Darśana | दर्शन

Darśana literally means ‘an instrument of realization.’ This pillar deliberates upon Philosophical, Theological and Spiritual thoughts which were imparted, flourished and practiced in India from time to time.

हिंदू धर्म आणि योगिनी

by | Jul 14, 2020 | 1 comment

नरसोबाची वाडी हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र कृष्णा तीरावर आहे. तेथे दत्तात्रेयांच्या ‘मनोहर पादुका’ आहेत. तर गाणगापुरी ‘निर्गुण पादुका’ आहेत. वाडीला नरसिंह सरस्वती गुरु महाराजांचा १२ वर्षे वास होता. एक तप पूर्ण झाल्यानंतर ते गाणगापुरी जाण्यास सिद्ध झाले. तेव्हा योगिनी आल्या आणि त्यांनी गुरु महाराजांना प्रार्थना केली तेव्हा योगिनींकडून पूजा-अर्चा होण्यासाठी गुरु महाराजांनी आपल्या ‘मनोहर पादुका’ कृष्णा तीरावर स्थापित केल्या. हा सर्वच प्रसंग श्रीगुरुचरित्राच्या १९ व्या अध्यायात आला आहे.

ह्या प्रसंगाचे दुहेरी महत्त्व आहे.

१) पादुका स्थापन केल्या त्या ‘मनोहर पादुका’ या नावाने केल्या.

२) पादुका स्थापन केल्या त्या योगिनींकडून पूजा घेण्यासाठी.

येथे ‘पादुका’ आणि ‘योगिनी’ यांच्या रूपाने भारतीय धर्मोपासना इतिहासातील एक महत्त्वाचा पैलू दिसून येतो. प्रथम यांच्यासाठी पादुका स्थापन झालेल्या त्या योगिनी या संकल्पनेविषयी जाणून घेऊ

योगिनींचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये अतिशय आहे. योगिनींची मंदिरे आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळतात. जबलपुरजवळ नर्मदातीरावर त्रिपुरी येथे योगिनींचे मंदिर आहे. जेथे श्रीगुरुंनी बारा वर्षे तप केले त्या कृष्णा तीरावरही योगिनींचे स्थान होते व आजही आहे. याशिवाय अन्यत्र योगिनींची स्थाने आहेत किंवा मंदिरे आहेत. योगिनींची पूजा-अर्चा देवी उपासनेचीच पूजा असल्यामुळे सर्व देवी उपासक योगिनींची पूजा करतात. मग हे उपासक देवी पूजा परंपरेतील कोणत्याही शाखेचे व उप-शाखेचे (उप-परंपरेचे) असोत. त्रिपुरा विद्येतही ‘योगिनी पूजन’ असते. माहूर क्षेत्री दत्तात्रेयांनी परशुरामाला देवी पूजेची आणि उपासनेची दीक्षा दिली. तो सर्व इतिहास ‘दत्तात्रय भार्गव संवाद’ या नावाने प्रसिद्ध आहे. दत्तात्रेय हे देवीचे, माता भवानीचे उपासक आहेत व योगिनी या देवीच्या सख्या आहेत. सखी, दुती, योगिनी, दशमहाविद्या यांपैकी योगिनी व भैरव हे शिवशक्ती परंपरेत येतात. योगिनींची संख्या एकूण ६४ आहे. तर भैरवसुद्धा ६४ आहेत. शिवाचे ६४ भैरव व शक्तीचे ६४ भैरव. विशेष म्हणजे भैरव हे सक्रिय असतात. functional असे त्यांचे वर्णन करता येईल. तसेच भैरव हे ‘क्षेत्रपाल’ असतात. प्रत्येक शिवस्थानी आणि शक्तीस्थानी भैरव असतो. किंबहुना भैरवावरूनच त्या स्थानाचा शिवस्थान किंवा शक्तीस्थान असा बोध होत असतो.

योगिनी ६४ आहेत व त्यांचे ८/८ चे गट असतात. ८/१६/६४ अशा गटाने योगिनी असतात. मराठवाड्यातील अंबाजोगाई हे स्थान योगिनींचे आहे. अंबाजोगाई नावातील जोगाई हे योगिनीचे अपभ्रष्ट रूप आहे. वऱ्हाडात नेरपिंगळाई हे स्थानही योगिनींचे आहे. तिचे नाव पिंगला होय. अशाप्रकारे नावासह योगिनींची स्थाने आढळतात. जबलपुर नर्मदा तीरावरील स्थान प्रत्येक योगिनींच्या नावासह आहे.

योगिनी या तेजरुप असतात किंवा ज्योतिर्मय असतात. त्या जगदंबेच्या मस्तकावर असतात. ६४ ज्योती योगिनींनी जगदंबा शोभायमान झालेली आहे. या ज्योती विशिष्ट आकाराने विराजमान आहेत. त्या जशजशा वरवर स्थिरावतात तशी ज्योतीची एक एक आकृती निर्माण होते. एक एक योगिनी म्हणजे एक एक ज्योत (बिंदु)! बिंदूतून ही आकृती आविष्कृत होते. आकृती किंवा बिंदूआकृती यांमधून देवालयाची शिखर आकृती उदयाला आली. हिंदू मंदिरावरील शिखर हे बिंदूरूप ज्योतीर्मय योगिनींच्या स्थानावर आविष्कृत झालेले आहे. तसेच हिंदू स्त्री गजर्‍याने किंवा फुलाने आपले केशभूषा करीत असते. ही पद्धत शक्तीयोगिनी सजावटीतून आल्याचे पाहायला मिळते. कारण हिंदू स्त्रीला आपल्या परंपरेमध्ये योगिनीचेच रूप म्हटले जाते.

Author :डॉ. म. रा जोशी

डॉ. म. रा जोशी हे जेष्ठ साहित्य संशोधक आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. डॉ. जोशी यांना संत साहित्य आणि मानवतावादी कार्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे “ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार” याने सन्मानित केले आहे. 

1 Comment

  1. Anjali Ranade

    हिंदू धर्म आणि योगिनी लेख वाचला 😀

    योगिनीं बद्दल सविस्तर माहिती वाचायला मिळाली 🙏 ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *