Itihāsa | इतिहास

Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.

कश्मीरे संस्कृतम्|- १

by | May 1, 2020 | 13 comments

कश्मीरचे सौंदर्य वादातीत आहे. पण प्रत्यक्ष कश्मीर मात्र कायम वादग्रस्त राहिलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित पर्यटक म्हणून कश्मीरला भेट दिली असेल किंवा हिंदी चित्रपटातून आपण कश्मीर पाहिलेला असतो. अन्यथा बातम्यांमधून तेथे होणारा हिंसाचार, दहशतवाद, आपल्या सैनिकांचे शौर्य, प्रसंगी आलेले हौतात्म्य या गोष्टी आपल्यापर्यंत पोहचत असतात. पण या सगळ्यामधे आपल्या बाजूने एक प्रकारची तटस्थता किंवा एक निर्विकारपणा अनुभवाला येतो. अगदी साधं उदाहरण म्हणजे अनेक भारतीय प्रदेशातील लोकांच्या स्वभावावर विनोद केले जातात. असा कश्मीरी माणसावर विनोद ऐकलाय का? आपल्यासाठी कश्मीर हे एकतर कॅमेरात टिपलेले देखणे चित्र आहे किंवा जिथे जायला भिती वाटावी असा भाग आहे.

आता धारा 370 काढून टाकल्यानंतर पहिल्यांदा कश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जातो आहे. नजीकच्या इतिहासात असे घडल्याचे उदाहरण सापडत नाही. अनेकदा तर कश्मीर हे खोरे आहे, तिथल्या भौगोलिक – नैसर्गिक अडचणी विपुल आहेत त्यामुळे नेहमीच तो अलिप्त राहिलेला प्रदेश आहे असे आपल्या मनावर बिंबवले जाते. पण हे सत्य नाही. याचे साधे उदाहरण पाहूया. संस्कृत साहित्यशास्त्रातील श्रेष्ठ ग्रंथ कोणता? तर मम्मटाचा काव्यप्रकाश. मम्मट कुठला? कश्मीरचा. नाट्यशास्त्रावरील प्रमाणित टीका कोणती? तर अभिनवभारती. ती लिहीणारा अभिनवगुप्तहि कश्मीरचा. ह्या ग्रंथांचा प्रचार, प्रसार आणि अभ्यास आसेतूहिमाचल संपूर्ण भारतखंडात होत होता हे सत्य आहे. कश्मीरचे संस्कृतसाहित्यपरंपरेला असलेले योगदान थक्क करणारे आहे. पाणिनी – पतंजली – भरतमुनी कश्मीरचे रहिवासी असावेत या शक्यतांपासून निश्चितपणे तेथे होऊन गेलेले अभिनवगुप्त, क्षेमेंद्र, कल्हण, अशी किती तरी नावे घेता येतील. एखाद्या प्रदेशात एखाद्याचा जन्म होणे ही केवळ योगायोगाची घटना नसते. ती व्यक्ती उदयाला येत असताना त्यामध्ये त्याचा भवताल महत्त्वाची भूमिका बजावत असतो. इथे तर सातत्याने हजारो वर्षे अविच्छिन्न अशी ज्ञानपरंपरा दिसून येते. कश्मीरचे आणखी एक वैशिष्ट्य असे की या प्रदेशाचा चार हजार वर्षांचा इतिहास सांगणारा कल्हणाच्या‘राजतरंगिणी’सारखा ग्रंथ उपलब्ध आहे. अन्य ऐतिहासिक साधनांचे वैपुल्य आहे. तेव्हा पृथ्वीवरील या नंदनवनाचे, गंधर्वांच्या भोगभूमीचे, योग्यांच्या योगभूमीचे, कधी छोटे जनपद तर कधी दिग्विजयी सम्राटाची राजलक्ष्मी ठरलेल्या या भूमीचे जे रुप आपल्याला परिचित आहे- तिथले अस्थैर्य, दहशतवाद, धार्मिक-वाद या पलिकडचा कश्मीर समजून घ्यायला हवा. किंबहुना तो समजून घेतल्याशिवाय आजच्या वर्तमानाचीही संगती लागणार नाही.

सध्याचा काळ हा फ्यूचरिस्टिक – भविष्यवेधी मानला जातो. भविष्यकाळाचा वेध घेण्याची धडपड जोरात असताना, एका प्रदेशाच्या प्राचीन इतिहासात डोकावण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण इतिहासाच्या सोपानावर चढल्याशिवाय भविष्यात डोकावता येत नाही, हे चिरंतन सत्य आहे. कारण इतिहासामध्ये लोकांना एकत्र आणण्याची, लोकसमूहाला ओळख देण्याची, चेतना देण्याची अद्भूत शक्ती आहे. पण त्याचबरोबर हेही खरे आहे की इतिहासकथनाचे मर्म विसरून इतिहास सांगितला तर तो द्वेष पसरवण्याचे विषारी साधनही तो सहजच ठरू शकतो. यासाठी सुरूवातीलाच हे स्पष्ट केलेले चांगले की कश्मीरमधील संस्कृत परंपरेचा इतिहास हा मूलतः भारतीय इतिहासग्रंथातील महत्त्वाचा अध्याय आहे. यातील ‘भारतीय’ हा शब्द महत्त्वाचा आहे. ‘हिंदू’ गंगा नदीची पूजा करतात, म्हणून गंगा नदी ‘हिंदू’ होत नाही वा ‘मुसलमान’ राजाने बांधला म्हणून ताजमहाल ‘मुसलमान’ होत नाही. ते दोन्ही अपरिहार्यरीत्या ‘भारतीय’ असतात. तसेच कश्मीरही ‘भारतीय’ आहे. त्याची जडणघडण समजून घेण्यासाठी त्याचा केवळ नजिकच्या काळातील नव्हे तर प्राचीन इतिहास समजून घेणे देखील गरजेचे आहे.

काळानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल होत जातात. पण इतिहासाची पाळंमुळं समजून घेतली तर आपल्या भविष्यकालीन निर्णयात फरक पडू शकतो. एक व्यवहारातील उदाहरण घेऊया. समजा एक नातू आहे. जो एक उमदा तरूण मुलगा आहे, उच्चशिक्षित आहे, सध्या परदेशात स्थायिक आहे. त्याला त्याच्या वाडवडिलांच्या मालमत्तेची काहीतरी व्यवस्था लावयची आहे. त्याचा विचार हाच आहे की एकदा सुट्टीत येऊन ती विकून टाकावी. त्याप्रमाणे तो येतोही. तो आल्यानंतर काय होऊ शकते? कदाचित गावी गेल्यावर त्याला त्या जागेचे महत्त्व कळेल, तो आजुबाजूच्या लोकांकडून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या कथा ऐकेल. त्या ऐकून त्याची छाती अभिमानाने फुलून येईल. कदाचित पूर्वजांच्या काही चुकांचा पाढाही तो ऐकेल. त्याविषयीच्या शरमेने त्याची मान खालीही जाईल. यानंतर तो एकदम निर्णय बदलून परत आपल्या गावी रहायला येईल असा दावा मी करणार नाही. तो त्याचा ठरलेला व्यवहार बहुधा पूर्ण करेल. पण हे शक्य आहे की आता तो घरी गेल्यावर आपल्या मुलांना आपल्या पूर्वजांच्या गोष्टी सांगेल. कदाचित त्याच्या व्यवसायातील पुढील योजना आखताना त्याला त्याच्या पराक्रमी पूर्वजांची आठवण होईल. तो आता त्याचे काहीच शिल्लक नसलेल्या त्याच्या गावाच्या बातम्या हुडकून काढून आवडीने वाचेल. मुद्दा हा की प्रत्यक्षात काही स्थूल बदल झाला नसला तरी सूक्ष्म पातळीवर काही बदल नक्की होईल. नेमके हेच, कश्मीरचा हा प्राचीन इतिहास उलडताना होऊ शकते. कश्मीरकडे केवळ एक पर्यटनस्थळ, वादात-हिंसाचारात बुडालेला भारताचा भाग म्हणून बघत असताना त्याचे-आपले नाते समजून घेतले तर असाच दृष्टिबदल होईल, जो सूक्ष्म असला तरी भारत घडवण्यासाठी पोषक असेल.

गंमत बघा. इतिहास कसा सांगावा हे याच कश्मीरमधे जन्मलेल्या, कश्मीरचा इतिहास कथन करणार्या कल्हणाने किती नेमके सांगितले आहे –

श्लाघ्यः स एव गुणवान् रागद्वेषबहिष्कृता |
भूतार्थकथने यस्य स्थेयस्येव सरस्वती || (राजतरंगिणी 1.7)

“तोच खरा इतिहासकथन-कुशल, ज्याची वाणी सत्याच्या ठिकाणी स्थिर होऊन, प्रेम आणि द्वेष यांच्या बंधनातून मुक्त होऊन इतिहास सांगते.”

आपणही हीच भूमिका स्विकारून या विषयाकडे पाहूया. कल्हण आणि त्याचा ग्रंथराज राजतरंगिणी याविषयी या लेखमालेत आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. आज कश्मीर ह्या नावापासूनच सुरवात करूया.

हे नाव कश्मीर किंवा काश्मीर असे लिहिले जाते. सकृतदर्शनी ते संस्कृत वाटत नसले तरी ते प्राचीन नाव असून त्याचा नेमका अर्थ काय ह्या प्रश्नावर विद्वानांची अनेक मते आहेत. अनेकदा कश्मीर हे नाव काश्यपपुरावरून आले असावे असे सांगितले जाते. कश्मीरचा आणि कश्यपऋषींचा खूप जवळचा संबंध आहे. जसे कोकण हे परशुरामाने वसविले तसे कश्मीरचे खोरे कश्यप ऋषींनी वसविले अशी कथा नीलमतपुराणात येते. कश्मीरच्या इतिहासात नीलमतपुराणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजतरंगिणीचाही मुख्य आधार नीलमतपुराण आहे. ह्या नीलमतपुराणात कश्मीरची जन्मकथा सांगितली आहे ती थोडक्यात अशी की कश्मीरचे अगदी जुने नाव ‘सतीसार’ अर्थात सतीचे सरोवर असे होते. या सरोवरात जलोद्भव नावाचा राक्षस रहात होता. त्याच्या उपद्रवामुळे कोणालाही सरोवराच्या परिसरात राहता येणे शक्य नव्हते. सर्व नागांचा – नाग जमातीतील लोकांचा पिता असणार्या कश्यप ऋषींना तीर्थयात्रा करत असताना या राक्षसाच्या त्रासाविषयी माहिती झाली. त्यांनी यासाठी ब्रह्मदेवाला साकडे घातले. सर्व देवी-देवतांची मदत घेतली. मग भगवान विष्णूंनी ते सरोवर जलविहीन करून जलोद्भवाचा नाश केला. या नव्या भूभागावर कश्यप ऋषींनी नागांना वसविले. राजतरंगिणीमध्ये कश्मीरचा उल्लेख ‘काश्यपी’ (रा. 1.45) असा केलेला आहे.

कश्यप ऋषींच्या या कथेवरून अनेक गोष्टी लक्षात येतात. विद्वानांनी त्याला अनुसरून अनेक तर्कही केले आहेत. विशेष म्हणजे भूगर्भशास्त्रीय पुराव्यानुसारही कश्मीरचे खोरे हे पूर्वी, आत्ता आहे त्यापेक्षा, शेकडो फूट अधिक खोलीचे सरोवर असावे याला पुष्टी मिळते. त्यामुळे ह्या कथेविषयीचे कुतूहल वाढणे स्वाभाविक आहे. मग हे नाग लोक म्हणजे नेमके कोण? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आपण या चर्चेत जरी पडलो नाही तरी ही कथा कश्यप ऋषि आणि कश्मीरचे प्राचीन नाते सांगते व ती कश्मीरचा उल्लेख कश्मीर असाच करते व त्याचे त्याहून जुने सतीसार हे नावही सांगते, एवढे नक्कीच म्हणता येईल. त्याही पुढे जाऊन नीलमतपुराण कश्मीर या शब्दाची व्युत्पत्ती देते.

कः प्रजापतिरुद्दिष्टः कश्यपश्च प्रजापतिः |
तेनासौ निर्मितो देशः कश्मीराख्यो भविष्यति | |
कं वारि हरिणा यस्माद्देशादस्मादपाकृतम् |
कश्मीराख्यं ततो पश्य नाम लोके भविष्यति ||
(नीलमतपुराण 291 -92 )

कः म्हणजे प्रजापति ब्रह्मदेव आणि कश्यप मुनी हे त्याचेच रूप आहेत. त्यांनी निर्माण केलेला प्रदेश म्हणून कश्मीर. कं म्हणजे पाणी. विष्णूने ज्या प्रदेशातून पाणी नाहिसे केले तो प्रदेश म्हणजे कश्मीर.

तरीही व्युत्पत्तीदृष्ट्या कश्मीर शब्दाच्या निर्मितीचा विचार करता कश्यपपुराचे कश्मीर झाले असेल हे फार संभवनीय वाटत नाही. पण आनंदाची बाब म्हणजे एक व्युत्पत्ती खुद्द पाणिनीनेच सुचविली आहे. ह्या व्युत्पत्तीविषय़ी संस्कृतचे अभ्यासक नित्यानंद मिश्र यांनी आपल्या लेखात उत्तम विवेचन केले आहे. पाणिनीच्या ‘कशेर्मुटच् |’ (उणादिसूत्र 4.32) या सूत्राच्या आधारे कश्मीर हा शब्द समजून घेता येतो. कश् + म् + इर् अशी त्याची फोड करता येते. ह्या ठिकाणी अर्थ सांगताना कश्मीरचा अर्थ एक जानपद/ प्रदेश असाच सांगितला आहे पण फोड करताना जो धातू सांगण्यात आला त्या कश् धातूचा अर्थ – जाणे / राज्य करणे असा होतो. त्याच्या आधारे सर्वांना जाण्यासाठी हवेहवेसे वाटणारे ठिकाण असा करता येईल असा अर्थ मिश्रा यांनी सुचविला आहे. तो किती सार्थ आहे हे वेगळे सांगयला नको. मिश्रांनी अधोरेखित केल्याप्रमाणे ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की उणादीसूत्रे ही सर्वसामान्यपणे अशा शब्दांची व्युत्पत्ती करण्यासाठी उपयुक्त असतात ज्यांची फोड व्याकरणाचे नियम वापरून सहजी होत नाही. यावरून काश्मीर हेच जुने नाव असावे असे मानता येते.

महाभारतातही कश्मीरचा उल्लेख कश्मीर असाच येतो. राजतरंगिणी कश्मीरचा इतिहास सांगते तो महाभारतकालीन गोनंद राजापासून. अर्थात कल्हणाने हा इतिहास नीलमतपुराणातूनच घेतला आहे. गोनंद राजा पहिला हा जरासंधाचा व्याही होता. जरासंधासमवेत तो कृष्णावर चाल करुन गेला. या लढाईत तो मारला गेला. पुढे त्याचा मुलगा दामोदर यानेही यादवांवर स्वारी केली. तोही ठार झाला. त्यावेळी त्याची पत्नी यशोमती गरोदर होती. कृष्णाने यादवांना समजावले. कश्मीर ही साक्षात पार्वतीची भूमी आहे. (कश्मीर सतीचे सरोवर आहे.) तिथे जन्मणारा राजा शिवाचाच अंश होय. त्याने राणीला अभय दिले. तिला मुलगा होताच त्याला राज्याभिषेक करवला. हा राजा म्हणजे गोनंद दुसरा. तो लहान असल्यामुळे कश्मीरने महाभारतयुद्धात भाग घेतला नाही.

कश्मीरबाबत कृष्णाने दाखवलेला आदर आणि मुत्सद्देगिरी लक्षात घेण्यासारखी आहे. यादवांचे शत्रुत्व घेण्याइतपत ते प्रभावी राज्य होते हेही ध्यानात घेण्यासारखे आहे. कश्मीर महाभारतयुद्धात का सहभागी नव्हते? या प्रश्नाचे उत्तर देताना नीलमतपुराणाने ही कथा सांगितली आहे. यावरून भौगोलिकदृष्ट्या थोडे विलग असले तरी राजकीयदृष्ट्या महाभारतकाळापासून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सामावले होते हे ध्यानी येते. कश्मीरचे त्याला शोभून दिसणारे आणखी एक प्राचीन नाव आहे. हे नाव म्हणजे शारदापीठ. ते का त्याविषयी जाणून घेऊया पुढील लेखात.

सन्दर्भ :
1. कल्हणकृत राजतरंगिणी, भाषां. रघुनाथ सिंह, हिन्दी प्रचारक संस्थान , प्रथम आवृत्ति , सप्टेंबर 1969
2 . नीलमतपुराण, संपा. रामलाल कांजी लाल , पं. जग्गधर जाडू, मोतीलाल बनारसीदास,1924

3. (Mishra, Nityanand. “Etymology of Kashmir: Setting the record Straight” //swarajyamag.com/amp/story/culture April 02, 2017)

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry

Author : डॉ. समीरा गुजर -जोशी

समीरा ह्या संस्कृत साहित्याच्या अभ्यासक असून भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे.

13 Comments

  1. सायबरवैद्य

    फारच नेटके विवेचन!

    कश्मीरच्या ऐतिहासिकदृष्ट्या कळणा-या भारतीयत्वाबद्दलअधिक जाणून घ्यायला आवडेल.

    पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत…

    Reply
    • Vikas B Mehta

      Good Samira.

      Very informative and seen lot of effort taken to conclude the history.

      Keep it up and all the best to seek more information on your subject of interesr

      Reply
      • Samira Gujar - Joshi

        धन्यवाद

        Reply
  2. डॉ संतोष खेडलेकर

    वा समीराजी खूप वेगळी माहिती मिळाली या लेखातून. कश्मीरचा अपरिचित इतिहास पहिल्यांदा समजला. खूप छान

    Reply
    • Samira Gujar - Joshi

      धन्यवाद. पुढचे लेखही जरुर वाचा

      Reply
  3. Bhanudas Mehta

    Sameera, Excellent. Full informative. Proud of you. Please keep sending it. Congratulations 👍

    Reply
    • Samira Gujar-Joshi

      धन्यवाद

      Reply
  4. डॉ. व्ही टी मेहता

    खुपच छान !
    वाचताना काश्मीरचे चित्र समोर उभे राहिले.

    Reply
  5. SUKUMAR ANANDRAM GUJAR

    खूपच छान.

    Reply
  6. अनिल खैराटकर

    समिरा…
    तुझी प्रगल्भता तर मला परिचित आहेच पण एखादी गोष्ट अथवा विषयावर प्रभुत्व व त्याचे सखोल आकलन कसे करावे हे खरेच अवघड शास्त्र आहे..
    तुला अनेक अनेक शुभेच्छा…👍👍👍

    Reply
    • Samira Gujar-Joshi

      धन्यवाद

      Reply
    • Samira Gujar- Joshi

      धन्यवाद

      Reply

Trackbacks/Pingbacks

  1. कश्मीरे संस्कृतम् - २ - Mimamsa - […] लेखमालेतील पहिला लेख इथे […]

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *