Itihāsa | इतिहास

Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.

भारतीय नृत्यपरंपरेचा इतिहास – भाग ५ : ओडिसी नृत्यशैली

by | May 3, 2022 | 4 comments

भारताची संस्कृती असणाऱ्या सप्तशास्त्रीय नृत्यप्रकारांपैकी पुढील नृत्यशैली म्हणजे ओडिसी. ही नृत्यशैली भारताच्या आग्नेय प्रातांत ओरिसा ह्या प्रदेशामध्ये उदयास आली. नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात ‘ओड्रमागधी’ ह्या संकल्पनेचा उल्लेख भरतमुनींनी केलेला आहे. ओड्रमागधी ही संज्ञा त्यांनी ओरिसा राज्यातील भुवनेश्वरजवळ उदयगिरी शिल्पांमध्ये ज्या नृत्यांगनांच्या मूर्ती आढळल्या त्यांना दिलेली आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. ह्या शिल्पांमध्ये निदर्शनास आलेल्या मूर्ती ह्या ओडिसी नृत्याशी साधर्म्य दर्शविणाऱ्या आहेत. ह्या नृत्यशैलीचा काळ साधारण इसवी सनाचे २ रे शतक मानला आहे.

ओरिसा प्रांतात इसवी सनाचे २ रे ते ५ वे शतक हया कालावधीत बौद्ध, जैन, शैवपंथीय असे राज्यकर्ते होऊन गेले. परंतु, इसवी सनाच्या ४ थ्या शतकापासून म्हणजे गुप्त काळापासून ओरिसामध्ये शैवपंथाने मूळ धरले. ४ थ्या शतकापासून ते जवळ जवळ ७ व्या शतकापर्यंत शैव पंथ अस्तित्त्वात होता. ह्या काळात धार्मिक कृत्यातील एक अविभाज्य भाग म्हणून ओरिसात नृत्यकलेला महत्त्व होते. याकारणास्तव ओरिसा प्रांतात जी मंदिरे बांधली गेली त्यावरील शिल्पे ही हया परंपरेची साक्ष आहेत. ह्या मंदिरांमध्ये मुक्तेश्वर मंदिर, परशुराम मंदिर, लिंगराज मंदिर आणि कोणार्कचे सूर्यमंदिर ह्या मंदिरांचा समावेश आहे. परंतु, उत्तर-मध्ययुगात ओरिसात वैष्णव पंथ लोकप्रिय होऊ लागला. ह्या काळातील कलावंतांना शरीरशास्त्राची पूर्ण जाण असल्याचे कळते. कारण ह्या काळातील शिल्पांमध्ये केवळ आकृतिबंध नाहीत तर नृत्यातील चलतत्त्वाची देखील प्रचिती येते. तसेच, ह्या काळातील मंदिरांमध्ये नटमंडप हा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग दिसून येतो. नटमंडप म्हणजे मंदिरातील गाभाऱ्यासमोरील जागा. ह्या जागेमध्ये पूजेचा एक भाग म्हणून गायन, वादन, आणि नृत्याचे सादरीकरण होत असे. ह्या मंडपाच्या भिंती आतून आणि बाहेरून युवक-युवती, वादक, नायक-नायिका हयांची शिल्पे आहेत.

ओडिसी नृत्यप्रकाराची परंपरा महारी ह्यांच्याकडून पुढे रूढ झाली. महारी म्हणजे ज्याप्रमाणे दक्षिणेकडील नृत्यप्रकार हे देवाला अर्पण केलेल्या देवदासींकडून रूढ झालेले आहेत, तसेच ओरिसामध्ये देखील नृत्य सादर करणाऱ्या सेवकांना महारी म्हटले जाते. ह्यांचे नृत्य पुढे ओडिसी म्हणून प्रसिद्ध झाले असे मानले जाते.

ओडीसी नृत्यशैलीची ग्रंथसंपदा

ओडिसी नृत्यशैलीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथसंपदा दिसून येते. ह्या नृत्याचे तंत्र वर्णन करणारे अनेक सचित्र ग्रंथ ओरिसा प्रांतामध्ये निर्माण झाले. हयामध्ये प्रामुख्याने गीतगोविंदम् ह्या ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल. नृत्य-गायन-नाट्य ह्या कलांच्या सादरीकरणासाठी हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. कवी जयदेव ह्यांनी ह्या ग्रंथाची निर्मिती केली. राधा-कृष्ण ह्यांच्या रासलीला हा या ग्रंथाचा प्रमुख विषय आहे. ह्यांनंतर नृत्यशास्त्राची चर्चा करणारा अभिनयचंद्रिका नावाचा ग्रंथ ह्या प्रांतात निर्माण झाला. महेश्वर मोहापात्रा ह्यांनी हा ग्रंथ लिहिला. ह्यामध्ये नृत्याचे तंत्र, सौंदर्यशास्त्र, नृत्य सादरीकरणाचा क्रम ह्यांविषयी वर्णन केले आहे. अभिनयचंद्रिकेच्या बरोबरीने शिल्पप्रकाश नावाचा ग्रंथाचा देखील उल्लेख विद्वांनांकडून केला जातो. रामचंद्र कौलाचार ह्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, आणि ह्याचे भाषांतर पाश्चात्य अभ्यासक Alice Boner ह्यांनी केले आहे. ह्या ग्रंथामध्ये मानवाकृती ज्या हालचालींचे वर्णन केलेले आहे त्या नृत्य सदृशच आहेत. काही जैन पोथ्यांमधील चित्रदेखील ओडिसी नृत्यशैलीशी साम्य दर्शविणारी आहेत. उदा. कालिकाचार्य आणि कल्पसूत्र. अशाप्रकारे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ ओरिसा प्रांतात निर्माण झाले आहेत.

ओडिसी नृत्याचे तंत्र

ओडिसी नृत्याचे तंत्र वर्णन करताना एक विशिष्ट संकल्पना सांगितली जाते ती म्हणजे ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र म्हणजे संपूर्ण शरीराचे दोन समान भाग केल्यावर मधला जो भाग ज्याला अक्ष अशीही संज्ञा आहे, त्यालाच ब्रह्मसूत्र असे म्हटले जाते. ह्या ब्रह्मसूत्रापासून एखादा अवयव किती बाहेर जातो, वळतो, वाकतो ह्यानुसार संपूर्ण शरीराचा तोल सांभाळणे हे ह्या कलाप्रकाराचे वैशिष्ट्य आहे. ह्याबरोबरच ‘त्रिभंग’ ही स्थिती देखील ओडिसीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्रिभंग म्हणजे शरीराचा तोल सांभाळत तीन भंग केले जातात. तसेच, ह्यामधील भ्रमरी म्हणजे गिरक्यादेखील ह्या नृत्याचा वेगळा आविष्कार आहे. उदा. एक पाय उचलून गिरकी घेऊन पुन्हा तसेच उलट फिरुन त्याच स्थितीत येणे. ही गिरकी कधी कधी अर्ध-वर्तुळाकृती, पूर्ण वर्तुळाकृती अशी असतात. ह्या गिरक्यांना घेरा असे म्हटले जाते. याशिवाय पूर्ण खाली बसून एक गुडघा उचलून उभा धरणे किंवा पालथा दुमडून मागे नेणे ह्या स्थितीला ‘बैठा’ अशी संज्ञा आहे.

या स्थितींव्यतिरिक्त ‘अलसाकन्या’ ही वेगळी संकल्पना ओडिसीमध्ये दिसून येते. अलसाकन्या म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थितीत स्थिरावणे. ह्या जवळ जवळ १६ प्रकारच्या आहेत. ह्या अलसाकन्यांचे उदाहरण म्हणजे नर्तकी नृत्यामध्ये असंख्य हालचालींनंतर एका विशिष्ट आकृतिबंधात स्थिरावते.  हा विशिष्ट आकृतिबंध म्हणजे आरशात पाहणारी नर्तकी, फुले माळणारी वगैरे. हस्तमुद्रांचा वापर ह्या नृत्यप्रकारामध्ये नृत्त आणि नृत्य दोन्हीत केला जातो. तसेच, नृत्ताच्या हालचाली करताना जे बोल वापरले जातात त्या बोलांना ‘उक्कुट्ट असे म्हणतात.

ओडिसी नृत्य सादर करताना त्याचा एक विशिष्ट रचनाक्रम आहे. ओडिसी नृत्याची सुरुवात भूमीप्रणामाने होते. ह्यानंतर विघ्नराज गणपतीची पूजा म्हणजे गणेशवंदना सादर केली जाते. जगन्नाथपूजेने प्राथमिक पूजाविधी संपतो. यानंतर बट नृत्यामध्ये भ्रमरी, चारी, उत्प्लवन ह्यांनी युक्त तालबद्ध असे शुद्ध नृत्त सादर होते. ह्यानंतर इष्ट देवतेला वंदन केले जाते. ह्यामध्ये प्राथमिक अभिनयाला सुरुवात होते. ह्यानंतर ‘जतिस्वरम्’ सारखी स्वरपल्लवी सादर केली जाते. हयामध्ये विशिष्ट रागामध्ये आणि तालामध्ये बसवलेली स्वररचना घेऊन शुद्ध नृत्त त्यावर बसवलेले असतात. ह्यानंतर केवळ अभिनयप्रधान गीताभिनय ही रचना सादर होते. तसेच ओडिसी ह्या नृत्याच्या सादरीकरणामध्ये विशेषत्त्वाने अष्टपदींचे सादरीकरण केले जाते. ओडिसी सादरीकरणाच्या शेवटी तर्जन किंवा मोक्षनृत्य सादर केले जाते.

ओडिसी नृत्याची वेशभूषा

भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेमध्ये देहाला पावित्र्याचे स्थान आहे. जणू काही मंदिरच ह्या देहाला मानले जाते. ह्या संकल्पनेला अगदी अनुसरून ओडिसीनृत्याची वेशभूषा असते. ह्या नृत्यामध्ये नर्तकी एक पायावर उतरत्या निऱ्या असलेली साडी परिधान करते. ह्यातील दागिने हे विशेष पद्धतीने परिधान केलेले असतात. ह्या नृत्यातील वेशभूषेत खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे मस्तकावर कळसाची छोटी प्रतिकृती असते. बिंदी, कमरपट्टा, बाजुबंद इत्यादी अलंकार चांदीचे असतात. केसांचा अंबाडा बांधून त्यावर चूडामणी लावतात. त्याभोवती पांढरे गजरे लावले जातात. अशी जणू काही एखाद्या शिल्पासारखी ओडिसी नृत्याची वेशभूषा असते.

 

ओडिसी नृत्याचे प्रसिद्ध कलाकार 

ओडिसी नृत्याच्या कलाकारांमध्ये पंकज चरण दास, केलुचरण मोहापात्रा, देबप्रसाद दास इत्यादी कलाकारांची प्रामुख्याने नावे घेतली जातात. तसेच आजच्या काळात योगिनी गांधी वगैरे सारखे कलाकार ओडिसी नृत्यपरंपरा प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

आज देखील अनेक नवीन युवक-युवती ओडिसी नृत्याचे शिक्षण घेताना दिसतात. ह्या नृत्यशैलीचे सादरीकरण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

ह्या लेखमालेतील चौथा लेख  इथे वाचा.

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry.

Author : डॉ. अक्षता चंद्रकांत जेस्ते

अक्षता ह्या १८ वर्षांपासून भरतनाट्यम् शिकत आणि शिकवीत आहेत. तसेच डेक्कन महाविद्यालय येथे संस्कृत साहित्यातील छंद आणि ताल याविषयावर त्यांचा पी. एच. डी. प्रबंध पूर्ण झाला आहे.

4 Comments

  1. Sau.Vaidehi Vinay Bhalerao, Ravet,Pune

    Apratim, abhyas khupach chan, Bharatiya sanskruti v kalebaddal jivhala lekhanat disun yeto,. pudhil vatchalisathi khup shubhechhya.

    Reply
    • Dr. Akshata Jeste-Bhalerao

      धन्यवाद 🙏😊

      Reply
  2. सुधीर विनायकराव दीक्षित

    खूपच सुंदर.. माहितीपुर्ण… सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा….
    दीक्षित परिवार…💐💐💐💐👌👌

    Reply
    • Dr. Akshata Jeste-Bhalerao

      धन्यवाद सर 🙏😊

      Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *