Itihāsa | इतिहास

Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.

कश्मीरे संस्कृतम् – २

by | May 12, 2020 | 0 comments

नमस्ते शारदे देवि काश्मीरपुरवासिनि |

त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ||

हा श्लोक अनेकांच्या परिचयाचा असेल. देवी सरस्वती ही कश्मीरमध्ये निवास करणारी आहे, म्हणून मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, कश्मीरचे एक प्राचीन नाव ‘शारदापीठ’ हेसुद्धा आहे.

देवी सरस्वतीचे निवासस्थान म्हणून तर ते शारदापीठ आहेच पण ऐतिहासिकदृष्ट्या तक्षशीला, नालंदा यांच्याप्रमाणे कश्मीर हे विद्येचे फार मोठे केंद्र होते.  हे शारदास्तवन जे आपल्या नित्य प्रार्थनेचा भाग आहे, ती आद्य शंकराचार्यांची रचना असून तिचा इतिहास असा सांगितला जातो – कश्मीरमधील शारदादेवीचे मंदिर हे ज्ञानविज्ञानाचे फार मोठे केंद्र होते. त्याला ‘सर्वज्ञपीठ’ म्हणत. जो सर्वज्ञ असेल तो या पीठावर हक्क सांगत असे. त्या मंदिराला चार दरवाजे होते. त्यापैकी तीन उघडे होते आणि दक्षिण दिशेचा दरवाजा बंद होता. याचा अर्थ, तोपर्यंत सर्वज्ञपीठावर बसेल असा कोणी दक्षिणेचा पंडित कश्मीरात आलेला नव्हता. आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांसमवेत तिथे गेले. तेथील सर्व शाखांच्या विद्वानांचा पराभ‌व करून त्यांनी दक्षिण दरवाजा उघडलाच आणि ते सर्वज्ञपीठावर विराजमान झाले. त्या विजयाच्या वेळी साक्षात शारदादेवीने त्यांना दर्शन दिले आणि त्याप्रसंगी त्यांनी या शारदास्तवनाची रचना केली असे मानले जाते. या शारदापीठानेच शारदा लिपीही प्रचलित केली.

कश्मीर हे प्रदीर्घ काळासाठी विद्येचे केंद्र कसे होते हे जाणून घेण्यासाठी कल्हणाच्या राजतरंगिणीकडे जाऊया. कश्मीरची अलौकिक वैशिष्ट्ये कोणती हे सांगताना कल्हण लिहितो –

विद्यावेश्मानि तुङ्गानि कुङ्कुमं सहिमं पयः

द्राक्षादि यत्र सामान्यमस्ति त्रिदिवदुर्लभम्| (राजतरंगिणी 1.42)

उत्तुंग अशी विद्यालये, केशर, बर्फासहित पाणी, द्राक्षासारखा सुकामेवा या तिन्ही लोकात दुर्मिळ असणाऱ्या गोष्टी कश्मीरमध्ये सहजपणे उपलब्ध असतात. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, कल्हण उत्तुंग राजप्रासाद वा भव्य मंदिरांचा उल्लेख करत नाही तर विद्यावेश्म म्हणजेच उत्तुंग विद्यापीठांचा उल्लेख करतो आहे.

राजतरंगिणीत कल्हण आपण हा ग्रंथ लिहिण्यासाठी कोणती पद्धत अंगिकारली त्याबद्दल जे सांगतो, त्यावरुनही कश्मीरमधील तत्कालीन शिक्षणाच्या स्तराचा अंदाज करता येणे शक्य आहे. आधुनिक संशोधकाला साजेल अशा पद्धतीने त्याने राजतरङ्गिणी या ऐतिहासिक ग्रंथाची पूर्वतयारी केलेली आहे. उपलब्ध साहित्याचा, ग्रंथांचा अभ्यास करुन त्याने लिटरेचर रिव्ह्यू दिला आहे. क्षेमेंद्राच्या ‘नृपावली’ या ग्रंथावर टीका करताना तो लिहितो की काव्यग्रंथ रचत असल्यामुळे क्षेमेंद्र इतिहासाकडे दुर्लक्ष करतो. राजतरङ्गिणी लिहिण्याआधी पूर्वी प्रकाशित झालेल्या जवळजवळ अकरा ग्रंथांचा अभ्यास कल्हणाने केला आहे. त्यातील सनावली, राजांची नावे यांचा तौलनिक अभ्यास केला आहे. त्यात जे तपशील संदिग्ध वाटतील तेथे निर्णय घेण्यासाठी उपलब्ध पुराव्यांची कसून तपासणी केली आहे. प्राचीन शिलालेख, ताम्रपट, नाणी, मुद्रा या सगळ्यांचा अभ्यास केला आहे. यात कल्हणाची शास्त्रीय दृष्टी दिसते यात शंकाच नाही; पण ज्या शैक्षणिक वातावरणात तो वाढला त्याचाही हा परिपाक आहे, हे निश्चित. भारतीयांना ऐतिहासिक दृष्टी नव्हती आणि नाही, असे एक सरधोपट विधान वारंवार केले जात असताना एकट्या कश्मीर प्रांताच्या इतिहासाचे अकरा ग्रंथ कल्हण अभ्यासतो; हे तथ्य अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहे. या अकरा ग्रंथांतील सर्वाधिक जुना ग्रंथ आहे, ‘नीलमतपुराण’. हा साधारणपणे पाचव्या वा सहाव्या शतकातील मानला जातो. कल्हणाचा ग्रंथ आहे इ.स.११५० मधील. म्हणजेच कित्येक शतके इतिहास लेखनाची परंपरा इथे सातत्याने सुरु होती. हे झाले एका इतिहास या विषयाच्या लेखनाविषयी. त्याखेरीजही प्रत्येक ज्ञानशाखेसंदर्भात कश्मीरचे योगदान अतुलनीय आहे. साक्षात् पाणिनी कश्मीरचा होता असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. असाच दावा पतंजली बाबतही केला जातो. हे जर मान्य केले तर देवी पार्वती आणि देवी शारदा यां बरोबरीने कश्मीर संस्कृत भाषेचीही महत्त्वाची कर्मभूमी ठरेल. संस्कृत व्याकरणाच्या संदर्भात कश्मीरी विद्वानांचे योगदान हा खूप मोठा विषय आहे. (या संदर्भातील एका महत्त्वाच्या ग्रंथाची link खाली दिली आहे) आता वानगीदाखल काही उदाहरणे पाहू –

महाभाष्यावर प्रदीप टीका लिहीणारा कैयट कश्मीरचा, काशिकावृत्ती लिहिणारे जयादित्य-वामन म्हणजे राजतरंगिणीमध्ये ज्याचा उल्लेख आहे तो जयापीड राजा आणि त्याचा मंत्री वामन हे दोघेही काश्मीरचे, सुप्रसिद्ध काव्यशास्त्रज्ञ उद्भट हाही याच जयापीड राजाच्या पदरी होता. आचार्य रुद्रटही कश्मीरचे मानले जातात.

जिथे ठोस पुरावे हाती नसतात तिथे विधाने सांभाळून करावी लागतात. जी ठोस माहिती आपल्या हाती आहे त्या आधारे बोलायचे झाले तर मम्मट, आनंदवर्धन आणि अभिनवगुप्त हे निश्चितपणे कश्मीरचे होते. या एकाच वाक्यातून संस्कृत काव्यशास्त्र पूर्णपणे कश्मीरी शाखेचे ऋणी आहे हे लक्षात येते. कश्मीरसारख्या निसर्गरम्य प्रांतात काव्याचा जन्म झाला तर नवल नाही; पण काव्यशास्त्राच्या शास्त्रपरंपरेतील हे योगदान निॆःसंशयपणे तेथील ज्ञानपरंपरा दाखविते, असे म्हणता येईल.

महामुनि पतंजली यांचे व्याकरण (महाभाष्य), योगशास्त्र (पातंजल योगसूत्रे), आयुर्वेद (चरकसंहिता) अशा अनेक ज्ञानशाखांबद्दल असणारे मूलगामी योगदान सर्वांना परिचित आहेच. पण हा मुद्दा पुरेशा पुराव्याअभावी बाजूला ठेवावा म्हटले तरी आयुर्वेदातील एक अत्यंत महत्त्वाचे योगदान निःसंशय एका कश्मीरी विद्वानाचे आहे. हा विद्वान म्हणजे दृढबल. आज आपल्याला उपलब्ध अशी जी चरकसंहिता आहे ती दृढबलाने पूरित केलेली आहे. त्यातील सतरा प्रकरणे जी संपूर्णपणे उपलब्ध नव्हती, ती त्याने त्रुटीत भाग नव्याने लिहून पूर्ण केली. दृढबलाचा काळ इ.स ४०० ते ५०० च्या सुमारास मानला जातो. तो श्रीनगरजवळच्या पंचनदपूरचा रहिवासी होता. दृढबलाने आपल्याला दिलेली ही पूरित चरकसंहिता कश्मीरचे संशोधनातील योगदान अधोरेखित करते.

कश्मीरचे ऋण आपण निर्विवादपणे मानले पाहिजे असा आणखी एक प्रांत म्हणजे कथावाङ्मय. गुणाढ्याची बृहद्कथा हा आपला कथांचा अतिप्राचीन स्त्रोत जो मूळ पैशाची भाषेमधला ग्रंथ आता आहे तो आता उपलब्ध नाही.  पण या ग्रंथाची जी दोन संस्करणे आहेत – क्षेमेंद्राची बृहत्कथामंजरी आणि सोमदेवाचा ग्रंथ कथासरित्सागर -ती दोन्ही कश्मीरी आहेत.  क्षेमेंद्र आणि सोमदेव दोघेही अनंतराजाच्या (इ.स.११वे शतक) पदरी होते. अनंतदेवाची पत्नी राणी सूर्यवती विदुषी होती. तिला बृहत्कथामंजरी पसंत पडली नाही. तिने सोमदेवाला परत एकदा या कथा अधिक सुरस पद्धतीने सांगण्याविषयी सुचविले. सिंहासनबत्तीशी, विक्रमवेताळच्या कथा, पंचतंत्रातील अनेक कथा यांचे मूळ कथासरित्सागर मधील कथांमधे सापडते.

कश्मीरमधे झालेले कवी – विद्वान – शास्त्रकर्ते यांची यादी फार मोठी आहे. खरेतर इथेच कवी बिल्हणाची गोष्ट सांगण्याचा मोह होत आहे पण ती गोष्ट पुढील लेखासाठी राखून ठेवते. यात एक बाब नक्की अधोरेखित होते की मम्मटाच्या काव्यप्रकाशाचा, आनंदवर्धनाच्या ध्वन्यालोकाचा स्वीकार आसेततुहिमाचल झाला आहे. संपूर्ण भारतभर विद्येचे अभिसरण सुरु होते. त्याला कश्मीर अपवाद तर नव्हतेच किंबहुना तेथील विद्वानांनी या ज्ञानयज्ञाचे नेतृत्व केलेले आपल्याला दिसते.

असं म्हणतात की पूर्वी उपनयन संस्काराच्या वेळी बटू ‘मी कश्मीरला जातो’ असे म्हणून सात पावलं उत्तरेच्या दिशेने चालत असे. कारण कश्मीर भारताचे सर्वज्ञपीठ होते. तिथे शिकायला मिळणे हा बहुमान होता. अलिकडे ‘मोस्ट सॉट आफ्टर युनिव्हर्सिटीज’ असतात तसेच हे, आणि  हे तर साक्षात शारदापीठ आहे! पण मग मूळचे शारदापीठ असलेल्या कश्मीरमधे जन्मलेल्या मुलांना शिकण्याची संधी आणि त्याला पोषक वातावरण देणे हे आपले कर्तव्यच नाही का? इतिहास भविष्याकडे निर्देश करतो; तो कदाचित असा. कश्मीरच्या या समृद्ध ज्ञानपरंपरेविषयी आणखी जाणून घेऊया पुढील लेखामध्ये.

अधिक माहितीसाठी पहा-

https://archive.org/details/LinguisticTraditionsOfKashmirEssaysInMemoryOfPanditDinanathYakshMrinalKaulAshokAklujkar/mode/2up

ह्या लेखमालेतील पहिला लेख इथे वाचा.

Author : डॉ. समीरा गुजर -जोशी

 समीरा ह्या संस्कृत साहित्याच्या अभ्यासक असून भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे.

 

0 Comments

Trackbacks/Pingbacks

  1. कश्मीरे संस्कृतम् -३ - Mimamsa - […] ह्या लेखमालेतील पहिला लेख  इथे वाचा. […]

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *