध्याय २७८, श्लोक २४ व त्यापुढे) याप्रमाणे लक्ष्मण सीतेची कटुवचने ऐकून कानावर हात ठेवून धनुष्य घेऊन तिथून निघून जातो. येथेही वाल्मीकि रामायणाप्रमाणेच हा प्रसंग वर्णिलेला आहे. या ठिकाणीसुद्धा लक्ष्मणरेषेचे काहीही वर्णन आलेले नाही.
वेदाव्यासांद्वारे रचना केलेले अध्यात्म रामायण – यामध्येही सीताहरणाच्या प्रसंगात कुठेही लक्ष्मणाद्वारे रेषा ओढल्याचा प्रसंग आलेला नाही आहे. सीता लक्ष्मणाला कठोरतेने बोलते, तेव्हा लक्ष्मण दुःखी होतो.
‘इत्युक्त्वा ……भिक्षुवेषधृक्’ (अध्यात्म रामायण, अरण्यकाण्ड, सर्ग – ७, श्लोक – ३५-३७)
असे बोलून ती आपल्या हातांनी स्वतःची छाती बडवून घेत रडू लागली. तिचे असे कठोर शब्द ऐकून लक्ष्मणाने अतिशय व्यथित होऊन आपले कान बंद केले आणि म्हणाला, “हे चंडी ! तुझा धिक्कर आहे. तू मला असे बोल लावतेस. यामुळे तू नष्ट होशील.” असे बोलून सीतेला वनदेवातांच्या स्वाधीन करून लक्ष्मण तिथून दुःखी अंतःकरणाने हळू हळू रामाकडे निघून गेला.’ इथेसुद्धा लक्ष्मणरेषेचा उल्लेख आलेला नाही.
गोस्वामी तुलसीदासकृत रामचरितमानस –
(रामचरितमानस, अरण्यकांड, दोहा क्र. २७ च्या पुढे) यानुसार लक्ष्मण जाताना सीतेला वन आणि दिशांना सोपवून निघून जातो.
वर्तमानकाळात गोस्वामी तुलसीदासकृत रामचरितमानस हा अतिशय लोकप्रिय ग्रंथ आहे. त्यातील वर्णन पुढीलप्रमाणे आहे –
“मरम वचन जब सीता बोली ,
हरी प्रेरित लछिमन मन डोला!
बन दिसि देव सौपी सब काहू
चले जहाँ रावण ससि राहु!”
या ग्रंथातही असाच उल्लेख आहे की सीतेला वनदेवतांच्या स्वाधीन करून लक्ष्मण तिथून दुःखी अंतःकरणाने हळू हळू रामाकडे निघून गेला. म्हणून या ग्रंथानुसारही आपल्याला लक्ष्मणरेषा नावाचा कोणताही प्रकार आढळत नाही.
याचप्रकारे इतरही प्रमुख रामायण ग्रंथ अभ्यासले असता तिथेही कुठेच लक्ष्मणरेषेचा उल्लेख आढळून आलेला नाही. त्यांमध्ये प्रामुख्याने अगस्त्य रामायण, अद्भुत रामायण, अध्यात्म रामायण, जैन रामायण/पद्मचरित, वशिष्ठ रामायण, मैथिल रामायण, सर्वार्थ रामायण, तत्वार्थ रामायण, प्रेम रामायण, संजीवनी रामायण इत्यादी ग्रंथ आहेत.
पुढील अभ्यासात राम कथा (उत्पत्ती और विकास) या पुस्तकानुसार एक वेगळीच कथा निदर्शनास आली. बिर्होर नावाच्या आदिवासी जातीच्या रामकथेत लक्ष्मण रामाकडे जाण्यापूर्वी सीतेला अभिमंत्रित मोहरीचे दाणे देतो आणि म्हणतो – “जर तुला त्रास द्यायला इथे कोणी आले तर त्याच्यावर यातला एक दाणा फेक. एक दाणा फेकल्याने तो एक तास बेशुद्ध पडेल/मूर्च्छित होईल. दोन दाणे फेकल्याने तो दोन तास मूर्च्छित होईल.” रावण आल्यानंतर सीतेने त्याच्यावर एक दाणा फेकला आणि तो एक तास मूर्च्छित होऊन पडला. त्यानंतरही सीतेने अनेकदा एक एक दाणा फेकला. शेवटी रावण म्हणाला, “एवढा त्रास का करून घेतेस तू स्वतःला ? त्यापेक्षा सगळे दाणे एकदाच फेकून दे, जेणेकरून मी कायमचा मारून जाईन.” सीतेने त्याप्रमाणे करताच रावण भस्मीभूत झाला. पण थोड्याच वेळात त्या भास्मातून उठून रावण सीतेच्या केसांना पकडून तिला आपल्यासोबत घेऊन गेला.
या कथेसाराख्याच अजूनही काही रंजक कथा इतर पुस्तकांत वाचनात आल्या. परंतु त्यांतही लक्ष्मणरेषेची कथा नाही सापडली. विस्तारदोष येवू नये म्हणून त्यांचा उल्लेख येथे टाळत आहे.
अभ्यासाच्या पुढील टप्प्यात काही ठिकाणी लक्ष्मणरेषेचा उल्लेख ज्या ग्रंथांमध्ये सापडतो अशा ग्रंथांचे संदर्भ आले. ते ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत – खोतानी रामायण , सेरी राम, हिकायात महाराज रावण, ब्राह्मदेशाची रामकथा (लक्ष्मणाने तीन रेषा आखल्या), मधुसूदनकृत महानाटक (३.६५), तेलुगू द्विपाद रामायण (लक्ष्मणाने सात रेषा आखल्या), कृत्तिवास रामायण, आनंद रामायण (१.७.६८), सूरसागार (९.५०३ – नागरी सभा संस्करण), रामचंद्रिका (१२.१८) तसेच पाश्चात्य वृत्तांत (क्र. ३,४,१३) इत्यादी. त्या ग्रंथांत येणारी कथा साधारणपणे अशी आहे – रामाच्या मदतीला जाण्यापूर्वी लक्ष्मण सीतेच्या रक्षणासाठी कुटीच्या चारही बाजूंनी धनुष्याने रेष ओढतो आणि देवांची शपथ घेऊन म्हणतो – “जो कोणी या रेषेच्या आत शिरेल त्याच्या डोक्याची शकले होतील.” नंतर छद्मवेशी रावणाने अनुरोध केल्याने सीता त्याला भिक्षा देण्यासाठी हात रेषेच्या बाहेर काढते आणि लगेचच रावण तिला ओढून घेतो. अशाप्रकारची गोष्ट या ग्रंथांमध्ये पाहायला मिळते. पाश्चात्य वृत्तांत क्र. १३ मध्ये म्हटले आहे, ‘जेव्हा रावणाने रेषा ओलांडण्याची इच्छा केली, तेव्हा आगीच्या ज्वाला उत्पन्न होऊन त्याला आत शिरण्यापासून परावृत्त करत होत्या.’
असाच अभ्यास पुढेही संस्कृतीच्या इतर अभ्यासकांना करता येईल. अशा अभ्यासातून अनेक गोष्टी लक्षात येऊ शकतात. सर्वप्रथम सीताहरणाच्या प्रसंगांमध्ये वैविध्य असल्याचे स्पष्ट होते. स्थळ, काळ, व्यक्ती, संस्कृती, परंपरा, भाषा यांसारख्या अनेक घटकांमुळे हे वैविध्य असावे, असे दिसते. वरील अभ्यासावरून असे दिसते, की रामायणातील लक्ष्मणरेषेचा प्रसंग हा जरी मूळ वाल्मीकि रामायणात नसला, तरीही तो पुढे अनेक रामायणांमध्ये आलेला दिसतो. यावरून आपण असे म्हणू शकतो, की प्रादेशिक वैविध्यामुळे, रचनाकारांच्या किंवा कवींच्या कल्पकतेमुळे, स्थानिक मान्यता, रूढी अथवा परंपरा यांमुळे अशा लोककथा आर्ष महाकाव्यांचा फक्त अविभाज्यच नव्हे, तर अत्यावश्यक भाग बनलेला आहे. अशाच भागांचा परिणाम रामायणाच्या सहृदय श्रोत्यांवरती किंवा केवळ श्रद्धायुक्त भक्तांवरती जास्त झालेला दिसतो. त्या ठिकाणी बुद्धीचे स्थान अल्प होऊन श्रद्धा प्रबळ ठरलेली पहावयास मिळते. ती श्रद्धा इतकी पराकाष्ठेला पोहोचलेली दिसते की ‘लक्ष्मणरेषा हा वाल्मीकि रामायणाचा भाग नाही’ हे ऐकताच रामायणाच्या व रामकथेच्या सामान्य उपासकांच्या भुवया उंचावताना आणि कपाळावरती आठ्या निर्माण होताना दिसतात. पण हीच लक्ष्मणरेषा आज मर्यादेचे प्रतीक बनली आहे. समाजमनावरती तिचा खूप मोठा परिणाम झालेला दिसतो. याचाच ही लक्ष्मणरेषा शतकानुशतके समाजाला दीर्घ प्रेरणा आणि अमूल्य शिकवण देत आली आहे व हेच काम पुढेही करत राहणार आहे. पुढे असेही म्हणणे अयोग्य ठरणार नाही, की ‘मर्यादेचे उल्लंघन केल्याने काय परिणाम भोगावे लागतात’ हे सीतेच्या चरित्रातून सर्वांना समजावण्यासाठी कदाचित लक्ष्मणरेषारूपी मर्यादासूचक प्रसंग पुढील रचनाकारांनी आणला असावा आणि जर असे असेल तर त्यांचा हा प्रयत्न अगदी यशस्वी झालेला दिसतो.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry
Author : रोशन भगत
श्री रोशन भगत हे संगमनेर कला महाविद्यालयात संस्कृतचे साहाय्यक प्राध्यापक असून डेक्कन महाविद्यालय पुणे येथे संस्कृत साहित्य शास्त्रावर पी.एच. डी करीत आहेत.
छान अभ्यासपूर्ण लेख रोशन
धन्यवाद!
अभ्यासपुर्ण लेख आहे. समाजावर संस्कार घडवण्यासाठी धर्मग्रंथ हेच साधन त्यावेळी उपलब्ध होते.असे प्रसंग त्यात टाकून समाजातील नैतिकता ,सात्विकता टिकवून ठेवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.आज जरी किस काढुन योग्य,अयोग्य आपण ठरवत असू तरी त्यावेळी ती काळाची गरज होती. त्या व्यक्तीपण श्रेष्ठ होत्या असे मला वाटते.
Very nicely illustrated Laxman Resha from different Granth.
Thank you!
उल्लेखनीय अभ्यास… सुंदर… यालाच कदाचीत पौन:पुन्येन अभ्यास: म्हणतात… आणी तो झालाच पाहिजे…
पण तसेच भाविकांनी हे ही विसरु नये की
“चरितं रघुनाथस्य शटकोटि प्रविस्तरम्।” हे जितके मह्त्वाचे आहे त्यापेक्षा “अकैक मक्षरं पुंसा महापातक नाशनम्” हे जास्त महत्वाचे आहे. जे येथील अभ्यासकाचेही म्हणणे आहे.
रोशन, खूप अभ्यासपूर्ण लेख, लक्ष्मणरेषा प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही हे नव्यानेच कळले. धन्यवाद.
धन्यवाद!
आपण कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवत नाही आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही म्हणत आहात तसा हा किस काढण्याचा प्रयत्न सुद्धा नाही. आपला इतिहास व संस्कृती समजून घेण्यासाठीचा हा फक्त एक निरीक्षणात्मक अभ्यासाचा प्रयत्न आहे. हा लेख वाल्मिकी रामायणाबद्दलची श्रद्धा कमी करण्यासाठी नाही आहे.
खूपच छान आणि अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहेस रोशन. तुझ्या लेखातून माझ्या ज्ञानात भर पडली….🙏
खूप छान आणि अभ्यासपूर्ण लिखाण आहे रोशन भाऊ…