लहानवयात शाळेत शिकत असताना (बहुधा पाचव्या इयत्तेत) आम्हाला अंक लिहिण्याच्या प्रमुख दोन पद्धती आणि त्यांची नावे शिकवली होती. त्यातील एक होती रोमन (I, II, III वगैरे) तर दुसरी होती अरेबिक (1, 2, 3 वगैरे). भारतीय, हिंदू किंवा वैदिक वगैरे (धर्मांधतेला खतपाणी घालणारे) शब्द आमच्या कानांवर पडणार नाहीत ह्याची मोठ्या कटाक्षाने काळजी घेतली गेली होती. मात्र कितीही काळजी घेतली तरी, “शून्याचा शोध भारतीयांनी लावला” हे एक वाक्य, कसं कोण जाणे पण, आमच्या अभ्यासक्रमात कुठेतरी घुसडले गेले होते. अर्थात ह्या (वरकरणी) क्षुल्लक वाटणाऱ्या वाक्यात आम्हा विद्यार्थ्यांचा ऊर भरून यावा असं काहीच नव्हतं. जेमतेम एक शोध तो काय आणि तोही कसला तर शून्याचा! शोधच लावायचा होता तर जरा मातब्बर आकड्याचा तरी लावायचा! कोटी म्हणा, लाख म्हणा, गेला बाजार शंभर तरी! “एका शून्याचं इतकं काय कौतुक?” अशी आमची तत्कालीन मन:स्थिती होती.
वस्तुत: ज्याला अरेबिक पद्धत म्हणतात ती तर पूर्णत: आमची आहे. आमच्याशी व्यापार करताना कधीतरी अरबांना ती समजली आणि मग त्यांच्याकडून ती युरोपात पोहोचली असं आज सांगितलं जातं. हा खरा इतिहास असेल तर युरोपीय लोकांनी तिला मुळात अरेबिक समजावे ह्यात त्यांचं फार चुकत होतं असं नाही; पण आपण का तिला अरेबिक म्हणावं हे मात्र उमजत नाही. आणि ही आमची पद्धत बोजड रोमन पद्धतीपेक्षा कैक पटींनी सरस आहे, हवा तितका मोठा आकडा सहजपणे व्यक्तविण्यास समर्थ आहे आणि आकडेमोडीत सुलभता आणणारीही आहे. बरं ज्या शून्याचं सर्वसामान्यांना कौतुक वाटू शकत नाही त्या शून्य ह्या चिन्हामुळे गणितात किती प्रचंड सोय झालीय हे तर शब्दात व्यक्तवणं अवघड आहे.
शून्याचा शोध अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. मुळात शून्य ह्याचा अर्थच अभाव, अनस्तित्व! डोळ्यांसमोर असलेली अथवा स्पर्शाने जाणलेली, श्रवणेंद्रियांना ऐकू आलेली, किंवा निदान मनश्चक्षूंसमोर साकारलेली वस्तू काही प्रमाणात तरी ज्ञेय असते कारण तिथे काही किमान भाव असतो, काही किमान अस्तित्व असते. मग त्या अस्तित्वावर काही विचार शक्य असतो. आधी प्रेक्षण, नंतर परीक्षण मग त्यातून मापन, गणन, विश्लेषण ह्यातील काही क्रिया तिथे शक्य असतात. पण जिथे अस्तित्वाचाच अभाव आहे तिथे काय आणि कसला विचार करणार? मग शून्य ही संज्ञा आणि तिचं चिन्ह अस्तित्वात आलंच कसं?
ह्या प्रश्नावर ऊहापोह करताना थोडं अध्यात्माच्या क्षेत्रात डोकावून पाहिलं तर काहीसा उलगडा होऊ शकतो. आम्हा भारतीयांनी अध्यात्माच्या क्षेत्रात फार मोठी प्रगती केलेली आहे आणि तेही गेल्या कित्येक शतकांपासून हे तर खरंच! अध्यात्माचा देव देव करण्याशी, निरनिराळ्या उपासतापासांशी, विविध कर्मकांडांशी खरंतर संबंध नाही. स्वत:ला आणि त्यायोगे आपल्यात वास करत असलेल्या त्या सच्चिच्छक्तीला (सत्-चित्-शक्तीला) जाणणं म्हणजेच अध्यात्म! गणितावरच्या लेखमालेत अध्यात्म कसं घुसलं असा प्रश्न अनेकांना पडेल पण घरातलं देवघर जसं एका कोपऱ्यात ठेवलेलं (किंबहुना, बरेचदा पडलेलं) असतं तसा अध्यात्म हा काही कोपऱ्यात पडू देण्याचा विषयच नाही! उलट जीवनाच्या बहुतेक सर्व अंगोपांगांना स्पर्श करणारा हा विषय आहे. मुद्दा असा की ह्या अध्यात्माच्या अभ्यासात त्या निर्गुण, निराकार, निर्लेप आत्म्याचा आणि परमात्म्याचाही ध्यास आमच्या पूर्वजांनी घेतला आणि ह्या ध्यासातूनच कुठेतरी शून्याचा, शून्यावकाशाचा व शून्यावस्थेचा अनुभव त्यांना मिळला. ह्या अध्यात्माच्या क्षेत्रातही आमच्या बुद्धिमत्तेचा आगळावेगळा आविष्कार कसा पाहावयास मिळतो ते पाहा. एकीकडे त्या निर्गुणात्मक परमात्म्याचा ध्यास घेत असताना त्यालाच सगुण, साकार रूपेही आम्ही बहाल करू शकलो. त्याची चित्रं काढली, शिल्पं घडवली, मूर्ती साकारल्या. निर्गुणाला सगुण बनवणे हे आमचे वैशिष्ट्य आहे. आणि तसंच काहीसं शून्याचं झालं, नाही का? मुळातल्या अनस्तित्वालाही एक प्रकारे अस्तित्व देणं आणि वर त्यासाठी एक चिन्ह मुक्रर करणं हे सारं आमच्या अपार बुद्धीचंच द्योतक आहे. हे सारं वाचताना वाचकाला कदाचित, “परगुणपरमाणून् पर्वतीकृत्य…” ह्या भर्तृहरीच्या ओळी आठवू शकतात आणि एका क्षुल्लक गोष्टीला विनाकारण फार महत्त्व दिलं जातंय असं त्याला निश्चितच वाटू शकेल; पण त्याचं कारण इतकंच की हे सर्व गणित, ही सारी चिन्हं, हे सगळे नेमनियम आम्हाला विनाश्रम, अगदी फुकटात मिळाले आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्याचं कौतुक असं काही राहिलंच नाही. असो!
महान गणिती आर्यभट (ज्याला काहीजण ‘आर्यभट्ट’ नावाने ओळखतात) ह्याने शून्याचा शोध लावला असा एक समज समाजात आहे. समाजमाध्यमांवरून तशा अर्थाचे अनेक संदेशही अलिकडे फिरताना दिसताहेत. त्यात जे विनोदरूपी आहेत ते ‘निव्वळ विनोद’ म्हणून एकवेळ दुर्लक्षिता येतात; पण जे मोठ्या गांभीर्याने ह्या गोष्टींचं प्रतिपादन करतात त्यांचा समाचार घेतला पाहिजे, कारण आर्यभटाच्या आधीपासूनच आम्हाला शून्य ही संख्या ज्ञात होती. फारतर त्याचं जे विद्यमान चिन्ह आहे (०) ते आर्यभटाने वापरात आणलं असेल किंवा लोकप्रिय केलं असेल. सांगायचा मुद्दा हा की आर्यभटाच्याही आधीपासूनच आम्हाला शून्यही ज्ञात होता, तसेच दशमान पद्धतही अवगत होती.
दशमान पद्धतीबद्दल तर जितकं लिहावं तितकं कमीच आहे. समजा तशी पद्धत नसती तर काय झालं असतं? थोडं चित्र रंगवायला हरकत नाही. ०, १, २… करता करता ९ पर्यंत आल्यावर पुढील संख्यांच्या लेखनासाठी आपण काय केलं असतं? कदाचित दहा, अकरा,… अशा प्रत्येक संख्येसाठी एकेक चिन्ह करावं लागलं असतं आणि मग अशी कोट्यवधी चिन्हे लक्षात ठेवावी लागली असती. उघडच आहे की मग आमची गणितातली प्रगती ही फारफार तर बेरीज-वजाबाकीपर्यंतच होऊ शकली असती. किंवा मग रोमन पद्धतीनुसार आमचे गणित झाले असते आणि मग मोठमोठ्या संख्या लिहिताना येणाऱ्या अडचणी आणि आकडेमोड करताना होणारे अमाप कष्ट आम्हाला सोसावे लागले असते. त्या ऐवजी अवघी दहा चिन्हे आणि मग त्यांच्यातूनच “निवड आणि मांडणी” पद्धतीने (पर्म्यूटेशन आणि कॉम्बिनेशन) कोट्यवधी, अब्जावधी संख्या लिहून दाखवायच्या हे खरोखर अचाट बुद्धीचं काम आहे. सर्वसामान्यत: कोणत्याही माणसास दोन हातांची मिळून दहा बोटं असतात आणि हीच दहा बोटं “निवड-मांडणी” पद्धतीने वापरून आपण सहस्रावधी कामं उरकत असतो. काठी धरताना बोटांची मूठ आवळली जाते, मोठा दगड उचलताना ती फाकली जातात, तर प्रसाद घेताना तीच एकमेकांना चिकटतात. लिखाण करताना प्रामुख्याने आपण अंगठा-तर्जनी-मध्यमा ह्यांच्यात लेखणी पकडून आणि उरलेली दोन बोटे मुडपून लिहितो, तर एखाद्या दिशेचा किंवा कसल्याही वस्तूचा वा व्यक्तीचा निर्देश करताना सहसा फक्त तर्जनी कामाला लागते आणि उरलेली चार बोटे एकमेकांना मिठी मारून बसतात. एखाद्या कामात बोटांची ठरावीक निवड करायची आणि मग ती निवडलेली बोटेही त्या त्या कामानुसार विशिष्ट पद्धतीनेच (विशिष्ट आकृतिबंधात) वापरायची ही काही आपली आजची सवय नाही. वर्षानुवर्षं आम्ही तसेच वागत आलो आहोत. पुरातन काळी एखाद्या मोठ्या शिळेवर काहीबाही खरवडताना, वस्तीच्या जवळ आलेले एखादे हिंस्र जनावर दाखवताना, झाडांची पाने-फुले-फळे उपटून काढताना आणि खाताना हीच दहा बोटे आमच्या पूर्वजांच्या कामी येत होती. आणि आमच्याच कशाला, त्या इजिप्शियन, बॅबिलॉनियन, ग्रीक, रोमन, माया… सगळ्या संस्कृतीत वेगळं ते काय घडत असणार?
मात्र ह्याच नित्याच्या बोटांपासून संख्याबोध आणि मग केवळ दहाच बोटं असल्यामुळे दहाच मूळ चिन्हांची योजना आणि अखेर केवळ त्यांच्यातूनच निवड आणि मांडणी पद्धतीने कोट्यवधी संख्यांचा निर्देश ही गरुडभरारी सर्वप्रथम आम्हीच घेतली होती. दहा बोटांचा आणि दशमान पद्धतीचा हा संबंध आजच्या काळात अगदी निर्विवादपणे सिद्ध करणं अवघड आहे. पण बोट ह्या शब्दासाठी असलेला अङ्गुलि हा संस्कृत शब्द दहा किंवा वीस ह्या अर्थानेही वापरलेला दिसतो, इतकंच काय, डिजिट ह्या इंग्लिश शब्दाचाही एक अर्थ बोट असा होतो. किंबहुना, रोमन पद्धतीतील I, II, III ही चिन्हेही हाताचं एकेक बोट उचलल्यानंतर दिसणाऱ्या आकृतीतूनच निर्माण झाली नाहीत काय? गणना करताना अगदी साहजिकपणेच बोटांचा वापर होत होता; त्यातूनच ही सगळी संरचना जन्माला आली. मात्र वर म्हटल्याप्रमाणे ती संरचना पूर्णत्वाला नेण्याचं श्रेय वादातीत आमचं आहे. समजा आम्हाला ते जमलं नसतं तर? “इतरांना कधीच जमलं नसतं” असं मानणं म्हणजे आत्मप्रौढी ठरेल! तरीही, आमच्या दशमान पद्धतीला युरोपात मुळात झालेला विरोध विचारात घेता, अशी एखादी संरचना इतरत्र कुठेतरी जन्मायला अजून शेकडो वर्षं गेली असती हे नक्की… आणि आज आपण शास्त्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या ज्या उत्तुंग तटावर मोठ्या दिमाखात उभे आहोत त्याच्या पुष्कळ खाली, दरीत कुठेतरी चाचपडत बसलो असतो हे नक्की!!!
Author : सलिल सावरकर
सलिल सावरकर हे श्रीमती सी.एच.एम. महाविद्यालयाच्या गणित विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गणितासह संगीत, संस्कृत, खगोलशास्त्र अश्या अनेक विषयांमध्ये त्यांना गती आहे .
नमस्कार , अप्रतिम लेख… अध्यात्मिकांना सुध्दा दिशादर्शक विचार… प्लीज गो ऑन…👌👌👋
मन:पूर्वक धन्यवाद