Darśana | दर्शन

Darśana literally means ‘an instrument of realization.’ This pillar deliberates upon Philosophical, Theological and Spiritual thoughts which were imparted, flourished and practiced in India from time to time.

श्रीकृष्ण आणि अर्जुन गीता-संवाद – लेख तिसरा

by | Sep 1, 2020 | 2 comments

                       

  पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयम्

अर्जुन रथावर आरूढ होऊन युद्ध भूमीकडे प्रयाण करतो. युद्धभूमीला पोचल्यावर धृतराष्ट्राचे बल पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,

 

शुचीर्भूत्वा महाबाहो संग्रामाभिमुखे स्थित:।

पराजयाय शत्रूणां दुर्गास्तोत्रमुदीरथ ।।२।।

 

हे महाबाहो अर्जुना, तू युद्धाकरिता तयार झाला आहेस. पण तत्पूर्वी तू दुर्गेची स्तुती कर. भगवान श्रीकृष्णाने असे म्हणताच,अर्जुन रथातून खाली उतरला व त्याने दुर्गास्तुतीला प्रारंभ केला.

 

भद्रकालि नमस्तुभ्यं महाकालि नमोस्तुते ।

चण्डक चण्डे नमस्तुभ्यं  तारिणि वरवर्णिनि॥

(महाभारत. भीष्मपर्व २३/५)

 

जवळपास १२-१३ श्लोकांमधून अर्जुनाने दुर्गेची स्तुती केली आहे. वस्तुतः भगवान श्रीकृष्ण स्वतः सारथी असताना इतर कुणाचीही अर्जुनाला आवश्यकता नव्हती. पण स्वतः श्रीकृष्णाने त्याला तसे करायला सांगितले होते. “सौंदर्यलहरी”या आपल्या स्तोत्रात आद्य शंकराचार्यही म्हणतात,

 

शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्त्त: प्रभवितुम् ।

 

शिव जर शक्तीसोबत असेल तरच तो आपला प्रभाव प्रकट करू शकतो. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा युद्धात प्रत्यक्ष सहभाग न घेता पांडवांची साथ द्यायचे ठरवले तेव्हा त्यांनी पांडवांच्या विजयासाठी आपले संपूर्ण सामर्थ्य पणाला लावायचे ठरविले होते. त्यासाठी त्यांना शक्तीची म्हणजे दुर्गेच्या सामर्थ्याची गरज होती. म्हणून त्यांनी अर्जुनाला दुर्गास्तुती करण्यास सांगितले. दुर्गा प्रसन्न झाली व तिने अर्जुनाला वर दिला.

 

“स्वल्पेनैव तु कालेन शत्रुन्नेष्यसि पाण्डव |”

तू लवकरच शत्रूंवर विजय मिळवशील. अशाप्रकारे दुर्गादेवीचा आशीर्वाद घेऊन अर्जुन पुन्हा रथावर आरूढ झाला. श्रीकृष्णाने आपला पांचजन्य व अर्जुनाने देवदत्त हा शंख वाजविला. युद्ध आरंभ करण्याची ती नांदी होती. युद्धाला प्रारंभ झाला.

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ युध्दभूमीवर आणून ठेवला. भगवद्गीता ही युध्द सुरू होण्याच्या अगोदर सांगितली गेली आहे. परंतु संजयाने त्याचे वर्णन दहाव्या दिवसानंतर करणे सुरू केले आहे. संजय स्वत: कुरुक्षेत्रावर होता. परंतु भीष्माचार्य रथातून खाली पडल्यानंतर तो धृतराष्ट्राकडे आला व त्याने हा वृत्तांत धृतराष्ट्राला सांगितला. भीष्माचार्य यांच्या रथातून पतनाची बातमी ऐकून धृतराष्ट्र अतिशय व्यथित झाला व त्याने संजयाला प्रश्न विचारला,

‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः |

मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय |’

(भगवद्गीता. १/१)

हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर एकत्रित झालेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले ?’

महर्षी व्यासांनी फार कुशलतेने भगवद्गीतेचा प्रारंभ केला आहे. या श्लोकातील पहिला शब्द ‘धर्म’ आहे. संपूर्ण गीतेत धर्माचेच आख्यान आले आहे. संपूर्ण गीता ही अशीच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या प्रश्नोत्तरांनी व्याप्त आहेत. अर्जुनाला युध्दासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्याचा मनात निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे भागवद्गीता होय. गीतेची थोरवी सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

‘तैसे हे नित्य नूतन देखिजे। गीतातत्त्व ।(ज्ञानेश्वरी ११/७१)

गीतेचे स्वरूप हे नित्य नवीन आहे. नित्य नूतन म्हणजे प्रथमक्षणी ते जसे असते, तसेच ते शेवटपर्यंत कायम राहणे. नव्या वास्तूचे आकर्षण प्रथम क्षणी जेवढे वाटते, तेवढे ते नंतर वाटत नाही. वारंवार बघितल्यामुळे त्याबद्दलचे प्रेम कमी होऊन ती वस्तू जुनी वाटू लागते. पण ती गोष्ट गीतेच्या बाबतीत लागू होत नाही. हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भगवद्गीता आजही जगाला तेवढीच नवीन वाटते. कारण हा वेदार्थसागर आहे. अतिशय अगाध असे तत्वज्ञान या ग्रंथात साठलेले आहे. इतर ग्रंथात परमेश्वराचे वर्णन असते. जसे रामायणात प्रभू श्रीरामांचे, भागवतात भगवान श्रीकृष्णांचे; पण गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे जो स्वयं परमेश्वराने सांगितला आहे.

मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले धर्माख्यान होय. हे धर्माख्यान धर्मक्षेत्रावर म्हणजेच कुरुक्षेत्रावर सांगितले आहे. येथे वक्ता धर्मप्रणेता आणि श्रोता हा धर्मवीर होय जो धर्माचे पालन करण्यात जो अग्रणी आहे. क्षेत्र कोणते तर धर्मक्षेत्र आणि कथा कोणती तर धर्मकथा! सर्वच धर्मामय असल्याने इथे अधर्माला काही जागाच नाही. भगवान श्रीकृष्णाकडून सर्व सिद्धता झाल्यावर अर्जुन धर्मालय असलेल्या कुरुक्षेत्रावर येतो. संजय युद्धाचा वृत्तांत धृतराष्ट्राला सांगत असल्याने भगवद्गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते. त्यात धृतराष्ट्र कुरुक्षेत्राचा उल्लेख धर्मक्षेत्र असा करतात. संपूर्ण सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे. हेच स्थलाच्या बाबतीतही तितकेच लागून होते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणाच्या गुणांनुसार मनुष्याच्या मतीत फरक पडतो. माणूस तीर्थस्थळी गेला तर तिथल्या सत्त्वगुणाच्या आधिक्याने साहाजिकच मनुष्याची बुद्धी पालटते. एखादा तमोगुणी माणूस एखादा वाईट विचार घेऊन जरी धर्मस्थळी गेला तरी त्याच्या वृत्तीमध्ये तेथील वातावरणाने फरक पडतो. संपूर्ण नाही अंशत: तरी नक्कीच फरक पडतो.

कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र होते. त्यामुळे तिथे गेल्यावर कौरवांच्या वृत्तीत फरक पडून ते युद्धापासून परावृत्त तर होऊ पाहत नाही  नं असा प्रश्न धृतराष्ट्राच्या मनातून घोळत होता. म्हणूनच तो कुरुक्षेत्राचा धर्मक्षेत्र असा उल्लेख मुद्दामच करतो. त्यावर संजय युद्धाचे सविस्तर वर्णन सुरू करतो.

पांडवांचे सैन्य पाहून दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी येऊन त्यांच्या सैन्याचे वर्णन करू लागतो. कौरवांचे सैन्य अकरा अक्षौहिणी सेना तर पांडवांचे सैन्य सात अक्षौहिणी सेना होते. एक अक्षौहिणी सेना म्हणजे एकवीस हजार आठशे रथ, एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती, पासष्ट हजार आठशे दहा घोडे, एक लाख नऊ हजार पाचशे पन्नास पदाती. यावरून तेथे जमलेल्या अफाट सैन्याची कल्पना येऊ शकते. म्हणून माऊलींनी या पांडवांच्या सैन्याला सैन्यसिंधु अशी उपमा दिली आहे.

‘तेणे हा सैन्यसिंधु पाखराला’

सिंधू म्हणजे समुद्र. ही उपमा देण्यामागचा हेतू हाच की पांडवांच्या सैन्याचा पारच दिसत नव्हता. सेनेचे अमर्यादत्त्व विशद करण्यासाठी हा शब्द माऊलींनी वापरला. दुसरे असे की समुद्राचा गंभीर स्वभाव हाही गुण येथे त्यांना अधोरेखित करावयाचा आहे. लोकनायक बापूजी अणे यांनी लोकमान्य टिळकांवर जे महाकाव्य लिहिले त्यात ते म्हणतात,

‘धैर्येण भूधर इव अम्बुधिवत् गभीरे’ लोकमान्य टिळक हे पर्वताप्रमाणे धैर्यवान व सागराप्रमाणे गंभीर होते. माऊली जेव्हा पांडवांच्या सैन्याला सागराची उपमा देतात तेव्हा ते कदाचित पांडवांचे सैन्य हे अतिशय गंभीर प्रकृतीचे म्हणूनच युद्ध जिंकण्याबाबत दृढनिश्चयी होते असे म्हणत असावेत.

दुर्योधन सर्वप्रथम पांडव सैन्याच्या मुख्य मुख्य वीरांची माहिती करून देऊन नंतर स्वतःच्या सैन्यातील वीरांचा परिचय देतो. तो म्हणतो

‘अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्

पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्॥’ (भगवद्गीता १.१०) भीष्माचार्यांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्वदृष्टीने अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले त्यांचे सैन्य जिंकायला सोपे आणि मर्यादित आहे.

युद्धात सेनापतीच्या आदेशानेच सैन्य आपापल्या चाली खेळत असतात. वरील श्लोकातील पहिली ओळ त्यादृष्टीने अगदी खरी आहे. पण दुसऱ्या ओळीत ‘पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्’ असे म्हटले आहे. वस्तुत: पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न असताना दुर्योधन त्याचे नाव न घेता भीमाचे नाव घेतो. याचा अर्थ वरकरणी जरी त्याने पांडवांचा आपण सहज पराभव करू असे म्हटले असले; तरी त्याच्या मनात भीमाकडून पराभूत होण्याची भीती होती असे स्पष्ट दिसते. हे जाणूनच की काय पितामह भीष्माचार्यांनी आपला शंख वाजवून सर्वप्रथम सिंहनाद केला. त्यानंतर सगळ्यांची शंख, ढोल, नगारे अशी सर्व वाद्ये वाजू लागली. त्याचा भयंकर असा आवाज झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आणि नंतर अर्जुनाने शंख वाजविला. भगवान श्रीकृष्णांच्या शंखाचे नाव पांचजन्य तर अर्जुनाच्या शंखाचे नाव देवदत्त असे होते. तसेच भीम, युधिष्ठिर, नकुल व सहदेव यांच्या शंखांची नावे अनुक्रमे पौंड्र, अनंतविजय, सुघोष व मणिपुष्पक अशी होती.

भगवद्गीतेत पाच पांडव व भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखांचा विशेष नामोल्लेख आहे. पांडवांच्या पक्षातील सर्व योध्यांनी केवळ शंखनाद असे गीता वर्णन करते. त्या पांडवांच्या केवळ शंखनादानेच आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेली. या शंखनादाने कौरवांच्या सैन्यांमध्ये भय निर्माण केले.

स घोषो धार्तराष्ट्रांना हृदयानि व्यदारयत्।

थोडक्यात काय तर पांडवांच्या शंखनादच इतका प्रचंड होता की इतर रणवाद्यांची त्यांना गरजच नव्हती. युद्धापूर्वी रणवाद्ये वाजविण्याचे प्रयोजन हेच असते की प्रतिपक्षाच्या मनात भय निर्माण व्हावे आणि युद्धानुकूल वातावरण तयार ह्वावे. ही दोन्ही प्रयोजने पांडवांच्या शंखनादाने साध्य झाल्याने इतर रणवाद्यांची गरजच भासली नाही. तसेच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या शंखांचा उल्लेख ‘दिव्यौ शङ्खौ’ (दिव्य शंख) असा उल्लेख आला आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचे दिव्यत्व प्रकट होऊन इतर रणवाद्ये वाजवण्याची त्यांना गरज वाटली नसावी.

 

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry

ह्या लेख मालिकेतील  दुसरा लेख इथे वाचा.

Author : विद्या बोकारे

सौ. विद्या बोकारे ह्या भारतीय तत्वज्ञान आणि धर्म यांच्या अभ्यासक आहेत.

2 Comments

  1. Anjali Ranade

    विद्या
    छान अभ्यासपूर्ण लेख वाचला 😀🙏

    Reply
  2. Vinayak Ranade

    Khup Sundar lekh.

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *