Vijñāna | विज्ञान

India has a rich scientific heritage preserved in our knowledge tradition. Insightful deliberations on subjects like Mathematics, Physics, Chemistry, Astronomy, Medicinal Science, Architectural Science and Linguistics among others are found in ancient Indian texts. Even the term Vijnana i.e. ‘Vishista Jnana’ which means specific knowledge was used to refer to manifold aspects of Indian scientific inquiry. Under Vijnana, this rich scientific heritage of India will be studied and deliberated upon.

वैदिक छंदांची ओळख

by | Aug 25, 2020 | 8 comments

वेदाध्ययनाची बैठक पक्की व्हावी ह्यासाठी वेदाङ्गांचा अभ्यास केला जातो. शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त व छन्द ही सहा वेदाङ्गे वेदाध्ययनासाठीची पायाभरणी करतात. वैदिक सूक्तांचा अभ्यास करण्यापूर्वी त्या सूक्ताचे ऋषी, सूक्ताची देवता व सूक्ताचा छंद माहित असणे आवश्यक समजले जाते. मुळात, वैदिक संहितांचा अभ्यास करण्याआधी ही सगळी वेदाङ्गे आपली प्राथमिक तयारी करून घेतात. परंतु, तुलनेने ‘छंद’ हे वेदाङ्ग उपेक्षित राहिले आहे. व्याकरणाइतका प्रकाश त्यावर सहजी पडलेला दिसत नाही. ह्या लेखात आपण वैदिक छंदांची प्राथमिक ओळख, त्यांची रूपरेषा, त्यांचे निकष, लौकिक व वैदिक ह्या छंदांमध्ये प्रामुख्याने कुठे भेद आहे हे पाहणार आहोत.

संस्कृतात ‘छन्दस्’ असा मूळ नपुंसकलिंगी शब्द आहे व त्याची व्युत्पत्ती ही ‘चदि आह्लादने’ किंवा ‘छदि आच्छादने’ अशी केली जाते. म्हणजेच जे आल्हाददायक, आनंददायक आहेत, किंवा जे आवरण म्हणून, कवच म्हणून वापरले ते छंद होत. पुराकथांमध्ये  सुर-असुरांच्या युद्धात छंदांची भूमिका संरक्षक म्हणून आहे ते वस्तुतः त्यातील सिद्ध मंत्रशक्तीमुळे! मंत्र छन्दोबद्ध आहेत असं म्हणत असताना मंत्र हे पद्यात्मक नियमांच्या विशिष्ट रचनेत निबद्ध आहेत असे अपेक्षित आहे. अनेक आचार्य ह्या पद्यात्मक मंत्रांनाच छन्द मानतात. गद्यात्मक मंत्रांना छन्द मानत नाहीत. परिणामी यजुर्वेदातील गद्यरूप मंत्र हे छंद होत नाहीत. परंतु, नाट्यशास्त्रकार भरतमुनींच्या मते, “छन्दोहीनः न शब्दोऽस्ति, न छन्दः शब्दवर्जितम्” म्हणजे शब्द न् शब्द हा छन्दच आहे. त्यांचं साहचर्य अतूट आहे. कात्यायन ऋषींच्या मते, ‘छन्दोभूतमिदं सर्वं वाङ्मयं स्याद्विजानतः।’.

वैदिक छन्दांची लक्षणं सांगताना ऋक्सर्वानुक्रमणीत कात्यायन ऋषी म्हणतात,

“यदक्षरपरिमाणं तच्छन्दः”

म्हणजे छन्द हे अक्षरांचं परिमाणच आहे.

