Saṁbhāṣā | संभाषा

Saṁbhāṣā literally means a ‘discourse’ or a ‘discussion.’ This pillar inquires into political, social and economic strands of the Indian thinking and brings to light some of the prominent debates, discourses and propositions emanating from the Indian thinkers or having direct resonance to Indian realities.

श्रीरामांचे सामाजिक कार्य – 2

by | May 7, 2020 | 0 comments

त्राटिका वधानंतर समाजासाठी काहीतरी केल्याचा पहिला आनंद त्यावेळी रामांना झाला असावा. एका श्रेष्ठ मुनींची इच्छा पूर्ण केल्याचे पुण्यही त्यांच्या पदरात पडले. श्रीरामांच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांना गुरू म्हणून लाभलेले वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचा रामांच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा होता. चांगल्या विचारांची नीव वसिष्ठांनी घातली आणि मानवतेचे शिल्प पुढे विश्वामित्रांनी घडवले.

माणसांमध्ये काही गुण हे कुलपरंपरेने आलेले असतात. तर काही रक्तातून (हेरीडिटी) असतात. काहींनी स्वतःच्या प्रयत्नांतून विकसित केलेले असतात. रामांच्या इक्ष्वाकू कुळाची परंपरा रामांना विश्वामित्रांनी सांगितली. ‘धनुर्भंग यज्ञ’ पाहण्यासाठी श्रीराम विश्वामित्रांबरोबर विदेही नगरीस (मिथीला नगरीस) जात होते. त्यावेळी मार्गात गुरूंनी त्यांना काही हकीगती सांगितल्या. प्रवासाचा वेळ सहजपणे व चांगला जावा यासाठी या गोष्टी सांगितल्या नाहीत. तर श्रीरामांच्या मानसिकतेला पैलू पाडणे हा हेतू त्यामागे होता. समुद्रमंथनाच्या कथेतून रामांना त्यांनी ठरलेले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत प्रयत्न चालूच ठेवायचे असतात आणि अपेक्षित गोष्ट मिळाली तरी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी देखील हसत हसत स्वीकारली पाहिजे हे सुचवले.

गंगावतरणची गोष्ट सांगून भगीरथाच्या आधीच्या चार पिढ्यांचे गंगावतरणासाठीचे प्रयत्न सांगून भगीरथाच्या प्रयत्नांना मिळालेले यश सांगितले आणि त्यातून इक्ष्वाकू कुळाची परंपरा अशी समाजहितासाठी होती हे रामांच्या मनावर त्यांनी बिंबवले. त्यानंतर बळीराजा व वामन अवतार ही गोष्ट सांगून प्रयत्नांच्या पराकाष्ठेनंतर यश मिळते पण त्यासाठी कुळाबद्दल अभिमान हवा आणि संघटन करून कार्यपूर्ती होतेच होते हे विचार सांगितले.

कार्तिकेय यांचे सैन्य संघटन व त्यांच्या लढायांमधील यश सांगून ‘गणपती’ या संबोधनाचा अर्थ सांगितला. अशा अनेक गोष्टीतून रामाच्या मानसिकतेवर सुविचारांचे सिंचन करून ‘तुला अद्वितीय कार्य करायचे आहे’ याची जाणीव करून दिली. रामांवर होणारे हे संस्कार, ही शिकवण त्यांना त्यांच्या ठरवलेल्या मनसुब्याजवळ नेणारीच होती.

राम लक्ष्मण मिथिलेला जाताना रामांच्या हातून अहल्या उद्धार करून घ्यायचा हे विश्वामित्रांनी आधीच ठरवले होते. सिद्धाश्रमातील त्यांचे प्रचंड प्रसंगावधान धैर्य आणि शौर्य यामुळे बऱ्याच जणांना रामांबद्दल विश्वास निर्माण झाला होता. राम चुकीचं काही करणार नाही याची खात्री झाली होती. त्यातून एका बलात्कारित युवतीला आत्महत्येपासून वाचवून पोटचा अंश जरी राक्षसाचा असला तरी त्याला माणूस बनवणे तुझच काम आहे हे समजून आई होण्यामागचा कर्तव्याचा भाग समजावला. या प्रसंगामुळे श्रीरामांच्या कामावर कुणी शंका घेऊ शकत नाही अशी परिस्थिती होती आणि म्हणूनच अहिल्या उद्धाराची घटना घडवली गेली. गौतमांचा शाप, इंद्राचे आणि अहल्येचे पापकर्म या घटना विश्वामित्रांना माहित असल्याने त्यांना  उ:शापही माहित होता. गौतमांनीच ‘राम येतील व त्यांच्या पूजनाने तू पावन होशील’ असं सांगितलेलं माहित असल्याने विश्वामित्रांनी मिथिलेला जाता जाता एका स्त्रीला तिचे आयुष्य तिला चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठीचे उपाय रामांकडून करवून घेतले. हासुद्धा समाजसेवेचा भाग नव्हे काय!

स्थळकाळाचे बंधन नसणारा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. समाजामध्ये कोणा एकाबद्दल आदर वाटावा, त्याला आदर्शस्वरूप मानावे यासाठी काही नियम नाहीत.

समाज त्या व्यक्तीच्या कार्याचा अभ्यास करीत असतो. कामातील निस्वार्थता ही समाजमनावर फार मोठा परिणाम घडवत असते. म्हणून सिद्धाश्रमातील वास्तव्यातून समाजाला बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. म्हणूनच विश्वामित्रांनी विचार केला की रामांनी माझ्याआधी अहल्येशी संवाद साधला पाहिजे.

तेव्हाच समाज विचार करील की श्रीरामांनी तिच्याशी सर्वप्रथम संपर्क केला म्हणून तो उचित होता.

मिथिलेस सीतेशी स्वयंवर, परशुरामांचे गर्वहरण, अयोध्येला स्वागत, बारा वर्षांचा काळ अयोध्येत आणि त्यानंतर राज्याभिषेकाच्यादिवशीच वनगमन ह्या घटना घडल्या. अयोध्येतून यज्ञरक्षणासाठी निघाल्यापासून साधारणत: तेरा चौदा महिन्यांच्या कालावधीनंतर राम लक्ष्मण अयोध्येला आले. आणि तोपर्यंतच्या या कालावधीत रामसार सूज्ञ झाले होते. युवराज म्हणून त्यांच्याकडे पाहणारी प्रजा त्यांना राजा म्हणून स्वीकारायला तयार झाली. बारा वर्षांच्या ह्या अयोध्येतील वास्तव्यात अनेक गोष्टींचे आकलन त्यांना झाले होते. तिथे वाचकांनी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की विश्वामित्रांचा हेतू अजून कुठे सफल झाला होता. रावणवधाचा संकल्प जो त्यांनी केला होता तो तर अजून शेष होता! वाल्मिकींच्या ग्रंथात विश्वामित्र अयोध्येत काही दिवस राहून दंडकारण्यात गेले असा उल्लेख आहे. बारा वर्षे अयोध्येतील राम-सीतेच्या वास्तव्यानंतर रामांना वनवास होतो हे वाचकांना माहीत आहेच. कैकेयीने आपल्या स्वार्थलोलुपतेतून रामांना वनवासात पाठवले हेही माहित आहे. पण हे खरे आहे का?

 हे जाणून घेण्यासाठी मी वाचकांना या घटनेच्या सत्तावीस वर्षे मागे घेऊन जाणार आहे. (राम वनात गेले तेव्हा ते सत्तावीस आणि सीता एकोणीस वर्षांची होती.)

सत्तावीस वर्षांपूर्वी पुत्रकामेष्टी प्रसंगी घडलेली घटना आणि त्या घटनेमुळे कैकेयीने व विश्वामित्रांनी केलेला संकल्प आपल्याला बघावा लागेल. त्यापैकी विश्वामित्रांच्या संकल्पाचा उल्लेख आणि त्याचसाठी रामांची मागणी हे आधीच मी आपल्याला सांगितले आहे. पण विश्वामित्र स्वतःचा संकल्प पूर्ण झाला नसताना रामाकडून काही अपेक्षा न करता दंडकारण्यात परत का गेले? रामांना रावण वधाची आठवण त्यांनी का करून दिली नाही? या प्रश्नांची उत्तरे कैकयीच्या संकल्पात आहेत. त्यावेळी तिने केलेला संकल्प हा केवळ वसिष्ठांजवळच तिने व्यक्त केला होता. सर्वांना माहित नव्हता आणि तसेही त्यानंतर वसिष्ठांनी केवळ सर्व ऋषीमुनी, देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, उरग, विद्याधर यांनाच तो संकल्प सांगितला. कारण या संकल्पपूर्तीसाठी वरील सर्वांची मदत होणार होती.

प्रस्तुत लेखमाला प्रामुख्याने वाल्मिकी रामायणावर आधारित आहे.

या लेखमालेतील आधीचा लेख  इथे वाचा.

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry.

Author : सौ. नीलाताई रानडे

सौ. नीलाताई रानडे ह्या वाल्मिकी रामायणाच्या अभ्यासक आहेत

0 Comments

Trackbacks/Pingbacks

  1. श्रीरामांचे सामाजिक कार्य - ३ - Mimamsa - […] लेखमालेतील आधीचा लेख इथे […]

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *