Saṁbhāṣā | संभाषा

Saṁbhāṣā literally means a ‘discourse’ or a ‘discussion.’ This pillar inquires into political, social and economic strands of the Indian thinking and brings to light some of the prominent debates, discourses and propositions emanating from the Indian thinkers or having direct resonance to Indian realities.

राम मंदिर,धर्मनिरपेक्षता आणि भारतीय समाजाचा दृष्टिकोन

by | Jun 2, 2020 | 2 comments

भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि भारतावर राज्य करण्याच्या त्यांच्या मनीषेने भारताच्या संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक मंदिरे पाडून त्यावर मशिदी उभारण्यात आल्या. हा भारतीय संस्कृतीवर केलेला एक मोठा आघात होता ह्यात कोणतेही दुमत नाही. सोमनाथ मंदिर, भारत मातेचे मुकुट समजला जाणाऱ्या काश्मिरातील शेकडो मंदिरे, विजयनगरातील मंदिरे, काशी विश्वनाथाचे मंदिर ह्यांसारख्या अनेक मंदिरांना जमीनदोस्त करून एकतर त्यावर मशिदी उभारल्या गेल्या. नाहीतर त्यांची किमान नासधूस तरी नक्कीच केली. परंतु राम जन्मभूमी ही त्या हजारो जागांपैकी एकमेव अशी जागा आहे ज्यावर हिंदू अजूनही ठाम आहेत आणि त्यासाठी लढतसुद्धा आहेत.भारत स्वतंत्र झाल्यापासून आज पर्यंतचा दिवस पाहता आपल्या देशाने अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली. विविधतेने नटलेल्या ह्या देशात लोकशाही टिकवणे, सामाजिक स्थैर्य राखणे, अर्थव्यवस्थेची घडी बसवणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नवीन ओळख निर्माण करणे ह्यांसारख्या अनेक गोष्टी भारताने यशस्वीरित्या पार पाडल्या. परंतु असे अनेक मुद्दे आहेत जे अनुत्तरित होते आणि गेल्या काही वर्षात पुन्हा एकदा भारतीय समाज त्यावर जोरदार चर्चा करू लागला. त्यातीलच एक मुद्दा म्हणजे ‘राम मंदिर’. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी विवादित जमिनीच्या तुकड्यावर राम मंदिरच उभारलं जाणार असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि अनेक विचारवंतांनी ह्याच्या वर्तमानाला आणि इतिहासाला धरून उहापोह करण्यास सुरुवात केली. सदर लेखात राम मंदिराशी निगडित असलेला इतिहास, सेक्यूलर वादामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि भारतीय समाजाचा ह्या मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ह्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताला समृद्ध असा हजारो वर्षांचा इतिहास आहे. हिमालयापासून ते समुद्रापर्यंत आणि अटकपासून ते कटकपर्यंतची भूमी म्हणजे भारतभूमी मानली जात असे. ह्या भूमीत अनेक विद्वान आणि शूरांनी जन्म घेतला आणि त्यातलेच एक नाव म्हणजे ’प्रभू श्रीराम’ होय. संपूर्ण भारतात ‘राम’ हा पूजनीय मानला जातो. फक्त भारतातच नव्हे तर आपल्या शेजारील अनेक राष्ट्रांमध्ये राम आणि रामायण हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक मानले जातात. बाबराचा सेनापती ‘मीर बाकी’ ह्याने १५२८ साली राम मंदिर जमीनदोस्त केले आणि त्यावर मशीद उभारून त्याला ’मस्जिद ए जन्मस्थान’  हे नाव दिले. उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार १८५० च्या दशकात हा मुद्दा पुन्हा वर आला व १८८५ साली हिंदूंना पूजा करण्यासाठी ती जागा उपलब्ध व्हावी अशी याचिका फैजाबाद कोर्टात करण्यात आली आणि कोर्टाकडून नंतर ती फेटाळण्यात आली. १९४९ साली काही लोकांकडून मूर्ती मशिदीच्या आत ठेवण्यात आल्या व पुन्हा एकदा हा मुद्दा पेट घेऊ लागला व सरकारने संपूर्ण परिसर हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी वर्जित केला. १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने कोर्टात खटला दाखल केला आणि २ वर्षांनंतर ‘सुन्नी वक्फ बोर्ड’ ह्या संपूर्ण जागेच्या मालकी हक्कासाठी लढू लागले. १९८६ साली हिंदूंसाठी म्हणा किंवा राजकारणासाठी म्हणा तेव्हाच्या तत्कालीन सरकारने हिंदूंना पूजा करण्यासाठी परवानगी दिली. पुढे संपूर्ण भारतात ह्या मुद्द्याला घेऊन मोठ्या प्रमाणात वातावरण तापले आणि ६ डिसेंबर १९९२ ह्या दिवशी बाबरी मशीद पाडण्याची दुर्दैवी घटना घडली.

ह्या संपूर्ण वादामध्ये ASI ने उत्खननातून केलेले संशोधन अत्यंत महत्वाचे मानावे लागेल. १९७६ आणि २००३ अशा दोन वेळेस हे उत्खनन झाले. के. के. मुहंमद जे ह्या उत्खननाशी सुरुवातीपासून जोडले गेले आहेत ते म्हणतात की “ह्या उत्खननातून पुरातन शिल्प, मंदिराचे खांब, विष्णूहरी शिला फलक, मगर प्रणाली ह्यांसारख्या अनेक गोष्टी बाहेर आल्या. ज्यावरून मशिदीखाली नक्कीच एखादी पुरातन वास्तू फार पूर्वीपासून अस्तित्वात होती आणि ती इस्लामिक नक्कीच नव्हती ह्यावर विश्वास बसतो.” १९७६ साली बी. बी. लाल ह्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उत्खननाने आणि नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाखाली २००३ मध्ये घुमटाच्या खाली ‘रडार मॅपिंग’ करून केलेल्या उत्खननाने ह्या प्रकरणाला एक वेगळे वळण दिले. के. के. मुहंमद ह्यांनासुद्धा अनेक प्रकारच्या टीकांचा सामना करावा लागला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील एका शिक्षकाने तर के. के. मुहंमद हे त्या उत्खननात सहभागीच नव्हते असेही जाहीररित्या सांगितले.

भारतातील कोणतीही राजकीय अथवा सांस्कृतिक चर्चा ही Secularism आणि त्याच्याशी निगडित असलेल्या गटांशिवाय पूर्ण होणे अशक्य! अनेक मुघल बादशाहांचे मनसुबे हे धर्मांध आणि संस्कृती यांवर घाला घालणारे होते, हे फक्त भारताचाच नाही तर जगाचा इतिहास पाहता सिद्ध होते. तरीही अनेक वामपंथीय आणि सेक्युलर वादी ह्या आक्रमणाला धार्मिक आक्रमण नव्हे तर राजकीय आगळीक म्हणवून घेतात. उदाहरणार्थ ‘सोमनाथ मंदिर हे मुहंमद गझनीने धर्मांध अभिलाषेने किंवा भारतीय संस्कृतीवर घाला घालण्याच्या हेतूने न पाडता स्वतःच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्याच्या हेतूने पाडले आणि ह्यात भारतद्वेष किंवा हिंदूद्वेष असा अजिबात नाही’. पण जर ह्या विदेशी आक्रमकांनी फक्त राजकीय आकांक्षेपायी मंदिरांचा नाश केला. तर लाखो हिंदूंची धर्मांतरणे का म्हणून केली आणि राजकीय आकांक्षेपायी भारतातील मंदिरे पाडणे हे कितपत योग्य होते? औरंगझेबाने आपला बंधू दाराशिको ह्याला वेदांचे अरबी भाषांतर केले म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली ते कोणत्या राजकीय आकांक्षेपायी केले? टिपू सुलतान ज्याला आजही भारतात मानाचे स्थान दिले जाते त्याने अनेक ब्राह्मणांचा छळ केला तो कोणत्या राजकीय आकांक्षेपायी केले? किती हिंदू राजांनी त्या काळी मुसलमानांच्या मशिदी पडल्याच्या घटना आपल्याला आढळतात? आपल्या देशात अनेक शहरे ज्यांची नावे अजून पण ह्या मुघल आक्रान्तांवरून ठेवलेली आहेत जसे औरंगाबाद, बख्तियारपूर, अहमदाबाद इ. एवढेच नाही तर अनेक रस्ते आणि उद्यानांची नावे सुद्धा ह्यांच्यावरून आजही ठेवली जातात. ज्या बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळून भस्म केले, जगातील भरमसाठ ज्ञानाचा संचय असलेले तेथील ग्रंथालय जाळून खाक केले आणि पुढील काही महिन्यांपर्यंत ती आग दूरवरून दिसत होती त्याच्या नावाने आजही भारतात ‘बख्तियारपूर’ नावाचे शहर आहे. ज्या संभाजी महाराजांच्या वीरतेच्या गोष्टी आपण वाचतो आणि त्यांच्या नावाने महाराष्ट्रात एकही शहर नसावे? पण औरंगझेबाच्या नावाने त्याच महाराष्ट्रात औरंगाबाद हे शहर आहे. वरील सर्व उदाहरणे सेक्युलर मतवादी किंवा वामपंथीय ह्यांच्या पुढे मांडले असता एकतर ‘हा इतिहास आम्हाला मान्य नाही’ किंवा ‘नावात काय आहे’ ह्या पलीकडे काहीही उत्तर आलेले माझ्या ध्यानात येत नाहीत. वास्तविकता आणि चालवलेला सेक्युलर प्रचार ह्यातच कालपर्यंत राम मंदिर हा मुद्दा अडकला होता. अनेक वामपंथीय इतिहासकारांनी सुरुवातीला मंदिराच्या उत्खननाला विरोध दर्शवला होता आणि मशिदीखाली काहीच मिळणार नाही असा दावा केला होता. एवढेच नाही तर ‘पूजापाठ करण्यासाठी मंदिराची आवश्यकता असायलाच हवी असे नाही’ हेही सांगण्यात आले. मग ह्या अर्थी हिंदूंचे मंदिर पाडून त्यावर मशीद उभारून नमाज पठण करण्याची परवानगी इस्लाम देते का ? हा प्रश्न ह्यांनी कधीच का नाही मांडला? आधी ‘मशिदीखाली काहीच मिळणार नाही’, नंतर सापडलेल्या पुराव्यांना दुजोरा न देता ‘इथे रामाचा जन्म कसा झाला हे सिद्ध करा’ असे म्हणणारे, ‘सापडलेले पुरावे हे आणून ठेवले गेलेले आहेत’ असं म्हणणाऱ्यांविरुद्ध   आणि समाजाची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध कधीच ब्र काढताना का नाही दिसले? ह्याचे कारण धर्मनिरपेक्ष म्हणता म्हणता आपण आणि आपली मते एका समुदायासाठी डावी आणि एका समुदायासाठी अत्यंत उजवी ठरवतोय ह्याचाही विसर ह्यांना पडल्याचे निदर्शनास येते.

भारतात अनेक लहान मोठी मंदिरे बांधकाम आणि विस्तारा यांसाठी तोडली जातात पण त्या वेळेस कधीच एवढा वाद उफाळून आलेला आपल्याला दिसत नाही. मग राम जन्मस्थानावरूनच का? कारण गणपती, महादेव, श्रीराम ह्यांसारख्या काही दैवतांना संपूर्ण भारतात पूजिले जाते आणि म्हणूनच त्यांचे जन्मस्थान ह्या भारतवर्षासाठी आस्थेचा विषय आहेत आणि त्यात कोट्यवधीभारतीयांची आस्था समाविष्ट आहे ह्यात कुठलेही दुमत नाही. प्राचीन काळापासून अयोध्या, मथुरा, काशी ही तीर्थक्षेत्रे हिंदूंसाठी पवित्र मानली गेली आहेत. स्पेन येथे जेव्हा इस्लामिक सत्तेचा पाडाव करण्यात आला त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी चर्च पाडून मुसलमानांनी मशिदी उभ्या केल्या होत्या त्या त्या सर्व ठिकाणी त्या उभारलेल्या मशिदी पाडून पुन्हा चर्च उभे केले गेले. भारतात तर हिंदूंनी असा अट्टाहास कधीच धरला नाही. इस्लामच्या उदयाच्या काळात बांधली गेलेली थ्रिसूर, केरळ येथील चेरामल जुम्मा मशीद आज सुद्धा दिमाखात आपल्याला उभी असलेली दिसते.

सध्याच्या तरुण पिढीमध्ये आणि काही प्रमाणात प्रौढांमध्येसुद्धा राम मंदिराविषयी एक प्रकारची उदासीनता आणि अज्ञान दिसून येते. एप्रिल  २०१९ मध्ये पॅरिस येथे ८५० वर्ष जुन्या एका कॅथेड्रलला आग लागली आणि त्यात त्या वास्तूची भयंकर हानी झाली. भारत भरातून समाजमाध्यमांमार्फत  आपल्या लोकांनी त्यावर दुःख व्यक्त केले. नक्कीच ती घटना दुर्दैवी होती. पण हा असाच कळवळा आपल्या भारतीयांना राम जन्मभूमीविषयी आहे का? अनेक भारतीयांपैकी विशेतः तरुण पिढीतील लोक “आम्हाला मंदिर नको” अशी ओरड ठोकताना दिसतात. परंतु जर आपल्या संस्कृतीमधील मंदिरे आपणच जपली नाहीत तर कोण जपणार ? खरेतर ह्या सर्व मुद्द्याला धर्माच्या चष्म्यातून न पाहता वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले  तरीही आपल्याला हेच आढळून येईल की एके काळी तेथे मंदिरच उभे होते आणि हिंदूंची बाजू हि अहंकाराची नसून सत्याचीच आहे. मग आपला समाज ह्या मुद्द्यावरून एकवटलेला का नाही कधी दिसून आला ? ह्याचे कारण  एकच की आपल्याच इतिहासाबद्दल आपल्याला असणारे अज्ञान आणि नसणारी जाणीव. जर आपल्या तरुण पिढीने जागरूक राहून प्रामाणिकपणे ह्या भारताच्या इतिहासाचा शोध घेतला तर आपोआप ह्या सर्व गोष्टींचे मह त्त्व त्यांना समजल्यावाचून राहणार नाही आणि समाजात जागरूकता नक्कीच पसरेल.  तेव्हाच आपण आपल्यात असणारे अज्ञान दूर करून आपल्या संस्कृतीचा वारसा हक्काने आणि गर्वाने मिरवू शकू. कारण कुठलेही राष्ट्र हे सामाजिक एकतेच्या बळावरच  बलशाली होऊ शकते आणि ती सामाजिक एकता राष्ट्राच्या खऱ्या इतिहास मान्यतेतूनच निर्माण होते.

Ayodhya The Finale science vs secularism the excavation debates, The Koenraad Else site, January 2003.

https://theprint.in/opinion/hindus-have-intellectual-argument-for-ram-mandir-at-ayodhya/315572/

During Excavation at Ayodhya, Remains Of Temple Were Found: K.K. Muhammed | ABP News

Views expressed in the article are of the author’s and does not reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry

Author : अक्षय विंचूरकर 

अक्षय विंचूरकर हे राज्यशात्राचे अभ्यासक आहेत.

 

2 Comments

  1. जयंत काळे

    Gr8…Sir……तुम्ही थोडस आपल्या दाक्षिणात्य मंदिर,आपली संस्कृती, आणि आपल पसरलेल साम्राज्य यावरही अभ्यास पूर्ण लेखन केलत तर बराच मोठा हिंदुसमाज एकत्र होण्यास मदत होईल.तसेच सम्राट अशोकाच्या धम्मपरिवर्तनानंतर बोध्द भिक्षूनी कस राजकारण केल त्यावर ही लिहाव लागेल…ते पुष्यमित्र श्रुंगाच हिंदुसम्राट होईपर्यंत…….बघा जमल तर…धन्यवाद.

    Reply
  2. अक्षय

    धन्यवाद जयंत जी ! नक्कीच आपण ह्या सर्व विषयांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करू.

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *