धर्मासाठी मरावे, मरुनी अवघ्यांसी मारावे ।
मारिता मारिता घ्यावे , राज्य आपुले।
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा अजरामर ग्रंथ लिहीताना त्याच्या पहिल्या भागातल्या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात समर्थ रामदासांच्या या ओवींनी केली होती. त्या पहिल्या प्रकरणाचे नाव ‘स्वधर्म नी स्वराज्य’ असे होते. या प्रकरणात सावरकर म्हणतात की एखादे लहानसे घर बांधावयाचे असले तरी त्या घराचा तोल सांभाळला जाईल इतका भक्कम पाया घालण्यात येतो. हे एखाद्या अशिक्षित मनुष्यासही समजत असते. परंतु जेव्हा एखादा लेखक प्रचंड क्रांतीरचनेचा इतिहास देताना त्या क्रांतीची ती भव्य व विशाल इमारत तोलण्यास मूलभूत असणारा पाया कोणता होता याची मीमांसा करीत नाही, किंवा ते प्रचंड क्रांतीमंदिर एखाद्या गवताच्या काडीवर उभारले होते असे बरळत सुटतो, तेव्हा तो वेडगळ तरी असतो किंवा भामटा तरी असतो. मोठमोठ्या धर्मक्रांत्या किंवा राज्यक्रांत्यांच्या मुळाशी असणाऱ्या तत्त्वाकडे दुर्लक्ष करतात आणि केवळ त्याच्या भव्यतेचेच वर्णन करीत सुटतात. प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी कोणते तरी तत्त्व असलेच पाहिजे. असे प्रख्यात तत्त्ववेत्ता व देशभक्त मॅझिनी यानेसुद्धा म्हटले होते. सावरकरांना या विचारातून असे मांडायचे होते की 1857 च्या क्रांतीमागेसुद्धा काही मूलभूत तत्त्वे होती. काडतुसे किंवा अन्य कारणे ही केवळ निमित्त होती. ही तत्त्वे कोणती हे सांगताना सावरकर म्हणतात, ‘निस्तेज झालेल्या मुकुटांना सतेजता देणारी व मोडून पडलेल्या ध्वजाचे पुनरुद्धरण करणारी 1857 च्या क्रांतीमागील ही तत्त्वे कोणती होती? ज्याच्यावर हजारो व्यक्तींनी आपल्या उष्ण रक्ताचा अभिषेक वर्षानुवर्षे अखंड प्रेमाने सुरु ठेवावा ही ती तत्वे कोणती होती? तर ती दिव्य तत्त्वे म्हणजे स्वधर्म आणि स्वराज्य ही होत. आपल्या प्राणप्रिय धर्माला व आपल्या प्राणप्रिय देशाला बंधमुक्त करण्यासाठी जे क्रांतीयुद्ध होते, त्या क्रांतीयुद्धाहून पवित्र असे दुसरे जगात काय आढळणार आहे. ही तत्त्वरत्ने पाहून ज्याला या क्रांतीयुद्धाची ओजस्विता भासणार नाही तो एकतर मंद किंवा भामटा असला पाहिजे. ईश्वरदत्त हक्कांसाठी लढणे हे मनुष्यमात्रांचे कर्तव्य होय.’
सावरकरांनी १८५७ च्या युद्धामागची कारणमीमांसा करताना स्वधर्म आणि स्वराज्य या तत्त्वांना दिलेले महत्त्व म्हणजे एका मूलगामी चिंतनाचे परिणाम ठरतात. सावरकरांचा आध्यात्मिक पैलू विचारात घेत असताना त्यांची राष्ट्रभक्ती ही याच आध्यात्मिकतेची फलश्रुती होती हे नाकारून चालणार नाही. त्यांच्या लिखाणामध्ये, काव्यामध्ये शक्तीची किंवा शिवाची उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. ठिकठिकाणी पेरलेली ही वचने किंवा उत्प्रेक्षा अलंकारांनी सजलेली त्यांची भाषादेखील त्याच भक्तीने नटलेली सरस्वती पूजा वाटू लागते.
आध्यात्मिकता याचा अर्थ एखाद्या ध्येयासाठी किंवा ध्यासासाठी केलेली आत्मीय साधना म्हणता येते. भक्ती, आध्यात्म असे शब्द उच्चारल्याबरोबर त्याचे अनेक कंगोरे मांडण्याचा प्रयत्न होतो. किंबहुना आध्यात्मिक माणूस देशभक्ती वगैरेसारख्या भानगडीत पडत नाही. किंवा देशभक्ती करणाऱ्याकडे आध्यात्मिक प्रवृत्ती असून चालत नाही. इथपर्यंत त्याचा अर्थ काढला जातो. परंतु सावरकरांची मूळ प्रवृत्ती ही अत्यंत व्यापक स्वरूपाच्या आध्यात्माची प्रतीती होती जी केवळ पारंपारिक आध्यात्मिकतेच्या समजूतींमध्ये संकुचित करता येणार नाही. त्यांच्या या सगळ्या चिंतनाचा संबंध जेव्हा स्वधर्माच्या किंवा स्वराष्ट्राच्या चैतन्यापर्यंत येऊन पोहचतो तेव्हा त्या आध्यात्मिकतेची उंची किंवा स्वरूप किती वेगळे किंवा उदात्त आहे हेही लक्षात येते. जगातल्या अन्य धर्म किंवा राज्यक्रांत्यांचा अभ्यास करून त्यांच्या पाठीमागेसुद्धा स्वधर्म संरक्षण हेदेखील मोठे तत्त्व होते. हे ते जेव्हा निक्षून सांगतात त्यावेळेला त्यांच्या या आध्यात्माचे आराध्य भगवतीच्या स्वरूपात असणारी स्वातंत्र्यदेवी असते याकडे दुर्लक्ष करता येत नाही. मग सावरकरांची ही मूलभूत प्रेरणा समजून घेतल्याशिवाय स्वराज्य संपादन किंवा त्यासाठी करावयाच्या क्रांतीची उद्दिष्टेच लक्षात येऊ शकत नाहीत.
याच पद्धतीने विचार केला तर त्यांच्या अनेक उपक्रमांमध्ये किंवा साहित्य वाङ्मयामध्ये आध्यात्मिकतेचा हा पैलू ठिकठिकाणी जाणवतो. यामध्ये त्यांचे आत्मतत्त्व अशा वेगळ्या आध्यात्मात गुंतलेले पाहायला मिळते. भगूर येथे इथल्या एका गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या काव्यातील एक कडवे असे होते की
उद्धारा आर्यजना, आर्यभूमीला,
त्या स्वतंत्र छत्री आर्य ठेवणे खरे,
प्रार्थुनिया कार्याला लागले बरे।
गणेशोत्सवातील त्यांनी केलेली ही प्रार्थना स्वराज्याच्याच तत्त्वाला पूरक ठरणारी होती. तर नाशिकमध्ये प्रसिद्ध अशा नारोशंकराच्या घंटेला उद्देशून ते जेव्हा काव्य करतात त्यावेळेला धर्म किंवा भक्ती यांच्या माध्यमांचाही ते आपल्या ध्येयासाठी उपयोग करून घेताना दिसतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहीलेली आरती ही अशाच स्वधर्म आणि स्वराज्य यांची कीर्ती सांगणारी होती. मग त्यांचा हा पैलू आध्यात्मिक नाही असे कसे म्हणायचे? एवढेच नव्हे तर शिवराय आणि तानाजी यांच्या भेटीवर त्यांनी लिहीलेला पोवाडासुद्धा अशाच स्वरूपाचा होता. शके १९२८ मध्ये ‘विहारी’ या नियतकालिकात त्यांचा ‘वंदे मातरम्’ या शीर्षकाखाली आलेला लेख आणि त्यात त्यांनी केलेले हिमालयाचे वर्णन याच भरतभूमीच्या भक्तीचे निदर्शक ठरते. नागपूरचे संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि विचारवंत बाळशास्री हरदास यांनी त्यांच्या या लेखाबद्दल त्यांना खास पत्रही पाठवले होते. अशा प्रकारे स्वधर्माचे आध्यात्म मांडणाऱ्या या क्रांतीकारकाचे विचार एका मूलगामी चिंतनाचे फार मोठे संचित ठरते. सावरकरांचा स्वातंत्र्यवीर, क्रांतिवीर असा अभ्यास करीत असतानाच त्यांना या सगळ्या कार्यासाठी खऱ्या अर्थाने जिथून ऊर्जा मिळत गेली तो आध्यात्मिक पिंडसुद्धा खूप मोलाचा ठरतो. अंदमानच्या कारागृहात पन्नास वर्षाची प्रदीर्घ शिक्षा झालेली असताना त्यांना
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतः क्लेशविनाशाय गोविंदाय नमो नमः ।।
हा श्लोक म्हणण्याचा आग्रह त्यांच्या नातेवाईकांनी केला होता आणि तो त्यांनी तितक्याच श्रद्धेने अंमलातही आणला होता. इतक्या उच्चकोटीचा त्याग आणि कठोर कारावास सहन करण्याकरीता तितकीच मोठी परंतु सुप्त आध्यात्मिक शक्ती त्यांच्याकडे होती हे नाकारता येत नाही. सावरकर हे अनेक दृष्टींनी चिंतनाचाच विषयच ठरतात. परंतु त्यांच्यातले हे चैतन्यसुद्धा समजून घेतले पाहिजे.
Views expressed are of thr author’s and do not necessarily represnt the official position of Mimamsa- An Indic Inquiry
Author : लक्ष्मीकांत जोशी
लक्ष्मीकांत जोशी हे ज्येष्ठ पत्रकार असून गेली ३५ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत..
Nyc write up.. got glimpse of spiritual aspect of Swatantrya veer Sawarkar and how it’s strong base felled in freedom movement.
Yes true
मी आध्यात्मिक मार्गावर नुकताच प्रवास सुरू केला असल्यामुळे मला हे समजू शकलं. Thank you for sharing! सावरकरांचे गुरु कोण होते?