‘छन्दःसूत्र’ ह्या ग्रंथाचे रचनाकार पिङ्गळाचार्य हे वैदिक छन्दांच्या अभ्यासाचे प्रणेते मानले जातात. ह्या आधीही अनेक पूर्वासुरींनी ह्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. वैदिक छंदांचं विश्लेषण करणाऱ्या ग्रंथांमध्ये शौनक ऋषींचे ऋक्प्रातिशाख्य, शांङ्खायनाची श्रौतसूत्रे, पतञ्जली ऋषींची निदानसूत्रे, गार्ग्य ऋषींची उपनिदानसूत्रे, वेंकटमाधवाचे छन्दोऽनुक्रमणी, जयदेवाची छन्दःसूत्रे असे प्रधान ग्रंथ आहेत. वैदिक छन्दांचा साचा हा फार काटेकोर नाही व बरंच स्वातंत्र्य हे मन्त्रद्रष्ट्या ऋषींना मिळालेलं दिसून येतं. छन्द हे अक्षरांचं परिमाण आहेत. परंतु, रूढार्थाने छन्द म्हटलं की जी गेयता अपेक्षित असते ती त्यात नाही. ते गेय असू शकतात. परंतु, तो त्यांचा निकष नाही. लौकिक वृत्तांच्या बाबतीत लघु-गुरूची रचना जितकी आग्रही आहे तशी इथे नाही. त्यामुळे वैदिक छंदांना तशी गेयता नाही. ‘अक्षरछंद’ असं वर्णन वैदिक छंदांचं केलं जातं, कारण अक्षरसंख्या हीच प्रधान आहे. ती थोडी बदलली तरी छंद बदलत नाही. शतपथब्राह्मणातील ‘न वा एकेन अक्षरेण छन्दांसि वियन्ति न वा द्वाभ्याम्’ हे वचन आपला अभ्यासाचा मार्ग सोपा करते. किती अक्षरे किती पादात ह्या वरून छंद ठरतो. दोन छंदांमधील अक्षरांची संख्या समान झाली व छंदनिश्चितीबाबत शंका असल्यास ‘आदितः संदिग्धेः’ (३.६१ छन्दःसूत्रम्) ह्या सूत्रानुसार, प्रथम पादावरून त्याची निश्चिती केली जाते. तरीही संदेह राहिल्यास ‘देवतादितश्च’(३.६२ छन्दःसूत्रम्) ह्यास अनुसरून देवतेवरून छंदाची निश्चिती केली जाते. वैदिक छंदांना विशिष्ट देवतांचा निर्देश आहे. ‘अग्निः सविता सोमो बृहस्पतिर्वरुण इन्द्रो विश्वदेवाः’ (३.६३ छन्दःसूत्रम्) ह्या सूत्रनुसार, गायत्री ते जगती ह्यांना अनुक्रमे अग्नी, सूर्य,……अशा देवतांचा निर्देश आहे. त्यावरून मंत्रांचा छंद ठरवला जातो. सप्तर्षींचाही निर्देश ह्या छंदांना आहे. छंदांना सात स्वर, सात रंग दिले आहेत. ह्या सगळ्याचा एकमेकांशी असलेला प्रत्यक्ष संबंध, त्याचे स्वरोच्चारणासहित असलेल्या मंत्रपठणाशी नाते ह्यावर विशेष अभ्यास आवश्यक आहे.

वैदिक छंदांमध्ये एकाक्षरापासून छंदांची सुरुवात होते ती थेट १०४ अक्षरांपर्यंतच्या उत्कृती नावाच्या छंदापर्यंत. ‘ओम्’ हासुद्धा एकाक्षरी गायत्री छंदच मानला आहे. एकूण २६ छंद मानले आहेत. त्या छंदांचे पाच विभाग केले आहेत. पहिले पाच छंद व पुढचे २१ छंद तीन गटात विभागले आहेत.

१ ते ५- प्राग्गायत्री छंद

६ ते १२- प्रथम (दिव्य)सप्तक

१३ ते १९- द्वितीय (दिव्येतर)सप्तक

२० ते २६- तृतीय (दिव्यमानुष) सप्तक.

बहुतेक आचार्यांनी २६ छंद मानले आहेत. परंतु, पहिल्या पाच छंदांमध्ये निर्मिती अवघड व त्यांत मंत्ररचनाही सापडत नाहीत. म्हणून प्रथम सप्तकापासून छंदांचा परामर्श घेतला जातो. पहिल्या पाच छंदांना विविध ग्रंथांत विविध नावे आहेत. ऋक्प्रातिशाख्यात मा, प्रमा, प्रतिमा, उपमा व समा ही नावे आहेत तर, उपनिदानसूत्र ह्या ग्रंथात उक्ता, अत्युक्ता, मध्या, प्रतिष्ठा, सुप्रतिष्ठा अशी नावे आहेत. प्रथम सप्तकातील सात छंद हे सर्वांत प्रमुख मानले गेले आहेत. पादसंख्या व अक्षरसंख्या ह्यांच्या काही अपवादांमुळे ह्या छंदांचे बरेच भेद उपभेद आहेत.

खालील कोष्टकात मूळ २१ छंदांची नावे पाहता येतील.

गायत्री छंदाच्या २४ अक्षरसंसख्येपासून पुढच्या अनुक्रमे छंदात प्रत्येकवेळी ४ अक्षरांची भर पडत जाते. २४- २८, ३२, ३६, ४०, ४४, ४८… असा प्रवास करत उत्कृति नावाचा शेवटचा छंद हा १०४ अक्षरांचा आहे. छंदांवर परंपरेत जास्त भर दिला गेला आहे. सगळे भेद-प्रभेद ह्यांचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिसून येते. पिङ्गळाचार्यांच्या ग्रंथात ह्या छंदांच्या वृत्ति व त्यांचे वृत्तभेद सांगितले आहेत. पूर्ण वृत्तभेदांची संख्या मोजली असता, ती ६,७१,०८,८६४ इतकी होते. पहिला छंद मा किंवा उक्ता ह्या छंदातील एका पादात एक अक्षर असे करत उत्कृतिमध्ये  २६ अक्षरं एका पादात, असा प्रवास दिसतो. पहिल्या छंदाचे २ भेद सांगितले आहेत. व दोनाच्या घाताच्या पटीत हे भेद वाढत जातात. २ * २ * २* २ असे करत गेल्यास, २२६ (दोनाचा सव्विसावा घात)म्हणजे ६,७१,०८,८६४ एवढे भेद मिळतात. गणितीदृष्ट्या वाढत जाणारी संख्या आहे. परंतु ह्या सर्व प्रभेदांचे तपशीलवार वर्णन येत नाही. वैदिक छंदांच्या बांधणीत लघु-गुरू अक्षरक्रमाच्या मांडणीचा आग्रह नाही. तरीही शुभाशुभ अक्षरांचा वापर, त्याचे फळ ह्याचे विस्तृत वर्णन येते. कोणत्या अक्षरसमुच्चयाचा वापर केल्यास काय परिणाम होतो ह्याविषयी मांडणी आहे.

वैदिक छंदांच्या भेदांमध्ये पहिल्या सातही छंदांचे दैव, आसुर, प्राजापत्य, आर्ष, याजुष, साम्न, आर्च, ब्राह्म असे प्रत्येकी आठ भेद सांगितले आहेत. छंदांची नावे स्त्रीलिंगी आहेत. म्हणून आर्षी, दैवी, आसुरी अशी विशेषणे होतात. ह्या सर्व छंदांमध्येही अनुक्रमे संख्या वाढत जाते. केवळ आसुरी प्रकारच्या भेदात ती एक- एक अक्षराने कमी होत जाते.

 पुढील कोष्टकात हे नीट पाहता येईल.

 

 

वैदिक छंदांचे हे मुख्य स्वरूप आहे. त्याची व्याप्ती किंवा वरकरणी स्वरूप सुटसुटीत वाटत असले तरी बराच भाग अजूनही अभ्यासाच्या कक्षेत येणे आवश्यक आहे.

संदर्भग्रंथ-

छन्दःसूत्रम्- पिङ्गळाचार्य

वैदिक छन्दोमीमांसा- युधिष्ठिर मीमांसक

Vedic Meter- Arnold

छन्दोरचना- माधव पटवर्धन

Views expressed are of thr author’s and do not necessarily represnt the official position of Mimamsa- An Indic Inquiry. 

Author : गौरी वेलणकर

लेखिका फ्रीलान्स भाषावैज्ञानिक व संस्कृत विषयाच्या अभ्यासक आहेत.

8 Comments

  1. Ramesh Prasad Ramesh

    माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद !

    Reply
    • गौरी वेलणकर

      धन्यवाद.

      Reply
  2. Laxmikant Joshi

    छान लेख ! छंदोबद्ध मंत्रात काही खूणा असतात त्याचा छंदाशी काय संबंध असतो.?काही कळू शकेल का ?

    Reply
    • गौरी वेलणकर

      वैदिक साहित्यात अक्षराखाली आडवी रेघ अथवा वर उभी रेघ असते, अशा खुणांबद्दल म्हणत असाल, तर त्या वैदिक स्वरांच्या खुणा आहेत. उदात्त, अनुदात्त व स्वरित अशा स्वरांसाठी त्या खुणा असतात. अनुदात्तासाठी अक्षराखाली आडवी रेघ व स्वरितासाठी अक्षरावर उभी रेघ असते. उदात्तास खूण नसते.

      Reply
  3. Sz

    Ashya article chi sadhya faar garaj aahe va he article etar lokan prynt dekhil pochle pahije

    Reply
    • गौरी वेलणकर

      धन्यवाद..

      Reply
  4. Anjali Ranade

    अतिशय माहितीपूर्ण लेख आहे 😀🙏

    Reply
  5. गौरी वेलणकर

    धन्यवाद..

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *