रामांनी आपल्या ७६ वर्षांच्या आयुष्यात जे सामाजिक कार्य केले हे पाहण्याआधी त्यांना ते तसे करावेसे वाटण्यामागची पार्श्वभूमी आधी समजून घेणे फार आवश्यक आहे. रावणाच्या वाढता उत्पातामुळे कोणालाच सुरक्षेची भावना नव्हती. ऋषीमुनी यज्ञ करू शकत नव्हते. राजेही युद्धावर जाताना चिंतित असायचे. रावणाचे दूत (राक्षस) कधी येतील आणि होत्याचे नव्हते करतील ह्याचा नेम नव्हता. ज्यावेळी एखादी गोष्ट सहनशीलतेची परिसीमा गाठते त्यावेळी प्रतीकाराची शक्ती वापरावी लागते आणि या शक्तीनेच सर्वांनी ब्रह्मदेवाकडे गार्हाणं मांडले. संरक्षणाचा उपाय विचारला आणि शांतपणे जगण्याची इच्छाही प्रकट केली. ब्रह्मदेवांनी ही मागणी, हे गार्हाणे भगवान विष्णूंना सांगितले. त्यांनी योग्य विचार करून आणि मानवाची अत्यंत निकड ओळखून ब्रह्मदेवांना अवतार घेण्याचे कबूल केले.
भगवान विष्णूंचा हा सातवा अवतार समाजकल्याणासाठी होता. कार्याची आवश्यकता काय हे स्मरणात ठेऊन अयोध्येचा राजा दशरथ याच्यापोटी जन्म घेण्याचा निर्धारच भगवान विष्णूंनी घेतला. त्याचा परिणाम हा त्या बालकाला मातेच्या उदरातल्या वास्तव्यापासूनच विदित होता. परमेश्वराचा अवतार हा विषय पायाभूत ठेऊन जर विचार केला तर जाणवते की जे कार्य करण्यासाठी भगवान अयोध्येत अवतरले ते कार्य हा अवतारी पुरुषाचा कार्यहेतू असणारच !
त्यामुळे रामांचे सामाजिक कार्य ह्या विषयाचा विचार करताना आश्चर्य वाटावं, कौतुक वाटावं आणि अभिमान वाटावा असच सर्व पहावं लागणार आहे. एखाद्या व्यक्तीकडून काय काम करून घ्यायचे हे जेव्हा परमेश्वर ठरवतो तेव्हा ते होतेच. पण याचा अर्थ असा नाही की रामांनी काही प्रयत्नच केले नाहीत. श्रीरामांच्या मनातील विचार कृतीत उतरवण्याचे धाडस स्वतः श्रीरामांनीच केले आहे. म्हणून तर एक मानव म्हणून जन्माला येऊनही प्रभू बनले आणि आज इतकी वर्षे झाली तरीही त्यांची ‘प्रभू श्रीराम’ ही छबी आपल्या भारतीयांच्या मन:पटलावर स्पष्टपणे आणि नीटनेटकी कोरलेली आहे. तेव्हा रामांचे सामाजिक कार्य पाहताना घडलेल्या घटना त्या घटनांच्या मागे त्या घडायच्या आधी ईतरांचे विचार व प्रयत्न आणि त्या प्रत्यक्ष घडताना श्रीरामांचा सर्वोत्तम प्रयत्न याचा विचार करूनच ह्या विषयाकडे आपल्याला पहावे लागेल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कलियुगातील आत्ताच्या परिस्थितीत जे सामाजिक कार्य केले जाते किंवा ह्या विषयाकडे बघितले जाते याची तुलना केल्यास श्रीरामांच्या कार्याची आणि कार्यामागच्या तळमळीची कल्पना करता येईल. आणि तेव्हाच ते कार्य किती अद्वितीय होते याची जाणीव मनाला पटेल.
तर श्रीरामांच्या चरित्रातील क्रमशः घडणाऱ्या घटनातूनच त्यांच्या प्रकृतीत ओतप्रोत भरलेले समाजप्रेम आपण बघणार आहोत. अर्थात् ओघाने त्याने समाजासाठी काय कार्य केले ह आपल्याला कळणार आहे. काही ठिकाणी गुरुंची आज्ञा, काही ठिकाणी गुरुंना सहाय्य, काही ठिकाणी मित्रप्रेम काही ठिकाणी राजकारण तसेच काही ठिकाणी कर्तव्य रघुवंशाची प्रतिष्ठा आणि मानवता ह्या दृष्टिकोनातून घटना घडल्या आहेत.
श्रीरामांकडून परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृताम करवून घ्यायचे म्हणून भगवान विष्णूंनी अवतार घेतला. ह्या अवतार कार्यात श्रीरामांना मदतनीस हवेतच ! ह्या साठी भगवान विष्णूंनी वानर ही जात निर्माण केली. सर्व देवतांना, यक्ष, गंधर्व, किन्नर, उरग, नाग, विद्याधर यांना पुत्रयोजना करण्यास विनंती केली. रावणाने भगवान शंकरांकडून मिळवलेल्या वरामुळे लंकाधिपती रावण केवळ दोन जमाती सोडून बाकीच्या दोन जमातींकडून निर्भय होता.
स्वतःच्या उन्मत्तपणामुळे दंभाने, अहंकाराने मानव आणि वानर या दोन जमातींचे त्याला भय वाटतच नव्हते. त्यामुळे रावणाने आपल्या वरामध्ये या जमातींचा उल्लेख केला नव्ह्ता. आणि हे विष्णूला माहीत असल्याने त्याने मानवरूपात अवतार घ्यायचे तर ठरवलेच आणि त्याला साहाय्यभूत म्हणून वानरजात निर्माण केली. त्यामुळे शंकराच्या तथास्तुचा उद्देशही साध्य होणार होता. आणि विष्णूंचा अवतार सफल होणार होता. आता बघू भगवान विष्णूच्या सातव्या अवतारात जन्माला आलेल्या कौसल्यासुत श्रीरामांचे सामाजिक कार्य.
व्यक्तीकडून चांगल्या कामाचा अभ्यास होताना त्या चांगल्या कामाच्या क्रमवारीच्या आधी त्या कामामागची प्रेरणा पाहणे हे जास्त संयुक्तिक ठरेल. म्हणून रामांची मनोवस्था निर्माण करण्याचे कार्य वयाच्या सहाव्या वर्षापासून ऋषी वसिष्ठांनी केले ते गुरुकुलात! श्रीरामांवर होणारे हे संस्कार हा त्यांच्या कार्याचा पाया होता.
एक क्षत्रिय म्हणून युद्धशास्त्र शिकणे हे वरवर पाहता आवश्यक असले तरी त्याबरोबर श्रीरामांकडून धर्मशास्त्र, नीतीशास्त्रे यांचा अभ्यास तर सहजपणे करवला. पण वेद, पुराणं उपनिषदं याचांही अभ्यास करविला गेला. संस्कार हा काही वेगळा विषय नसतो व त्याचा अभ्यासक्रमही ठरलेला नसतो. पण वरील सर्व गोष्टी शिकत असतानाच हंसवृत्ती रामांना समजावली जात होती, ज्याला आपण विवेक म्हणतो. त्यामुळे केवळ पाठांतर न करता योग्य वेळी योग्य उपाययोजना करण्याचा विवेक रामांना समजला. नित्य व्यवहारातील अनेक वर्तनाचे ठोकताळे रामांना उदाहरणासहीत पटवले गेले. अगदी संवाद करताना समोरच्या व्यक्तीचा आपल्याशी असलेला संबंध, त्यांचे नाते, त्याचे वय, त्याचा अभ्यास, त्याची योग्यता, त्यांना आपल्याबद्दल काय वाटते या सर्व गोष्टींचा विचार करून बोलावे. बोलताना स्वरांची उंची, शब्दांचा वापर, चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली यांचा विचारही श्रीरामांनी नित्य केलेला दिसतो. भल्या भल्यांना आज संयम आणि मौन यातील तफावत सांगता येणार नाही. पण श्रीरामांच्या सहा ते नऊ वयातच त्यांना हे समजावले गेले आणि त्या दोन्हींचे महत्त्वही पटवले गेले.
आजकाल कायद्याचा बडगा आपण सर्वजण जाणतोच. पण काही शहाण्यांना त्यातील पळवाटा माहीत असतात. तसेच आपल्या धर्माबाबत सांगता येईल. धर्मशास्त्रात बऱ्याच गोष्टी करू नका असे सांगितले असूनही त्या कधी कधी केल्या तरी चालतील हेदेखील सांगितलेले असते. किंवा काही गोष्टी केल्याच पाहिजेत असे सांगितलेले असतानाही त्या कधी कधी केल्या नाहीत तरी चालतील हे सांगितलेले असते. यालाच आपण धर्म खूप सूक्ष्म आहे असे म्हणतो. ही आपल्या धर्मातील सूक्ष्मताही रामांनी याच तीन वर्षांत ग्रहण केली होती. अर्थात हे संस्कार अनेक गोष्टी शिकता शिकता त्यांच्यावर आपोआप झाले होते. इथे लक्षात घ्यायचा मुद्दा हा आहे की त्यांच्या नकळत त्यांच्यावर होणारे संस्कार त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांनी लक्षात ठेवले. पुढची गोष्ट म्हणजे त्या त्या वेळी ते संस्कार त्यांनी आचरणात आणले. श्रीरामांचे समाजकार्य बघताना रामांच्या मानसिकतेला योग्य वाट या तीन वर्षातच दिली गेली आणि हीच वाट त्यांनी पुढे अखंडपणे आपल्या आयुष्याची वाट चालण्यासाठी उपयोगात आणली.
गुरुकुलातून परत अयोध्येला आल्यानंतर रामांना आपला देश पूर्ण पाहण्याची इच्छा होती. ती महाराज दशरथाने पूर्ण केली. तीन वर्षे फिरून राम लक्ष्मण परत अयोध्येला आली जाताना आनंदी असणारे श्रीराम परत आल्यावर शांत आणि अबोल झाली. राजा दशरथ, विश्वामित्र व अनेक अमात्य मंडळींनी विचारल्यावरही राम काही बोलेनात. का? काय असावे कारण? हे कारण कळल्यावर त्यांच्या समाजकार्याची घातलेली नीव किती कणखर होती याची सत्यता पटते.
अचानक विश्वामित्र दशरथाकडे येतात आणि श्रीरामांची मागणी करतात. ही सहजपणे घडलेली घटना नाही. तर ती ठरवून, संकल्प करून घडवून आणली आहे. त्यामागे काय योजना होती? ती योजना बहुतेकांना माहीत नसते. पण अयोध्येला राजा दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी व अश्वमेध यज्ञप्रसंगी समाजाच्या भल्यासाठी विश्वामित्रांनी अन्य कुणाचेही धाडस न झाल्याने एक संकल्प केला होता. त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठीची सुरुवात म्हणून ही रामाची महाराजांकडे होणारी मागणी! त्यासाठी आमंत्रण नसताना अचानक विश्वामित्रांचे अयोध्येला येणे झाले. प्रथम नकार पण नंतर होकार दिल्यावर रामांना हे जेव्हा समजले त्यावेळी आनंदी झालेले राम मुनींबरोबर जायला तयार झाले.
विश्वामित्रांबरोबर यज्ञरक्षणासाठी रामांनी जावे यासाठी वसिष्ठांनी महाराजांना पटवले. पण विश्वामित्रांच्या मागणीच्या हेतूची वाहवा केली. राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर यज्ञरक्षणासाठी जायला निघाले. त्यामागचे कारण आपल्या विषयाला बळकटी देणारेच आहे. गुरुकुलातून शिक्षण घेऊन देशाटनाच्या पाहणीतून रामांना जी परिस्थितीची जाणीव झाली त्यामुळे राम दुःखी झाले. त्यांना आपण क्षत्रिय असल्याची आणि धनुर्विद्या ज्ञात असल्याची लाज वाटू लागली. त्यावेळेच्या रामांच्या वयाकडे पाहता एवढा प्रगल्भ विचार राम करीत होते याचे आश्चर्य वाटते. पहा त्यांचे विचार….
“इतके आश्रम उजाड झाले. इतक्या ऋषींना राक्षसांनी मारले. कारण या राक्षसांवर कुणाचाही वचक नाही किंवा त्यांना शिक्षा करणारे कुणी पुढे येत नाही. पण हे काम मी का नाही करत? माझे युद्धशास्त्राचे शिक्षण झाले आहे आणि मी क्षत्रिय आहे. मग केवळ क्षत्रिय आहे म्हणून मी युद्धशास्त्र शिकलो का? हे शिक्षण केवळ माझ्यावर कुणी चालून आले तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच आपण शिकलो का? या शिक्षणाचा उपयोग केवळ मी माझ्या घरासाठीच करायचा का? मग काय एवढा शिक्षणाचा उपयोग? (आजकाल लठ्ठ पगार मिळावा म्हणूनच डिग्री हवी आणि डिग्रीसाठी म्हणून शिक्षण हे समीकरण आहे.) मी जर माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करीत नसेल तर धिक्कार आहे त्या शिक्षणाचा! अशा शिक्षणाचा काय उपयोग?”
या विचारांनी दुःखी होणारे राम भयापोटी पिताश्रींजवळ काहीच बोलत नाहीत. पण मनातून उद्विग्न झाले होते. तरी सुद्धा विश्वामित्रांची मागणी महाराजांचा होकार आणि राम लक्ष्मणांना त्यांच्याबरोबर जाणे हे श्रीरामांच्या इच्छेला पूरक होते. यज्ञरक्षणाच्या निमित्ताने त्यांना दुर्जनांचा नाश करण्याची संधी मिळणार होती. विश्वामित्रांच्या मागणीने आनंदी झालेले राम तेव्हा व्यक्त झाले आणि महाराज मनातून धन्य झाले. श्रीरामांच्या या जप्त होण्यातून त्यांचा समाजस्नेह आणि त्याबाबत असलेले त्यांचे कर्तव्य नजरेआड करता येणार नाही. वयाचा विचार केला तर रामांना त्यावेळी श्रीमंतीत, आरामात जीवन जगता आले असते. पैसा, मान, हक्क, सर्व-सर्व त्यांच्याकडे होते. कोणतंही बंधन नव्हते. एक राजपुत्र म्हणून ते सुखात जगू शकले असते. पण वय वाढले की तसा समंजसपणाही येतो. काही मते बदलतात. तत्त्व तावून सुलाखून आचरणात आणण्याचा ध्यास लागतो. त्यातून लोककल्याणाची जिज्ञासा, जिज्ञासेतून कृतीशीलता, त्यासाठी मनात अखंड वाहणारा पुण्यपावन मानवतेचा स्रोत हा निर्माण होणेच केवढे कौतुकास्पद! केवळ अलौकिक! समाजासाठी आपले असणारे नाते, त्या नात्यातून येणारी जबाबदारी, कर्तव्य याची जाणीव मनात सहजपणे उद्दीपित होणे यालाच समाजस्नेह म्हणतात आणि यातूनच त्यांचे ईप्सितकार्य त्यांनी आयुष्यभर केले.
तळटीप : प्रस्तुत लेखमाला ही प्रामुख्याने वाल्मिकी रामायणावर आधारित आहे.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry
उद्बोधक माहीती
छान लेख आहे. मनापासून आवडला.
सुंदर माहिती